बारामतीतील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येने अजितदादा चिंताग्रस्त ! आरोग्य खात्याच्या अधिकायांविषयी व्यक्त केली नाराजी .. ! सुधारणा न झाल्यास , बदलीचा दिला इशारा .. !
सतीश पवार -बारामती
बारामतीतील अजितदादांची बैठक तशी अधिकाऱ्यांसाठी कधीच जिकीरीची नसते . अजितदादांनी नेहमीच बारामतीत प्रशासकीय अधिकाऱ्यांना स्वातंत्र्य दिले आहे . कधीकधी त्याचाही गैरफायदा काही अधिकारी घेत असतात . माधुरी शक्यतो अधिकाऱ्यांना त्यांच्या कामात स्वातंत्र्य देऊन अधिकाधिक चांगली कामे करून घेण्यावर अजित दादांचा प्रशासनिक भर असतो आणि हे संपूर्ण महाराष्ट्रातील त्यांच्या कार्यकाळात त्यांच्या नेतृत्वाखाली काम केलेल्या अनेक अधिकाऱ्यांना माहित झाले आहे . मात्र शनिवारच्या बैठकीत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अगदी पाच सहा वर आलेली रुग्णसंख्या पुन्हा वाढल्याने व आरोग्य खाते संदर्भात वेगवेगळ्या ठिकाणाहून प्रतिक्रिया आल्याने अजितदादांनी आरोग्याच्या प्रश्नावर नाराजी व्यक्त करीत संबंधितांना फैलावर घेतल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून समजते . उपमुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून अजितदादा प्रचंड वेगाने काम करीत आहेत . या कामातनही ते बारामतीसाठी आठवड्यातून किमान एक दिवस देत आहेत . यातही अगदी पहाटेपासून विकासकामांची पाहणी करीत त्यांच्या दर्जाबाबत काटेकोरपणे तपासणी करीत आहेत . आजही नेहमीप्रमाणे अजितदादांनी बारामतीच्या नव्या बसस्थानकाच्या कामाची पाहणी सकाळी सहा वाजताच केली . यावेळी त्यांनी कामांची माहिती घेत दर्जा राखण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या . यानंतर इतरही कामांची त्यांनी पाहणी केली .
त्यानंतर नेहमीप्रमाणे नागरिकांना भेटून अजित पवार यांनी कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेतला . या आढाव्यादरम्यान प्रशासकीय अधिकारी व राष्ट्रवादीचे पदाधिकारी या बैठकीस उपस्थित होते . या बैठकीतच अजितदादांनी आरोग्याच्या बाबतीत नाराजी व्यक्त करीत आरोग्याशी संबंधित अधिकाऱ्यांना विचारणा करीत तीव्र नाराजी व्यक्त केली व कामात सुधारणा झाली नाही , तर बदलीचा पर्याय शिल्लक असल्याचा इशारा त्यांनी दिल्याचे समजते . तसेच तालुक्यातील व शहरातील नागरिकांच्या आरोग्याबाबत कोणतीही कमतरता राहू नये यासाठी त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्याचेही खात्रीलायक सूत्रांनी सांगितले . कोरोनाच्या काळात तसेच एरवीदेखील वैद्यकीयदृष्ट्या परवानग्या हव्या असतात , त्यामध्ये खूप मोठा मानसिक त्रास दिला जातो . अशा देखील तक्रारी बारामती आणि परिसरातील खासगी डॉक्टरांनी देखील केल्या असल्याचे समजते . कोरोनाच्या काळात देखील प्रशासकीय नावाखाली आरोग्य क्षेत्रातील स्थानिक व वरीष्ठ अधिकाऱ्यांकडून त्रास झाल्याचे राजकीय पदाधिकाऱ्यांनी देखील सांगितल्याने हा भडका उडाल्याचे समजते .