कल्पेश ठरतोय "देवदूत" - महाराष्ट्र मिरर

Breaking


Post Top Ad

Monday, June 14, 2021

कल्पेश ठरतोय "देवदूत"

  कल्पेश ठरतोय "देवदूत"

                   देवा पेरवी -पेण    मुंबई-गोवा महामार्गावर अपघातग्रस्तांना मागील सोळा वर्षांपासून विनामूल्य सेवा देणारा पेण येथील कल्पेश ठाकूर आता कोरोना रुग्णांसाठी देखील विनामूल्य सेवा देत असल्याने त्यांच्यासाठी देखील "देवदूत" ठरत आहे.

    कोरोना महामारीने मागील वर्षीपासून संपुर्ण जगात थैमान घातले आहे. आज या सांसर्गिक रोगाने नाती दुरावली, गाव दुरावले असे चित्र सगळीकडे पाहायला मिळत आहे. आपले-आपले म्हणणारे देखील या कोरोनाच्या भीतीने लांब गेले. कोरोनाग्रस्त रुग्णाकडे सगळे पाठ फिरवत असतानाच या रुग्णांसाठी मोफत रुग्णवाहिका सेवा देण्यासाठी कल्पेश पुढे आला आहे. मुंबई- गोवा महामार्गावर अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी नेहमीच पुढाकार घेतलेल्या कल्पेश ने कोरोनाच्या लढाईत देखील आपले विनामूल्य सेवेचे व्रत कायम ठेवले आहे.  

     मुंबई-गोवा महामार्गावर अपघातग्रस्तांची विनामूल्य मदत करणाऱ्या कल्पेश ठाकूर यांच्या "साई सहारा प्रतिष्ठान पेणच्या" अत्याधुनिक रुग्णवाहिकेचे लोकार्पण एप्रिल महिन्यात रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी व अन्य मान्यवरांच्या हस्ते झाल्यानंतर फक्त जवळपास दोन महिन्याच्या कालावधीत 200 हुन अधिक कोरोना बाधित रुग्णांना पेण ते अलिबाग, पनवेल, नवी मुंबई, मुंबई, कर्जत येथे कोणताही मोबदला न घेता रुग्णालयांत विनामूल्य सेवा देण्याचे कार्य अविरत सुरूच आहे. आपला हॉटेल व्यवसाय सांभाळत असतानाच कोरोना ग्रस्तांच्या मदतीला कल्पेशने नेहमीच धाव घेतली आहे. गाडीत लागणार डीझल असो किंवा चालकाचा पगार व गाडीचे छोटे-मोठे काम असो कल्पेश स्वतःच्या खर्चाने करत आहे. एखादे वेळी रुग्णवाहिकेवर चालक नसला तरी स्वतः चालकाची भूमिका निभावून रुग्णाला सेवा देण्याच्या या कार्याचे देखील सर्व स्तरातून कौतुक होत आहे.    मुंबई-गोवा महामार्गावर विनामूल्य सेवा देण्याच्या 'कल्पेश" च्या या कार्याची दखल घेऊन त्याला " रायगड भूषण " पुरस्कारा बरोबरच "देवदूत" सारखे अनेक शासकीय तसेच सामाजिक संस्थांनी कल्पेश ठाकूरचा सन्मान केला आहे. अपघातग्रस्त व कोरोनाग्रस्ताला मदत लागल्यास 9225714555 या मोबाईल नंबर वर तातडीने संपर्क साधण्याचे आवाहन कल्पेश ने केले आहे.


मुंबई - गोवा महामार्गावरील माझा हॉटेल व्यवसाय सांभाळत असताना, अनेक अपघात होताना पाहिले मात्र अपघात झाल्यानंतर जखमींना मदत करण्यासाठी कोणीही पुढे येत नाही. हे बघूनच मी अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे आलो. तर कोरोनाच्या पहिल्या लाटेत मुबई हुन कोकणात व कोकणातून परराज्यात पायी चालत जाणाऱ्या वाटसरूना अन्न दान केले. त्यावेळी कोरोना रुग्णांपासून दूर पाळणारे माणुसकीहीन लोक मी बघितली. त्यामुळे दुसऱ्या लाटेत कोरोना रुग्णांची होणारी परवड बघून या रुग्णांसाठी अत्याधुनिक रुग्णवाहिका घेतली आहे. कोरोना रुग्ण व अपघातग्रस्तांकडून कोणताही मोबदला न घेता तीन रुग्णवाहिकेतून ही मोफत सेवा सुरु आहे.

- कल्पेश ठाकूर, समाजसेवक, पेण 

No comments:

Post a Comment