पर्यायी मार्ग गेला वाहून, तरुणाच्या सतर्कतेमुळे सावित्री नदीच्या दुर्घटनेची पुनरावृत्ती टळली...
भिमराव कांबळे -कोल्हापुर
पर्यायी मार्ग गेला वाहून, तरुणाच्या सतर्कतेमुळे सावित्री नदीच्या दुर्घटनेची पुनरावृत्ती टळली...
कोल्हापूर - गारगोटी राज्यमार्गावरील राधानगरी तालुक्यातील माजगाव नजीक असणाऱ्या पुलाचे काम करण्यासाठी उभारलेला पर्यायी मार्ग पाण्याच्या दाबाने मध्यरात्री वाहून गेला. चंद्रे इथल्या सतीश पाटील या तरुणाने दाखवलेल्या सतर्कतेमुळे सावित्री नदीवरील दुर्घटनेची पुनरावृत्ती टळली. अन्यथा मोठी हानी झाली असती. मात्र या पाण्याच्या दाबाने ओढ्याच्या काठावरील शेती पम्प वाहून जाऊन शेतात पाणी शिरल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे.
कोल्हापूर गारगोटी रोडवरील चंद्रे - शेळेवाडी दरम्यान माजगाव नजीक असणाऱ्या बाबळकाठ ओढ्यावरील पुलाचे काम गेली अडीच ते तीन वर्षे संथ गतीने सुरू आहे. या राज्यमार्गावर मोठ्याप्रमाणात वाहतूक असल्याने जितेंद्रसिंग प्रायव्हेट लिमिटेड या संबंधीत ठेकेदार कंपनीने ओढ्यावर पर्यायी मार्ग तयार केला होता. पर्यायी मार्ग तयार करताना या ओढ्याच्या पाण्याच्या प्रमाणात विसर्गाचे नियोजन न केल्यामुळे गुरुवारी मध्यरात्री पाण्याचा तुंब वाढून पाण्याच्या दाबाने पर्यायी मार्ग वाहून गेला. यावेळी चंन्द्रे इथले सतीश पाटील ही बाब लक्षात येताच सतर्कता दाखवत वाहने अडवली आणि घटनेची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागासह आपत्ती विभागाला कळवली. आज सकाळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रतिनिधी घटनास्थळी दाखल झाले तोपर्यंत सतीश पाटील यांनी रातभर त्याच ठिकाणी थांबून वाहतूक अडवून जीवितहानी टाळली. या कार्याबद्दल सतीश यांचं सध्या कौतुक होतं आहे.
संबंधित कंपनीच्या प्रतिनिधींना कळवूनही त्यांचा प्रतिनिधी सकाळी अकरा वाजेपर्यंत न आल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने जेसीबीच्या सहाय्याने नवीन पुलावरून मार्ग सुरू करण्याचे काम सुरू केलं होतं, यावेळी कंपनीचा प्रतिनिधी दाखल होताच संतप्त शेतकऱ्यांनी ठेकेदार कंपनीच्या चुकीमुळे प्रवाह रोखल्यामुळे तुंब लागून ओढ्याच्या काठावरील शेती पंपाबरोबर शेतीचे मोठे नुकसान झालंय त्याची नुकसान भरपाई दिल्याशिवाय काम सुरू करू देणार नाही अशी भूमिका घेतली.ठेकेदाराने नुकसान भरपाई देण्याचा तोडगा काढल्यानंतर संतप्त शेतकऱ्यांनी काम सुरू करू दिलं. या ठिकाणावरील वाहतूक पूर्णपणे थांबवून गारगोटीहुन येणारी वाहने चंद्रे - बाचणी - कोल्हापूर आणि तळाशी - बारडवाडी - भोगावती - कोल्हापूर या पर्यायी मार्गावरून सुरू ठेवण्यात आली आहे.