बुलेट ट्रेनचे भूसंपादन सुपर फास्ट वेगाने ? - महाराष्ट्र मिरर

Breaking


Post Top Ad

Saturday, July 17, 2021

बुलेट ट्रेनचे भूसंपादन सुपर फास्ट वेगाने ?

 बुलेट ट्रेनचे भूसंपादन सुपर फास्ट वेगाने ?

 इंदापूरातील १२ गावांतील बाधितांच्या सामाजिक सर्वेक्षणाला सुरवात , 

बारामतीतही होणार सुरवात !

              सतीश पवार -बारामती

केंद्र सरकारचा महत्वांकाक्षी प्रकल्प असलेल्या मुंबई -हैदराबाद हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचे फक्त लिडार सर्वेक्षण झाल्यानंतर लागलीच दुसऱ्याच महिन्यात या मार्गातील बाधित प्रकल्पग्रस्तांच्या सातबाराची मागणी करण्यात आली असून आयआयएमआर रिसर्च फाऊंडेशनने आज इंदापूर तालुक्यात सामाजिक सर्वेक्षणालाही सुरवात केली आहे . या तालुक्यातील निंबोडी , लाकडी , सणसर , बेलवाडी , थोरातवाडीसह दहा गावांचे यामध्ये सर्वेक्षण केले जाणार असून ज्या भागातून रेल्वे जाणार आहे , त्याच भागातील प्रकल्प बधित शेतकऱ्यांच्या कुटुंबांचे हे सर्वेक्षण केले जाणार आहे . दोन दिवसांपूर्वीच सोलापूर जिल्ह्यातील १०० गावांच्या सामाजिक सर्वेक्षणास सुरवात झाली आहे . त्यापाठोपाठ आता पुणे जिल्ह्यातही ही सुरवात झाली आहे .त्यामुळे बुलेट ट्रेनचा प्रकल्प हा संत तुकाराम महाराज किंवा ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गाप्रमाणे रडतखडत चालणार नाही अशीच चिन्हे दिसत आहेत . इंदापूर तालुक्यात मागील दोन महिन्यांपूर्वी जी जीपीएस नोंदणी झाली , त्यानुसारच हा मार्ग राहणार असल्याचे जवळपास शिक्कामोर्तब झाले आहे .

आज यासंदर्भात आयआयएमआर संस्थेचे निलेश हिरवाळे यांनी माहिती देताना सांगितले की , आम्ही प्रकल्प बाधितांची थेट भेट घेत आहोत , तसेच गावातही इतरांशी संवाद साधून या प्रकल्पाचे सामाजिक परिणाम काय होतील ? या प्रकल्पातून संबंधितांच्या काय अपेक्षा आहेत हे जाणून घेत आहोत . त्यासाठी अगोदर त्या गावातील जे गट क्रमांक व जमीनी बाधित होणार आहेत , त्याची संपूर्ण माहिती देत आहोत . हेच सर्वेक्षण सणसर , जाचकवस्ती , बेलवाडी , थोरातवाडीसह दहा गावांतून केले जाणार आहे . बारामती तालुक्याची बाधित जमीनधारकांची यादी अद्याप आम्हाला मिळालेली नाही . मात्र सध्या इंदापूर तालुक्याचे हे सामाजिक सर्वेक्षण सुरू असून बारामतीचेही लवकरच होईल .

दरम्यान यासंदर्भात तहसीलदार अनिल ठोंबरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांना या प्रकाराची कोणतीही पूर्वकल्पना नसल्याचे समोर आले . यासंदर्भात कोणतीही माहिती त्यांच्याकडे उपलब्ध नव्हती . यासंदर्भात कोणत्याही शासकीय अथवा खासगी यंत्रणेने आमच्याशी संपर्क साधलेला नसल्याचे त्यांनी सांगितले . अर्थात या संस्थेने शेतकऱ्यांच्या गटासह सर्व नोंदी आणलेल्या आहेत . पुढील काही दिवस इंदापूर तालुक्यातील सर्व सर्वेक्षण ही संस्था करणार असल्याने शासकीय यंत्रणेला याची माहिती असण्याची गरज आहे .

कसा असेल

 प्रकल्प ७०० किलोमीटरचा बुलेट ट्रेनचा प्रकल्प , ११ रेल्वे स्टेशन प्रस्तावित . पहिला कुरकुंभ नजिकचा मार्ग बदलून हा मार्ग नव्याने इंदापूर , बारामतीमार्गे जाण्यावर शिक्कामोर्तब सरासरी ३५० व सर्वाधिक ४५० किलोमीटर असेल वेग . जलदगतीने प्रकल्प पूर्ण करण्यावर रेल्वे मंत्रालयाचा भर

No comments:

Post a Comment