Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

सांगली शहरात पुराचे पाणी मोठ्या प्रमाणावर पसरू नये यासाठी धरणातून होणारा विसर्ग नियंत्रित -पालकमंत्री जयंत पाटील

 सांगली शहरात पुराचे पाणी मोठ्या प्रमाणावर पसरू नये यासाठी धरणातून होणारा विसर्ग नियंत्रित -पालकमंत्री जयंत पाटील

पाणीपातळी स्थीर ठेवण्यासाठी प्रयत्नशील

उमेश पाटील-सांगली


 सकाळी 8 पासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत साधारणपणे 100 मि.मी. पाऊस पडल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सांगली आर्यविन पूल येथे पाणीपातळी 52 फूटापर्यंत पोहोचेल असा सुरूवातीचा अंदाज होता. पण काहीसा पावसाचा जोर मंदावल्यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग मर्यादित करण्यात आला. सांगली शहरामध्ये पाणी अधिक प्रमाणात जावू नये यासाठी पाणी विसर्ग नियंत्रित करून आर्यविन पूल येथे 45 ते 46 फूटापर्यंत पाणीपातळी राहील या पध्दतीने नियोजन करण्यात येत आहे. अशी माहिती जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिली.

राजापूर बंधाऱ्यावर कोयनेमधला विसर्ग हा जवळपास 45 हजार क्युसेक्सचा आहे. सातारा जिल्ह्यातील 4 धरणे व कोयना धरणामधील विसर्ग असा एकूण विसर्ग जवळपास 1 लाख क्युसेक्स आहे. सर्व मिळून राजापूर बंधाऱ्यातून पुढे जाणारा एकूण विसर्ग हा जवळपास 2 लाख क्युसेक्स पर्यंत आता असल्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी सांगितले.


 

जिल्ह्यात पूरस्थितीमुळे 7 हजार 671 कुटुंबातील 36 हजाराहून अधिक व्यक्तींचे स्थलांतर
-         जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी
14 हजार 800 जनावरांचेही स्थलांतर
 जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पुरपट्यातील नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात येत आहे. आत्तापर्यंत 7 हजार 671 कुटुंबातील 36 हजार 987 व्यक्तींचे स्थलांतर करण्यात आले आहे. तसेच लहान व मोठी अशा एकूण 14 हजार 800 जनावरांचेही स्थलांतर करण्यात आले आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.
जिल्ह्यात पूरस्थितीमुळे पूर्णत: बाधित 6, अंशत: बाधित 80 अशी एकूण 86 गावे बाधित आहेत. यामध्ये मिरज तालुक्यात महानगरपालिका क्षेत्रात अंशत: 1 गाव बाधित आहे. मिरज ग्रामीण मध्ये 2 गावे पूर्णत: तर 2 गावे अंशत: अशी ४ गावे बाधित आहेत. अप्पर सांगली (ग्रामीण) मध्ये 15 गावे अंशत: बाधित आहेत. वाळवा तालुक्यात वाळवा येथील 2 गावे पूर्णत:, 27 गावे अंशत: अशी एकूण 29 गावे बाधित आहेत. अपर आष्टा क्षेत्रातील 1 गाव पूर्णत:, 3 गावे अंशत: अशी एकूण 4 गावे बाधित आहेत. शिराळा तालुक्यातील अंशत: 13 गावे बाधित आहेत. तर पलूस तालुक्यातील 1 गाव पूर्णत:, 19 गावे अंशत: अशी एकूण 20 गावे बाधित आहेत.
स्थलांतरीत व्यक्तींमध्ये मिरज तालुक्यातील महानगरपालिका क्षेत्रातील 234 कुटुंबामधील 1 हजार 6 व्यक्ती, मिरज ग्रामीण क्षेत्रातील 307 कुटुंबातील 2 हजार 207 व्यक्ती, अपर सांगली ग्रामीण मधील 1 हजार 424 कुटुंबातील 5 हजार 749 व्यक्तींचे स्थलांतरण करण्यात आले आहे. वाळवा तालुक्यातील वाळवा क्षेत्रातील 2 हजार 452 कुटुंबातील 14 हजार 725 व्यक्तींचे तर अपर आष्टा क्षेत्रातील 424 कुटुंबातील 2 हजार 135 व्यक्तींचे स्थलांतरण करण्यात आले आहे. शिराळा तालुक्यातील 394 कुटुंबातील 1 हजार 842 व्यक्तींचे , पलूस तालुक्यातील 2 हजार 436 कुटुंबातील 9 हजार 323 व्यक्तींचे स्थलांतरण करण्यात आले आहे.
यामध्ये जनावरांचे मिरज तालुक्यातील मिरज ग्रामीण क्षेत्रातील 1 हजार 219, अपर सांगली ग्रामीण क्षेत्रातील 1 हजार 746, वाळवा क्षेत्रातील 3 हजार 262, अपर आष्टा क्षेत्रातील 1 हजार 90, शिराळा तालुक्यातील 2 हजार 228, पलूस तालुक्यातील 5 हजार 255 जनावरांचे स्थलांतरण करण्यात आले आहे. वाळवा तालुक्यातील 5 व पलूस तालुक्यातील 3 अशा एकूण 8 जनावरांची जीवितहानी झाली आहे.


 स्थलांतरीत करताना अधिकची सतर्कता बाळगा

अपघात होणार नाही याकडे कटाक्षाने लक्ष द्या

-         जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

 स्थलांतरीत करताना अधिकची सतर्कता बाळगा. अपघात होणर नाही याकडे कटाक्षाने लक्ष द्या. जास्तीत जास्त रस्त्याने, पायवाटेने स्थलांतरण करा. बोटीची आवश्यकता पडणार नाही याप्रमाणे स्थलांतराची प्रक्रिया राबवा, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले.

वाळवा, शिरगाव येथील पूरपरिस्थितीची पाहणी करताना जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी बोलत होते. यावेळी तहसिलदार दिक्षांत देशपांडे, गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे, वाळव्याच्या सरपंच शुभांगी माळी, वैभव नायकवडी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, स्थलांतर प्रक्रियेसाठी जिल्हास्तरावरून आवश्यक ती मदत तातडीने उपलब्ध करून देण्यात येईल. ज्या ठिकाणी नागरिक स्थलांतरास सहकार्य करणार नाहीत त्या ठिकाणी सक्तीने स्थलांतर करण्यात यावे. कोणताही धोका पत्करू नये. जिल्हा नियोजन मधून देण्यात आलेल्या 10 बोटींचा आवश्यकतेनुसार उपयोग करावा. एनडीआरएचची एक टीम तैनात असून तीच्या मदतीने स्थलांतर करण्यात यावे. सातारा जिल्ह्यामध्ये उद्या अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे अधिकचा पाऊस झाल्यास कोयनेतून होणाऱ्या विसर्गाचे पाणी साधरणत: 8 ते 10 तासात सांगली जिल्ह्यापर्यंत पोहोचते. त्या अनुषंगाने त्वरीत स्थलांतराची प्रक्रिया राबवावी. वाळव्यासाठी 75 लाईफ जॅकेटचा पुरवठा करण्यात आला आहे. स्थलांतर करत असताना प्रत्येक व्यक्तीला लाईफ जॅकेट घातल्याशिवाय त्यांचे स्थलांतर करू नये. बोटी चालविणाऱ्या व्यक्ती प्रशिक्षीत असल्याशिवाय त्यांना बोटी हाताळू देवू नये.

वाळवा गावामध्ये आत्तापर्यंत  सुमारे 4 हजार व्यक्तींचे स्थलांतरण करण्यात आले असून 4 ठिकाणी निवारा केंद्रे उभारण्यात आली आहेत. यामध्ये 300 व्यक्तींना आश्रय देण्यात आला असल्याचे सांगून जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, ज्या कुटुंबांची स्थलांतरासाठी स्वतंत्र सोय असेल, ज्यांची नातेवाईकांकडे जाण्याची इच्छा असेल अशांनी त्या ठिकाणी स्थलांतरीत व्हावे. वाळवा व परिसरात पाण्याची धोक्याची वाढती पातळी पाहता त्या परिसरात रात्रीच्या वेळी जागरूक रहावे. तसेच पाण्याची पातळी ज्या प्रमाणात वाढेल त्या प्रमाणे गावात सूचित करण्यात यावे. रात्री वाढणाऱ्या पाणी पातळीवर लक्ष ठेवण्यात यावे, असे आदेश त्यांनी यावेळी दिले.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies