देवर्डेचा युवा शेतकरी गहू उत्पादनात प्रथम
२३ क्विंटल चा उतारा : योग्य नियोजनाचा वापर
उमेश पाटील-सांगली
देवर्डे तालुका वाळवा येथील विलास पाटील या युवा शेतकऱ्याने गहू उत्पादनात वाळवा तालुक्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे. त्यांनी अवलंबलेल्या उत्पादन प्रक्रिया समजून घेण्याकरिता वाळवा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या कडून त्यांच्याकडे अभ्यासू माध्यमातून विचारणा होऊ लागली आहे. या युवा शेतकऱ्याचे देवर्डे सह परिसरातून कौतुक व अभिनंदन व्यक्त होत आहे.
कृषी विभाग वाळवा यांच्याकडून देवर्डेचे प्रगतशील गहू उत्पादक शेतकरी विलास पाटील यांचा सत्कार समारंभ वाळवा कृषी विभागाकडून सभापती सौ. शुभांगीताई पाटील व उपसभापती नेताजी पाटील, कृषी अधिकारी भगवानराव माने यांच्या उपस्थितीत पार पडला.
देवर्डेचे युवा शेतकरी विलास पाटील यांनी गहूच्या पेरणी करिता अंकुर कंपनीच्या केदार वाणाच्या बियाण्याची निवड केलेली होती. पेरणी पाटकी पद्धतीने करण्यात आली होती. ४७ गुंठे क्षेत्रामध्ये २१ पाटकी तयार करून त्यामध्ये ६० किलो बियाणे विस्कटून पेरणी करण्यात आली होती. गहू उत्पादनाचा एकूण कालावधी तीन महिने राहिला. या तीन महिन्यांमध्ये २१ दिवसांच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या देण्यात आल्या. वेळेनुसार पाण्याचे व खताचे नियोजन करण्यात आले होते. एकूण २३ क्विंटल गहू उत्पादन मिळाले असून हे उत्पादन शास्त्रोक्त पद्धतीच्या मूल्यमापनात उच्चतम स्तरावरचे आहे. युवा शेतकरी विलास पाटील यांच्याकडून पीक उत्पादनाच्या बाबतीत नियोजनाचा वापर केल्याने त्यांना भरघोस उत्पादन लाभले आहे. अनेक बाबींचा लेखाजोखा बघून वाळवा कृषी कडून वाळवा तालुक्यात त्यांना प्रथम क्रमांकाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
याप्रसंगी युवा शेतकरी विलास पाटील म्हणाले, शेती ही परंपरागत न करता आता शेतीला आधुनिकतेची जोड देणे गरजेचे बनले आहे. शेती विकासाला आगामी काळात चालना द्यावयाची असेल तर शेतीकडे व शेती उत्पादनाकडे व्यवसायाच्या नजरेने पाहणे गरजेचे आहे. व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून जर शेती केली तर निश्चित शेती शेतकऱ्याला अतिशय फलद्रुप व फायदेशीर ठरणारी आहे. शेतीच्या बाबतीत युवा वर्गा कडून नाराजी व्यक्त केला जात आहे. परंतू व्यावसायिक दृष्टिकोनातून नियोजन केल्यास शेती आपल्याला निश्चितपणे फायद्याची ठरू शकते यात शंका नाही.
कृषी सहाय्यक राहूल देशमुख यांनी शासनाच्या कृषी विभागाच्या माध्यमातून वेळोवेळी मदत केली तर दिपक कदम यांनी खतांचे व्यवस्थापन मार्गदर्शन केले आहे. याशिवाय सरपंच भाग्यश्री पाटील,उपसरपंच संजयकुमार पाटील, ग्रामपंचायत सदस्य शुक्राचार्य लास्कर, शुभांगी कांबळे, सिमा कुंभार, स्वाती पाटील विलास पाटील आदींनी सहकार्य व मार्गदर्शन केले आहे.