ठाणे जिल्हा परिषदेच्या प्रयत्नांनंतर मुरबाडमधील टाकीचीवाडी कात टाकणार - महाराष्ट्र मिरर

Breaking


Post Top Ad

Thursday, April 22, 2021

ठाणे जिल्हा परिषदेच्या प्रयत्नांनंतर मुरबाडमधील टाकीचीवाडी कात टाकणार

 ठाणे जिल्हा परिषदेच्या प्रयत्नांनंतर मुरबाडमधील टाकीचीवाडी कात टाकणार

उपाध्यक्ष सुभाष पवार यांच्या प्रयत्नांना यश

            सुधाकर वाघ-मुरबाड

तळ्याची वाडी येथील रुग्ण व वयोवृद्धांचे अनेक वर्षांपासून सुरू असलेले हाल दूर होणार आहेत. आपत्कालीन परिस्थितीत तळ्याची वाडी परिसरातील ग्रामस्थांना डोलीने मुरबाडकडे आणावे लागत होते. मात्र, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार यांच्या प्रयत्नानंतर रस्ता मंजूर झाल्यामुळे ग्रामस्थांचे हाल दूर होणार आहेत. तर रस्त्याबरोबरच पाणी योजना, मंगल कार्यालय, के. टी. बंधारा दुरुस्ती आदी कामे मंजूर झाल्यामुळे, प्रथमच टाकीचीवाडी कात टाकणार आहे.

मुरबाड तालुक्याच्या दुर्गम भागातील ग्रामस्थांना रस्त्यासह पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष गोटीराम पवार यांच्याकडून प्रयत्न केले जात आहेत. त्यानुसार ग्रामीण भागात पिण्याचे पाणी व रस्ते तयार केले जात आहेत. त्याअंतर्गत तळ्याची वाडी व टाकीचीवाडी येथे सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यानुसार टाकीचीवाडी ते तळ्याची वाडी रस्त्यासाठी 68 लाख, तळ्याची वाडी पाणी योजनेसाठी 23 लाख, टाकीची वाडी येथे मंगल कार्यालयासाठी 11लाख, टाकीचीवाडी येथील के. टी. बंधारा दुरुस्तीसाठी 5 लाखांचा निधी मंजूर करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.या कामांचे भूमिपूजन ठाणे जि.प उपाध्यक्ष सुभाष पवार यांच्या हस्ते पार पडले. या वेळी ज्येष्ठ नेते रामभाऊ दळवी, पंचायत समितीचे माजी उपसभापती अनिल देसले, जिल्हा परिषदेचे सदस्य किसन गिरा, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती लक्ष्मण स्वरनिंगे, मानिवलीच्या सरपंच पुष्पा दळवी आदींची उपस्थिती होती.

मुरबाड तालुक्यात तळ्याची वाडी हा आदिवासी भाग आहे. या ठिकाणच्या वृद्ध, गरोदर महिला व आजारी रुग्णांना डोली करून आणावे लागत होते. त्यात वेळ वाया जात असल्यामुळे अनेक रुग्णांची स्थिती बिकट होत होती. तळ्याची वाडी येथून टाकीची वाडी गावापर्यंत आणल्यावर तेथून वाहनाने मुरबाड शहरात आणावे लागत होते. त्यामुळे तळ्याची वाडी - टाकीची वाडी रस्त्याचे काम करण्याची मागणी केली जात होती. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी ग्रामस्थांची व्यथा ओळखून जिल्हा परिषदेकडून हा रस्ता मंजूर करून घेतला. त्याचबरोबर पाणीयोजना, मंगल कार्यालय, बंधारा दुरुस्तीच्या कामाचेही​ भूमिपूजन केले. रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे या भागातील ग्रामस्थांचा प्रवास आता सुकर होईल.

No comments:

Post a Comment