माथेरानमधील श्रमिक हातरिक्षा चालकांना शासनाने मदत करावी-सुनील शिंदे यांची मागणी
चंद्रकांत सुतार-माथेरान
दुस-या लॉक डाऊन मुळे केवळ पर्यटनावर अवलंबून असणाऱ्या इथल्या श्रमिक हातरीक्षा चालकांना शासनाने मदत करावी या आशयाचे निवेदन संघटनेचे सचिव सुनील शिंदे यांनी पर्यटन राज्यमंत्री तथा रायगड जिल्हा पालकमंत्री अदिती तटकरे यांना दिले आहे.
पर्यटकांना सेवा उपलब्ध करून देण्यात अनेक वर्षांपासून या महत्वपूर्ण जडणघडणीत या श्रमिकांचा मोलाचा वाटा राहिलेला आहे. जेष्ठ पर्यटकांना इथल्या विविध प्रेक्षणीय स्थळांचे दर्शन याच हातरीक्षाच्या माध्यमातून केले जात आहे. रक्ताचे पाणी करून हातरीक्षा ओढणारी ही कष्टकरी मंडळी आपल्या कुटुंबाला आधार देत असतात. अन्य पर्यायी व्यवसायाची सोय उपलब्ध नसल्याने केवळ पर्यटन शेतीवर सर्वांचे जीवनमान आजही सुरू आहे. अत्यंत हलाखीचे जीवन ही श्रमिक मंडळी कंठीत आहेत. अतिकष्टदायक हे काम असल्याने अल्पायुष्यात अनेकांना आपली जीवनयात्रा संपवावी लागली आहे. आजवर इथे ह्या व्यवसायात बदल घडवून आणण्यासाठी शासनाने लक्ष केंद्रित केलेले नाही की यांना शासकीय सेवासुविधा आजवर प्राप्त झालेल्या नाहीत. सध्यातरी हाताच्या बोटावर मोजण्या इतकी मंडळी ही एकप्रकारची गधा मजुरीची कामे नाईलाजाने करीत आहेत.
त्यातच हा दुसरा लॉक डाऊन जाहीर करण्यात आल्यामुळे इथल्या या श्रमिकांवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. पहिल्या लॉक डाऊन मध्ये सुध्दा या श्रमिकांना कुठल्याही प्रकारची मदत मिळाली नव्हती.शासनाने नुकताच ऑटोरिक्षा चालकांना १५०० रुपयांची मदत जाहीर केली आहे त्याच अनुषंगाने माथेरान मधील या कष्टकरी लोकांना अर्थसहाय्य मिळावे. कदाचित शासनाला माथेरान हे गाव जगाच्या नकाशावर माहीत आहे की नाही कारण या दुर्गम अशा पर्यटनस्थळकडे इथे पर्यायी सेवासुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आजवर कुठल्याही शासकीय तसेच वरिष्ठ पातळीवरील नेतेमंडळी यांनी पाठपुरावा केलेला नाही त्यामुळेच या गावाचे आजही शहरीकरण झालेले नसून खेडे वजा शहर म्हणून गणले जात आहे. निदान यावेळेस तरी शासनाकडून श्रमिकांना आर्थिक सहकार्य मिळावे अशी अपेक्षा ह्या कष्टकरी मंडळीकडून केली जात आहे.