सरकारच्या निर्णयाकडे पत्रकारांचे लक्ष
आदेश न निघाल्यास मंगळवारी आंदोलन
महाराष्ट्र मिरर टीम-मुंबई
लॉकडाऊनच्या काळात प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियातील पत्रकार आणि पत्रकारितेतर कर्मचारी यांना वार्तांकन आणि दैनंदिन कार्यालयीन कामासाठी फिरण्याची मुभा मिळावी, या मागणीबाबत राज्य सरकारच्या निर्णयाकडे पत्रकारांचे लक्ष लागले आहे. याबाबत सरकारने सोमवार, दि. 26 एप्रिल, 2021 रोजी सायं. 6.00 वाजेपर्यंत अनुकूल निर्णय न घेतल्यास मंगळवारी दुपारी 2.00 वाजता मुंबई मराठी पत्रकार संघाच्या पत्रकार भवनासमोर सरकारच्या निषेधार्थ तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय आज दूरदृष्य प्रणालीद्वारे झालेल्या विविध पत्रकार संघटनांच्या बैठकीत घेण्यात आला.
प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियातील पत्रकार आणि पत्रकारितेतर कर्मचारी यांच्यासाठी माध्यम आस्थापनांना प्रत्येकी 25 ओळखपत्र देण्याची मागणी मुंबई मराठी पत्रकार संघाने तसेच एनयुजेमहाराष्ट्र नेही अत्यावश्यक सेवेत श्रमिकपत्रकार व पत्रकाराचा समावेश करून सार्वजनिक प्रवास सेवेत व इतरत्र काम करण्यासाठी फिरण्याची मुभा देण्याची मागणी मा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन देऊन केली आहे. याबाबत राज्य सरकारने गंभीर दखल घेतली आहे. त्याबाबतचे आदेश सोमवार दिनांक 26 एप्रिल 2021 रोजी प्रशासकीय स्तरावर निघण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. . राज्यसरकार च्या आदेशाकडे पत्रकारांचे लक्ष लागून राहिले आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी संध्याकाळपर्यंत हा आदेश न निघाल्यास मंगळवारी दुपारी 2.00 वाजता सर्व पत्रकार संघटना राज्यसरकारच्या निषेधार्थ आंदोलन करतील, असा निर्णय आजच्या बैठकीत एकमताने घेण्यात आला.
आज दूरदृष्य प्रणालीद्वारे झालेल्या विविध संघटनांच्या बैठकीत मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वि. वाबळे, पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष देवदास मटाले, बृहन्मुंबई महानगरपालिका वार्ताहर संघाचे अध्यक्ष आणि पत्रकार संघाचे कार्यवाह विष्णू सोनवणे, एनयूजे (महाराष्ट्र) अध्यक्ष शीतल करदेकर, मुंबई क्रीडा पत्रकार संघाचे वरिष्ठ कार्यकारिणी सदस्य शैलेश नागवेकर, टीव्ही जर्नालिस्ट असोसिएशनचे चिटणीस राजेश माळकर, एनयुजेएम चे पदाधिकारी मोहम्मद अब्दुल कादीर (औरंगाबाद), रचना बोऱ्हाडे (नवी मुंबई), प्रवीण वाघमारे (ठाणे), शेखर डोंगरे (कोल्हापूर), सुवर्णा दिवेकर (रायगड), लक्ष्मीकांत घोणसे पाटील( रत्नागिरी) , एनयुजेएम संघटन सचिव कैलास उदमले (नगर),संदिप टक्के(मुंबई) प्रवक्ता-एनयुजेमहाराष्ट्र आदी उपस्थित होते.