खालापूर प्राथमिक केंद्रात 1565 नागरिकांना लसीकरण, 45 वर्षांवरील नागरिकांनी लस घेण्याचे डाॅ.अनिलकुमार शहा यांचे आवाहन
राकेश खराडे-रसायनी
खालापूर तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. गुरुवार दिनांक 15 एप्रिलपर्यंत 454 रुग्ण अॅक्टीव असून एकूण 127 जण मयत झाले आहेत.या वाढत्या कोरोनाला आळा घालण्यासाठी राज्य सरकारने नियमावलीनुसार कडक निर्बंध राज्यभरात लागू केले असून केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच घराबाहेर पडण्यास मुभा आहे.कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी ४५ वर्षांवरील नागरिकांसाठी लसीकरण मोहीम सुरू आहे.यासाठी खालापूर तालुका प्राथमिक आरोग्य केंद्रात नागरिकांना कोविशिल्ड लसीकरण करण्यात येत आहे.यासाठी तालुक्यातील व इतर परीसरातील नागरिक लसीकरण करून घेताना पहावयास मिळत आहे.यासाठी खालापूर तालुका प्राथमिक आरोग्य केंद्राचे मुख्य डॉ.अनिलकुमार योध्दा शहा व केंद्र सुपरवायझर श्याम गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली लसीकरण मोहीम सुरू आहे.गुरुवार दिनांक 15 एप्रिलपर्यंत 1565 नागरिकांनी लसीकरण केले आहे.
कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेत नागरिकांसाठी परीक्षा अधिक कठीण व आव्हानात्मक आहे शिवाय गेल्या वर्षापेक्षा संसर्गाचा वेग जास्त असल्याने लसीकरणासाठी दहा एप्रिल नंतर गर्दी होत असल्याचे लसीकरण केंद्रावर दिसून येते.
शासनाकडून 45 वर्षांवरील नागरिकांना लसीकरण केले जात असून खालापूर आरोग्य केंद्रातून दि.15 एप्रिलपर्यंत 1565 नागरिकांना कोविशिल्ड लसीकरण करण्यात आल्याची माहिती डॉ.अनिलकुमार योध्दा शहा यांनी दिली आहे.यासाठी तेथील सुपरवायझर श्याम गायकवाड अधिक परिश्रम घेत आहेत.लसीकरण करण्यासाठी आलेल्या नागरिकांना उन्हापासून बचाव व्हावा शिवाय विश्रांती घेता यावी, यासाठी कापडी मंडप उभारले आहे.लस देण्याअगोदर रजिस्ट्रेशन केल्यानंतर शरीराचे तापमान तपासण्यात येते.यासाठी खालापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात यंत्रणा कमी असल्याने खालापूर नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षा शिवानी जंगम व त्यांचे पती संतोष जंगम आरोग्य यंत्रणेला सहकार्य करीत आहेत.तरी तालुक्यातील नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे असे आवाहन खालापूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ.अनिलकुमार शहा यांनी केले आहे.