Electric Car-Bike खरेदी करणाऱ्यांसाठी खूशखबर, केंद्र सरकारने दिली अजून मोठी सवलत!
ज्ञान-तंत्रज्ञान
अनुप ढम
केंद्र सरकारने याबाबत एक अधिसूचना जारी केली असून आता ईव्ही मालकांसाठी रजिस्ट्रेशन ( नोंदणी) आणि रिन्युअल (नूतनीकरण) शुल्क देण्याची गरज नसेल असं म्हटलंय. रस्ते वाहतूक आणि राजमार्ग मंत्रालयाने मंगळवारी जारी केलेल्या अधिसूचनेत बॅटरी संचालित ईव्हीना रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र जारी करण्यासाठी किंवा नुतनीकरणासाठी शुल्क माफी देण्यात आली आहे.
या निर्णयामुळे आता नवीन इलेक्ट्रिक कार किंवा टूव्हीलर खरेदी करताना तुम्हाला नोंदणी शुल्क भरावं लागणार नाही, त्यामुळे पैशांची बचत होईल. शिवाय यापूर्वीच अनेक राज्यांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीवर सब्सिडी आणि विविधप्रकारे सवलत दिली जात आहे. त्याआधी केंद्र सरकारनेही FAME-2 स्कीममध्ये सुधारणा करत इलेक्ट्रिक वाहनांना देण्यात येणारी सब्सिडी वाढवली आहे. आता इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारकडून अजून एक दिलासा देण्यात आला आहे.
आर्थिक वर्ष २०२० मध्ये एकूण २,९५,४९७ इलेक्ट्रिक वाहनांची विक्री झाली होती. तर, आर्थिक वर्ष २०२१ मध्ये एकूण २,३८,१२० इलेक्ट्रिक वाहनांची विक्री झाली, यावेळी विक्रीत १९ टक्क्यांची घट झाली, पण करोना महामारीमुळे लॉकडाउन असल्याचा फटका बसल्याने विक्रीवर परिणाम झाला. आता पुन्हा एकदा इलेक्ट्रिक वाहने डिमांडमध्ये आली आहेत.