महाराष्ट्रात कोरोना सोबत निपाहाचे संकट ;मिनी काश्मीर महाबळेश्वर येथील वटवाघळांमध्ये सापडले विषाणू
प्रतीक मिसाळ महाबळेश्वर
कोरोनाची दुसरी लाट सुरू असताना आता तिसऱ्या लाट येण्याची शक्यता आहे . अशावेळी आता राज्यातील वटवाघळांच्या दोन प्रजातींमध्ये निपाह विषाणू आढळून आला आहे . याबाबतचे पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरोलॉजीच्या तज्ज्ञांनी संशोधन केलं आहे . निपाह विषाणू सातारा जिल्ह्यातील मिनीकाश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वरमधील गुफेत मार्च २०२० मध्ये आढळून आला आहे . याआधी राज्यात कधीही वटवाघळांमध्ये निपाह विषाणू आढळून आला नव्हता अशी माहिती याबद्दलचं संशोधन करणाऱ्या पथकाच्या प्रमुख डॉ . प्रज्ञा यादव यांनी दिली . देशात याआधी काही राज्यांमध्ये निपाह विषाणू आढळून आला आहे . मात्र महाराष्ट्रात पहिल्यादांच आढळला असून हा विषाणू वटवाघूळांमधून माणसांमध्ये संक्रमित होतो . निपाह विषाणू अतिशय धोकादायक मानला जातो . निपाहवर कोणतंही औषध किंवा लस उपलब्ध नाही .
निपाह हा विषाणू 1998-99 मध्ये सर्वप्रथम आढळून आला होता . भारतात 2018 मध्ये केरळ राज्यात वटवाघळाच्या माध्यमातून पसरला होता . यावेळी या निपाहने केरळ राज्यात थैमान घातले असल्याने राज्याची सिमा बंद ठेवण्यात आल्या होत्या . आता महाबळेश्वर येथे हा विषाणू आढळून आल्याने नागरिक भीतीच्या वातावरणात आहेत,करोना बाबत प्रशासनाने नियम शिथिल केल्याने येथील व्यापारी आनंदात होते.पर्यटकांचा ओढाही वाढत होता,परंतू या बातमी नंतर पर्यटकांनी जर महाबळेश्वर कडे पाठ फिरवली तर उपाशी राहण्याची वेळ येऊ शकते ही चिंता आता व्यापाऱ्यांना लागून राहिली आहे. कोरोना सोबत निपाहचा पण सामना करावा लागणार की काय असे चित्र निर्माण झाले आहे .