कोल्हापूरात चार दिवसांनी सूर्यदर्शन ;महापूराचा धोका टळतोय.सकाळी ९ वाजता पाणी पातळी ५५ फूट ७ इंच
भिमराव कांबळे -कोल्हापुर
शुक्रवारी मध्यरात्री पासून पावसाने उसंत घेतल्याने कोल्हापूर करां साठी ही रात्र दिलासा देणारी ठरली.पावसाचा जोर ओसरल्यामुळे आणि राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे सकाळ पर्यंत बंदच राहिल्यामुळे महापूराचा धोका कमी होऊ लागला आहे. तब्बल चार दिवसांनी आज सकाळी सूर्यदर्शन झाल्यामुळे कोल्हापूरकर सुखावले आहेत.
बुधवार पासून शुक्रवारी मध्यरात्री पर्यंत कोल्हापूर जिल्ह्यात विक्रमी पाऊस झाला.यामुळे पंचगंगेसह जिल्ह्यातील सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली.२०१९ च्या महापूरावेळी पंचगंगा नदीने सर्वाधिक ५५ फूट ७ इंच इतकी पातळी गाठली होती.शुक्रवारी सकाळी ९ वाजता राजाराम बंधाऱ्याच्या ठिकाणी ४८ फूट १ इंच इतकी पाणी पातळी होती.शुक्रवारी रात्री ११ वाजे पर्यंत ही पातळी ५५ फूट १० इंचा पर्यंत पोहचली.पावसाचा जोर कायम राहिला आणि धरणातून विसर्ग सुरु झाला तर भीषण परिस्थिती निर्माण होण्याची भीती होती.पहाटे ३ वाजता पंचगंगेने आतापर्यंतची सर्वाधिक ५६ फूट ३ इंच इतकी पातळी गाठली.पण सुदैवाने मध्यरात्री पासून पावसाचा जोर पूर्ण पणे ओसरल्यामुळे पहाटे पासून पाणी पातळीत घट होत आज सकाळी ९ वाजता ५५ फूट ७ इंचा पर्यंत पातळी खाली आली आहे.ही पातळी २०१९ ची सर्वोच्च पातळी असली तरी धरण क्षेत्रातील पावसाचा कमी झालेला जोर बघता धरणातून विसर्ग झाला नाही आणि पावसाने दिवसभर उसंत घेतली तर पाणी पातळीत वेगाने घट होईल.
आता पावसाने दिलेली उसंत लोकांच्या स्थलांतरणासाठी उपयुक्त ठरणार आहे.