कृषी उत्पन्न बाजार समिती बिनविरोध करावी शिवसेना नेते शेखरभाऊ गोरे यांचं आवाहन
प्रतीक मिसाळ -माण
मागील काही दिवसांपूर्वी निवडणूक लागलेली माण तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती सर्वपक्षीय नेत्यांच्या प्रचार , गाठीभेटी मुळे चर्चेत आली असून डबघाईला आलेल्या या बाजार समिती मध्ये सर्वच राजकीय पक्षांनी प्रतिष्ठेचा प्रश्न निर्माण केला आहे . मात्र या निवडणूकित येणारा खर्च आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या समितीला आणखी अडचणीत टाकणारा असल्याने ही निवडणूक बिनविरोध करण्याचं आवाहन माण खटाव चे शिवसेना नेते शेखरभाऊ गोरे यांनी सर्वांना केलं आहे . तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती अनेक वर्षांपासून आर्थिक अडचणीत असून कामगारांच्या पगारा पासुन इमारतीची दुरुस्ती विविध सोयी मिळणे अवघड होऊन ती मोडकळीस आली आहे . या बाजार समितीला उभारी देण्याची गरज आहे . सातारा जिल्ह्याबरोबरच माण खटाव तालुक्यातही कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव असून काही गावे रेडझोनमध्ये आहेत . असे असतानाही माण तालुक्यात कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक लादण्यात आली आहे.वास्तविक बाजार समिती आर्थिक अडचणीत आहे . आजपर्यंत सर्वांनीच फक्त सत्तेची चव चाखली आहे मात्र बाजार समिती सुस्थितीत आणण्यासाठी कोणीच प्रयत्न केले नाहीत.त्यामुळे या समितीची निवडणूक लावून तिला आणखी आर्थिक खाईत लोटण्यापेक्षा समितीच्या हितासाठी निवडणूक बिनविरोध होणे गरजेचे आहे.यासाठी आपण शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्नशील राहणार आहे . सर्वच पक्षांनी अर्ज भरले असले तरी अजूनही वेळ गेलेली नाही . विरोधकांनीही याचा विचार करून कमी जास्त जागा घेऊन निर्णय घ्यावा . माण तालुक्यातील शेतकरी कठीण परिस्थितीतून कांदा , ज्वारी , गहू , बाजरी , मूग , मका , घेवडा , भाजीपाला , फळबागां तून चांगली पीके काढत असतात.मात्र त्यांच्या मालाला चांगले दर मिळत नाहीत.तालुक्यात बाजारपेठ नाही . मालाची विक्री करण्यासाठी पर तालुक्यात जिल्ह्यात जावे लागते . पिकांना हमीभाव नसल्याने येईल त्या दराने मालाची विक्री करावी लागते . यामुळे शेतकरीवर्गाचे नुकसान होते.माण बाजार समितीत बाजारपेठ असती , मालाची खरेदी विक्रीचे व्यवहार झाले असते तर शेतकऱ्यांना बाहेर जावे लागले नसते.यातून बाजार समितीलाही आर्थिक सुबत्ता येऊन शेतकऱ्यांनाही न्याय मिळाला असता . बारामती , फलटण , कराड , कोरेगाव , लोणंद सारख्या बाजार समित्याप्रमाणे आपली माणची बाजार समिती का नाही.कारण आजपर्यंत कोणीच बाजार समितीच्या हिताचे निर्णय घेतले नाहीत.माण तालुका बाजार समितीकडे आर्थिक परिस्थिती सुधारण्याचे कोणतेच साधन नाही . त्यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या बाजार समितीला बाहेर काढणे गरजेचे आहे.आपण सर्वजणांनी या समितीच्या निवडणूकीसाठी रणशिंग फुकले आहे . नक्की काय आहे या समितीत ... ती ताब्यात घेण्यासाठी सर्वजण प्रयत्न करतोय.यापेक्षा निवडणूक बिनविरोध करून आसपासच्या बाजार समित्याप्रमाणे माणची बाजार समिती आयडीयल बनवूयात.यासाठी सर्वांनी शेतकऱ्यांच्या व समितीच्या हितासाठी एकत्र येत जागांवर एकमत करून बिनविरोध साठी निर्णय घेऊयात असे आवाहनही शेखरभाऊ गोरे यांनी केले आहे .