बारामतीत बिबट्याचा वावर
सतीश पवार- बारामती
तालुक्यातील चोपडज परिसरात बिबट्याचा वावर आढळून आल्याने शेतकरी व ग्रामस्थांमध्ये दहशत पसरली आहे . या ठिकाणी पिंजरा लावण्याची ग्रामस्थांनी मागणी केली आहे . एकंदरीत गेल्या काही दिवसांपासून निरा - बारामती रस्त्यावर बिबट्याने आपले साम्राज्य दाखवून दिल्याने अगोदरच नागरिक दहशतीखाली आहेत , आता त्यात इतरही गावांची भर पडू लागली आहे . त्यामुळे कन्हेरी , काटेवाडीनंतर आता तालुक्याच्या इतरही ग्रामीण भागात बिबट्याने बस्तान बसवल्याने बिबट्यांना देखील बारामती आवडू लागली आहे अशीच गंमतीदार चर्चाही नागरिक करू लागले आहेत .
बारामती तालुक्यातील चोपडज परिसरात याबाबत बिबट्याचा वावर आहे . या बिबट्याने पाळीव जनावरांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती येथे दिली जात असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे . त्यातच चोपडज परिसरात बिबट्या असल्याचा दावा शेतकऱ्यांनी केल्यानंतर वन विभागाच्या कर्मचा - यांनी येऊन ठशांची पाहणी केली , तेव्हा बिबट्याचे हे ठसे असल्याचे स्पष्ट झाले . त्यामुळे आता येथे पिंजरा लावावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे .