श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील श्रीदत्त मंदिराचा यंदाचा पहिला दक्षिणद्वार सोहळा आज संपन्न - महाराष्ट्र मिरर

Breaking


Post Top Ad

Friday, June 18, 2021

श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील श्रीदत्त मंदिराचा यंदाचा पहिला दक्षिणद्वार सोहळा आज संपन्न

 श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील श्रीदत्त मंदिराचा यंदाचा पहिला दक्षिणद्वार सोहळा आज  संपन्न 

भिमराव कांबळे -कोल्हापुर


पावसाने लावलेली दमदार हजेरी,  यामुळे येथील कृष्णा व पंचगंगा नद्यांच्या पाणीपातळीत चांगलीच वाढ झाली आहे . कृष्णा नदीचे पाणी शिरोळ तालुक्यातील श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथील श्रीदत्तचरणांजवळ आले. .नदीचे पाणी उत्तर बाजूने येऊन श्री स्पर्श करून ते दक्षिणेकडे गेला आज पहाटे ‘दक्षिणद्वार सोहळा’ संपन्न झाला.

श्रीक्षेत्र नृसिंहवाडीचा दक्षिणद्वार सोहळा

                        संकलन-प्रियांका ढम

   
 तसं बघितलं तर दक्षिणद्वार सोहळा हे एक Natural Phenomena म्हणजे नैसर्गिक घटना आहे. पण भक्तीसाम्राज्यात मात्र याला प्रचंड महत्व आहे.
    द्वितीय दत्तावतार श्रीमन्नृसिंहसरस्वतींचे श्रीक्षेत्र नृसिंहवाडीस १२ वर्षे वास्तव्य होते. येथुन श्रीक्षेत्र गाणगापुरला प्रयाण करताना त्यांनी जगदोध्दारासाठी आपल्या अक्षय्य पादुका ठेवल्या. त्यावर एक मंदिर यवनराजाने उभारले. समोरील घाट संत एकनाथमहाराजांनी बांधला. शक्तीपातयोगी श्री गुळवणीमहाराजांनी मंदिरा भोवती प्रशस्त मंडप उभारला.
      हे मंदिर पूर्वाभिमुख असून देवांच्या पादुकांकडे तोंड केले असता गाभा-यात उजव्या व डाव्या बाजूस द्वारे आहेत ज्यांना उत्तरद्वार अणि दक्षिणद्वार म्हणतात. समोर कृष्णामाई उत्तरेकडुन दक्षिणेकडे वहाते.
    पर्जन्यकाळात श्रीकृष्णामाई श्रींच्या दर्शनासाठी येते आणि नदीचे पाणी चढत चढत मंदिरात शिरु लागते. ही चाहूल लागताच पुजारीमंडळी श्रींना (पंचधातुच्या पादुका, फोटो, मुखवटे व इतर चल उपकरणासह)  वरच्या बाजूस असलेल्या श्रीमन्नारायणस्वामींच्या (जेथे एरवी श्रींची पालखीतली उत्सवमूर्ती असते) मंदिरात आणून पुढचे सर्व पूजोपचार येथे चालू ठेवतात.
  इकडे कृष्णामाईचे पाणी चढत चढत उत्तरद्वार आणि समोरुन पादुकांच्या गर्भगृहात शिरते. कृष्णामाई श्रींचे दर्शन घेते आणि ते पाणी पादुकांवरुन वहात  दक्षिणद्वारावाटे हळुहळु बाहेर पडू लागते. पाणी आणखी चढल्यावर दक्षिणद्वाराने पाणी जोराने आणि भरपुर प्रमाणात बाहेर पडू लागते. हा क्षण आला क पुजारीमंडळी भोंगा अथवा घंटा वाजवुन दक्षिणद्वार सोहळा सुरु झाल्याचे जाहीर करतात.
    एरवी देवांच्या पादुकांवर अभिषेकाच्यावेळेला घातलेले पाणी साठवून तीर्थ म्हणून भक्त मंडळींना दिले जाते. परंतु आता देवांच्या पादुकांवरून डायरेक्ट येणाऱ्या पाण्यात स्नान करुन पवित्र होण्याची संधी उपलब्ध होते. तिचा फायदा घेण्यासाठी भक्तांची एकच लगबग सुरु होते. या पवित्र जलात डुबकी मारताना भक्तमंडळी आपल्या मनोकामना  देवांना सांगतात आणि श्रीमन्नृसिंहसरस्वती दत्तमहाराज, आणि कृष्णामाई कल्पतरु होऊन त्या पूर्ण करतात अशी भक्तांची श्रध्दा आहे. 
   यावेळि पाण्यास ओढ असल्याने प्रदक्षिणा मार्गावर मजबूत दोरांचे कुंपण घालून भक्तांच्या सुरक्षिततेची काळजी घेतली जाते. 
    हा सोहळा काही तास सुरु रहातो. मात्र पाणी जास्त वाढल्यास संपूर्ण देऊळ पाण्याखाली जाते आणि मग सुरक्षिततेसाठी कोणासही तिथे जाऊ दिले जात नाही.
   श्रीकृष्णामाईचा पुर ओसरतानाहि अशी स्नानाची संधी पुन्हा मिळते.
  *एकंदरीत श्रीकृष्णामाईचे पाणी उत्तर द्वारातुन देवांच्या  पादुकांवरुन वाहुन दक्षिणद्वारावाटे बाहेर पडत असताना त्यात स्नान करुन पावन होणे याला दक्षिणद्वार सोहळा म्हणतात.*
    असा सोहळा प्रत्येक पावसाळ्यात एकदोनदा तरी होतो. स्नानोत्तर काही भक्तमंडळी ते पाणी तांब्या/बाटलीत भरुन तीर्थ म्हणुन घरी नेतात.
      पाणी पूर्ण ओसरल्यावर पुजारी मंडळी सर्व मंदिर स्वच्छ करतात आणि आणखी एक भक्तीसोहळा तिथे सुरु होतो. तो म्हणजे तुळशीच्या काढ्याचा!
  आपल्या घरी पावसाळ्यात भिजणे झाल्यावर सर्दी होऊ नये म्हणुन आपली आई तुळशीचा काढा बनवून रात्री आपल्याला पाजत असे. त्याच भावनेने पुजारी मंडळी देवांना बराच काळ पाण्यात रहावे लागल्याने त्यांनाही असाच त्रास होऊ नये म्हणुन पुढचे काही दिवस तुळशीचा काढा बनवुन त्याचा नैवेद्य रात्री देवांना अर्पण करुन नंतर प्रसाद म्हणुन भक्तमंडळींना वाटतात.   
  अनंतकोटी ब्रह्मांडनायकाला सर्दी अथवा थंडीचा त्रास होईल का? परंतु भक्तीसाम्राज्यात मात्र अशा अनेक गोष्टी भक्तांकडून केल्या जातात आणि देवही लडिवाळपणे त्या गोड मानून  स्वीकारतात हे सांगायला नको.
     श्रीदत्तमहाराजांची उत्सवमूर्ती जिथे असते त्या श्रीमन्नारायणस्वामींच्या मंदिराच्या समान पातळीवर त्यांचे शिष्य काशीकरस्वामी, श्रीरामचंद्रयोगी, मौनीस्वामी, गोपाळस्वामी, टेंब्येस्वामी यांचीही मंदिरे आहेत.    
     क्वचित प्रसंगी श्रीकृष्णामाईस त्यांच्याही दर्शनाची ओढ वाटल्यास पाणी आणखी चढून त्याही मंदिरात येऊ लागते. अशावेळी पुजारी देवांसह सर्व उत्सवमूर्ती आणि पादुका वरीलप्रमाणे पालखीतुन गावात ज्या पुजा-यांची त्या सप्ताहात सेवा असेल त्याच्या घरी मुक्कामाला नेतात आणि सर्व पुजोपचार त्याच्या घरी केले जातात.
     एकाच वेळी देव आणि सर्व संन्यासी संत मंडळी गृहस्थाश्रमी पुजार्याच्या घरी येतात.  केवढे हे भाग्य! 
    हे सर्व विधी श्रीमत् परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती उर्फ थोरल्या स्वामीमहाराजांनी घालून दिलेल्या पद्धतीने पार पाडले जातात हे आणखी एक वैशिष्ट्य!
   एकंदरीत पावसाळ्यात नदीला पूर येणे या Natural Phenomenon उर्फ नैसर्गिक घटनेचे रुपांतर
भक्तीच्या महापुरात होते हे या दक्षिणद्वार सोहळ्याचे वैशिष्ट्य!
    प्रत्येक सद्बक्ताने एकदा तरी  हा सोहळा अनुभवावा हीच प्रामाणिक इच्छा.

No comments:

Post a Comment