बोहरा समाजाचे धर्मगुरू सैयदना मुफद्दल सैफुद्दीन यांच्या दर्शनासाठी कर्जत रेल्वे फलाटावर शेकडो श्रद्धाळूंची गर्दी
महाराष्ट्र मिरर टीम-कर्जत
बोहरा समाजाचे ५३ वे धर्मगुरू सैयदना आलीकदर मुफद्दल सैफुद्दीन हे सुरतवरून राजकोट - सिकंदराबाद रेल्वेने खंडाळा येथील त्यांच्या निवासस्थानी जात असताना आज सायंकाळी कर्जत रेल्वे स्टेशनच्या फलाट क्रमांक १ वर ७.२२ ते ७.४२ वाजताच्या दरम्यान त्यांच्या शेकडो अनुयायींनी दर्शनासाठी तोबा गर्दी केली होती.
सैयदना सैफुद्दिन हे केवळ धार्मिक गुरु नसून आर्थिकदृष्टीने समाजासाठी आयकॉन आहेत. त्यांनी जगभरातील बोहरा समाजातील गरिबी दूर करण्यासाठी बिनव्याजी कर्ज देणाऱ्या बँका उघडल्या आहेत. त्यामुळे बोहरा समाज आर्थिकदृष्ट्या सक्षम होत आहे. एकप्रकारे अन्नदात्याची भूमिका निभावणाऱ्या आपल्या धर्मगुरूंची एक झलक डोळ्यात साठविण्यासाठी स्त्री - पुरुष कमालीचे आतुर झाले होते. कर्जत, खालापूर, नेरळ, पनवेल परिसरातील बोहरा स्त्री- पुरुष श्रद्धाळू त्यांच्या डब्याजवळ जाऊन त्यांचे दर्शन घेण्याचा आटोकाट प्रयत्न करीत होते. त्यांच्यासोबत लहान मुले - मुली असतानाही त्यांनी कोविड-१९ च्या कोणत्याही नियमांचे पालन केले नसल्याचे निदर्शनास आले. रेल्वेला डबल इंजिन जोडले जात असताना बोहरा समाजाच्या अनुयायांनी धर्मगुरूंच्या डब्याजवळ एकच गलका केल्याने परिसरातील नागरिक, दुकानदार व अन्य प्रवास्यांचे लक्ष वेधून घेतले.
अचानक शेकडो लोकांनी फलाटावर गर्दी केल्याचे दिसताच रेल्वे पोलीस यंत्रणा सतर्क झाली. रेटारेटी सुरू झाली होती. चेंगराचेंगरी होण्याची शक्यताही बळावली होती. संबंधित अधिकाऱ्यांनी लगेच पोलिसांची कुमक पाठविली व पोलिसांनी कडे करून मोर्चा सांभाळल्याने होणारा अनर्थ टळला असेही बोलल जात आहे. सुशिक्षित असलेल्या व व्यापारामध्ये गुंतलेल्या बोहरा समाज बांधवांनी शासनाने कोविड -१९ संदर्भात वेळोवेळी दिलेल्या सूचना व नियमांची केलेली पायमल्ली गंभीर स्वरूपाची आहे.
कोरोनाचे भय अद्याप संपलेले नसताना अति आत्मविश्वास व नियमांची खुलेआम पायमल्ली करण्याची सवय अन्य नागरिकांसाठी धोकादायक ठरू शकते. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने गाफील न राहता नियमाची काटेकोर अंमलबजावणी करण्याकडे लक्ष केंद्रित करण्याची गरज असल्याचे मत सुजाण नागरिकांनी व्यक्त केले आहे.