सलून दुकाने चालू करण्यासाठी परवानगी द्यावी अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करू,म्हसळा तालुका नाभिक संघटनेचा शासनाला इशारा
अरुण जंगम-म्हसळा
कोरोना व संचारबंदीमुळे हातावर पोट भरणाऱ्या नाभिक समाजातील सलुन व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकाचा गेल्या अनेक दिवसापासून व्यवसाय बंद असल्याने त्यांचे जीवनमान अडचणीत आला आहे.रायगड जिल्ह्यात संपूर्ण सलुनची दुकाने बंद असल्याने नाभिक दुकानदार व कारागीर यांचेवर उपासमारिची वेळ आली आहे.त्यामुळे सलून दुकाने पुन्हा चालू करण्यात यावीत यासाठी नाभिक समाज जिल्हा अध्यक्ष सुदाम शिंदे यांचा नेतृत्वाखाली रायगड जिल्ह्यातील सर्व तालुक्यात मा.तालुका तहसीलदार मार्फत शासनाला निवेदन देण्यात आले आहेत त्या अनुषंगाने म्हसळा तालुका नाभिक संघटनेच्या वतीने तहसीलदार शरद गोसावी यांच्याकडे निवेदन देण्यात आले.यावेळी रायगड जिल्हा उपाध्यक्ष दिलीप शिर्के,माजी अध्यक्ष विलास यादव गुरूजी,समाज अध्यक्ष प्रदिप कदम,उपाध्यक्ष सुनिल भोसले,सलून संघटना अध्यक्ष महेश खराडे,सचिव दिपल शिर्के,समशेर शेख उपस्थित होते.कोरोना संसर्ग पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी संचार बंदी लागू झाली.अत्यावश्यक सेवेची दुकाने चालू राहीली परंतू सलूनची दुकाने बंद ठेवण्यात आली.नाभिक समाजाने कोरोनाचे सर्व नियम काटेकोर पाळून शासनाला नेहमीच सहकार्य केले आहे त्यामुळे शासनाने सलून आणि ब्युटीपार्लरची दुकाने चालू करण्यास परवानगी द्यावी अन्यथा प्रापंचिक जाचाला व भूकमारिला कंटाळलेला नाभिक समाज आंदोलन करण्यासाठी रस्त्यावर उतरेल असा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.