अथक प्रयत्नाने अखेर कुत्र्याची सुटका
अडकलेला कुत्रा त्या परिस्थितीत देखील आक्रमकता दाखवत होता. तेथे उपस्थित एका व्यक्तीने त्याची मान सोडवण्यासाठी प्रयत्न केला असता त्याच्या हाताचा त्याने कडकडुन चावा घेतला होता.
त्या कुत्र्याला सुखरूप बाहेर काढणे जितके महत्वाचे होते तेवढेच वाचविणाऱ्यांना स्वतःची सुरक्षितता महत्वाची होती, त्यामुळे प्लॅनिंग ठरले. ग्रील कापूनच जे काही करायचे ते करता येणार होते. ग्राइंडर सुरू केला आणि कुत्र्याची हालचाल वाढली. आता तिसरी कसरत होती ती म्हणजे अडचणीत उभे राहून एका हाताने मशीन चालवणे.
तोवर नवीन मोरे, धर्मेंद्र रावळ, अमोल ठकेकर, हनिफ कर्जीकर जॉईन झाले आणि खऱ्या अर्थाने ऑपरेशन सुरू झाले.
एकंदर हालचाल पाहून त्या कुत्र्याची सुद्धा खात्री झाली होती की त्याला वाचविण्यासाठी सगळं काही सुरू आहे. काहीवेळापूर्वी आक्रमक असलेला तो कुत्रा शांत झाला होता. सुरक्षितता म्हणून त्याच्या तोंडाला फास घालून पकडून ठेवले होते आणि त्याचे पाय देखील पकडले होते. तोंडाला आणि डोळयांना ग्राइंडरच्या ठिणग्यांनी इजा होऊ नये म्हणून ओल्या कपड्याने तोंड झाकले होते. त्या कुत्र्याने स्वतःला सोडवण्यासाठी प्रयत्न करताना पाय आणि शरीर घासून स्वतःला इजा करून घेतली होती. सगळीकडे रक्त सांडले होते. एक एक करत लोखंडी बार कापले जात होते. जास्त ताकद सुद्धा लावता येत नव्हती. तब्बल पाऊण तासाच्या खटपटी नंतर सर्वांनी स्वतःला सेफ करून घेत एक झटका दिल्याने त्याची मान सुटताच त्याने स्वतःला सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आणि काही क्षणात तो मोकळा झाला. त्या भिंतीवरून त्याने उडी मारत मोकळ्या वातावरणात धूम ठोकली.
संयुक्त प्रयत्नांनी सुटका केल्याचा आनंद सर्वांच्या चेहऱ्यावर दिसत होता. त्या कुत्र्याच्या धपडण्याने आणि विव्हळण्याने काही तास त्या ठिकाणी निर्माण गंभीर झालेला माहोल त्याच्या सुरक्षित सुटकेने जणू पालटून गेला होता.
गुरुनाथ रामचंद्र साटेलकर-खोपोली