कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला
नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने ५८ बंधारे पाण्याखाली....
भिमराव कांबळे -कोल्हापुर
कोल्हापूर शहरात आज दिवसभरात पावसाची उघडझाप सुरु होती. मात्र गगनबावडा शाहूवाडी आणि राधानगरी तालुक्यात मुसळधार पाऊस पडल्याने पंचगंगा नदीचं पाणी पहिल्यांदाच पात्राबाहेर आलं आहे. आज सायंकाळी सहा वाजता राजाराम बंधाऱ्यावर पंचगंगेची पाण्याची पातळी ३० फूट ९ इंचावर पोहचली होती.
काल आणि आज या दोन दिवसात जिल्ह्यात पावसाने चांगलाच जोर धरला आहे. बुधवारी दिवसभर आणि रात्रभर पावसाची संततधार सुरूच होती. आज सकाळ पासून कोल्हापूर शहर परिसरात पावसाची उघडझाप सुरु असली तरी धरण क्षेत्रात मात्र आज दिवसभर पावसानं झोडपून काढलं आहे. आज सकाळी आठ वाजता मागील २४ तासात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक म्हणजे १८२.७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्या पाठोपाठ शाहूवाडी तालुक्यात १२७ मिलिमीटर तर राधानगरी तालुक्यात ११९ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत जिल्ह्यातील एकूण ५८ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. यामध्ये पंचगंगा नदीवरील शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ, भोगावती नदीवरील हळदी, राशिवडे, कोगे तर तुळशी नदीवरील आरे, बीड, बाचणी आणि दुधगंगेवरील सुळकुड, बाचणी या बंधाऱ्याच्या समावेश आहे. आज सायंकाळी ६ वाजता राजाराम बंधारा इथं पंचगंगेची पाणी पातळी ३० फूट ९ इंचावर होती. रात्री पावसाचा जोर कायम राहिल्यास उद्या सकाळ पर्यंत पंचगंगेच्या पाणी पातळी आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.