Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

तासगावात खासदारांच्या कार्यालयावर भव्य मोर्चा

 तासगावात खासदारांच्या कार्यालयावर भव्य मोर्चा

ऊस बिलासाठी 'स्वाभिमानी' आक्रमक : उद्या शहरात भीक मांगो आंदोलन

 सुधीर पाटील-सांगली

 तासगाव आणि नागेवाडी साखर कारखान्याच्या थकीत ऊस बिलासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने खासदार संजय पाटील यांच्या संपर्क कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. यावेळी खासदार पाटील यांनी बिले देण्यासाठी 15 ते 20 दिवसांची मुदत मागितली. मात्र शेतकऱ्यांनी खासदारांची विनवणी धुडकावून लावली. जोपर्यंत ऊस बिले मिळत नाहीत तोपर्यंत खासदारांच्या संपर्क कार्यालयासमोर ठिय्या मारण्याचा निर्धार यावेळी शेतकऱ्यांनी केला. शिवाय ठिय्या मारलेले शेतकरी उद्या (बुधवार) सकाळी शहरातून घरोघरी जाऊन भीक मांगो आंदोलन करतील. या आंदोलनातून जमलेल्या भाजी - भाकरीतून शेतकरी आपली गुजराण करतील, अशी माहिती स्वाभिमानीने जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी यावेळी दिली.

तासगाव आणि नागेवाडी येथील साखर कारखाने सांगलीचे भाजपचे खासदार संजय पाटील हे चालवतात. त्यांच्यावर विश्वास ठेवून हजारो शेतकऱ्यांनी या कारखान्यांना ऊस घातले आहेत. मात्र ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्याच खासदारांनी आपला विश्वासघात केल्याची भावना शेतकऱ्यांची झाली आहे. दोन्ही कारखान्याच्या सुमारे सात ते आठ हजार शेतकऱ्यांची सुमारे 35 ते 40 कोटी ऊस बिले खासदारांनी थकवली आहेत.

 गेल्या सहा महिन्यांपासून ही बिले मिळावीत, या मागणीसाठी शेतकरी कारखाना स्थळावर हेलपाटे मारत आहेत. मात्र खासदार आणि कारखाना प्रशासन शेतकऱ्यांना दाद देत नाही. त्यामुळे संतापलेल्या शेतकऱ्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली तब्बल तीन वेळा मोर्चे काढून आंदोलने केली आहेत. प्रत्येक आंदोलनावेळी खासदार आणि कारखाना प्रशासन शेतकऱ्यांना आश्वासनेच देत आहेत. मात्र एकही आश्वासन पाळले गेले नाही.

  त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आज पुन्हा स्वाभिमानाच्या नेतृत्वाखाली खासदार संजय पाटील यांच्या संपर्क कार्यालयावर मोर्चा काढला. मोर्चात शेकडो शेतकरी सहभागी झाले होते. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून या मोर्चास सुरुवात झाली. त्यानंतर मारुती मंदिर, गणपती मंदिर, जोशी गल्ली, वंदे मातरम चौक, बस स्टँडमार्गे हा मोर्चा खासदारांच्या मार्केट यार्डातील कार्यालयावर धडकला. मोर्चात संतप्त शेतकऱ्यांनी  ऊस बिल आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे, कोण म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही', अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.

दरम्यान, मोर्चा मार्केट यार्डात आल्यानंतर त्याठिकाणी खासदार संजय पाटील शेतकऱ्यांना भेटले. त्यांनी शेतकऱ्यांची माफी मागत येत्या 15 ते 20 दिवसात ऊस बिले देण्याची ग्वाही दिली. मात्र शेतकरी काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. काहीही झाले तरी ऊस बिले घेतल्याशिवाय इथून परत जाणार नाही, अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली.

 यावेळी महेश खराडे म्हणाले, तासगाव आणि नागेवाडी कारखान्याची ऊस बिले गेल्या सहा महिन्यांपासून मिळाली नाहीत. शेतकऱ्यांना अनेक अडचणी आहेत. कोरोना काळ सुरू आहे. बळीराजा मेटाकुटीला आला आहे. त्यामुळे जोपर्यंत ऊस बिले मिळत नाहीत तोपर्यंत मागे हटायचे नाही, असा निर्धार शेतकऱ्यांनी केला आहे. 

 मोर्चात पोपट मोरे, संदीप राजोबा, भागवत जाधव, संजय बेले, राम पाटील, यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी अशोक खाडे, दामाजी डुबल, गुलाब यादव, भुजंग पाटील, राजेंद्र माने, भरत चौगुले, श्रीधर उडगावे, प्रकाश देसाई, मुकेश चिंचवाडे, संदेश पाटील, संदीप शिरोटे, माणिक शिरोटे, अनिल पाटील, सुरेश पचीब्रे, सुशांत जाधव, महेश जगताप,  विनायक पवार, राजेंद्र पाटील यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies