Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

हवामान खात्याचा रायगडला अतिवृष्टीबाबत "ऑरेंज" इशारा

हवामान खात्याचा रायगडला अतिवृष्टीबाबत "ऑरेंज" इशारा

पुढील तीन दिवस संपूर्ण सतर्कता बाळगण्याचे जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांचे प्रशासनाला निर्देश तर जनतेला आवाहन

अमूलकुमार जैन-अलिबाग


हवामान खात्याने पुढील तीन दिवस रायगड जिल्ह्याला अतिवृष्टीचा "ऑरेंज" इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण जिल्हा प्रशासनाने गाफील न राहता पुढील तीन दिवस कमालीची सतर्कता बाळगावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत तर जनतेने शासनाच्या सूचनांचे पालन करीत सतर्क राहण्याचे आवाहनही केले आहे.

   जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी पुढील तीन दिवस होणाऱ्या संभाव्य अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर  आज (दि.29 ऑगस्ट रोजी) "वेब एक्स" या ऑनलाईन दूरदृश्य प्रणालीद्वारे  स्थानिक प्रशासनाकडून करण्यात आलेल्या तयारीबाबत संपूर्ण आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते.

    या ऑनलाईन बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील,पोलीस अधीक्षक अशोक दुधे, पनवेल महानगरपालिका आयुक्त गणेश देशमुख, अपर जिल्हाधिकारी अमोल यादव, निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सचिव डॉ.पद्मश्री बैनाडे, सर्व प्रांताधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी, पाटबंधारे, महावितरण, सार्वजनिक बांधकाम,औद्योगिक सुरक्षा, आरोग्य या विभागांचे अधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक आदी उपस्थित होते.

  जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी संभाव्य अतिवृष्टीनंतर किंवा दरड कोसळल्यानंतर उद्भवणार्‍या परिस्थितीबाबत केल्या जाणाऱ्या खबरदारीच्या उपाययोजनाबाबत संपूर्ण जिल्ह्याचा प्रांतनिहाय सविस्तर आढावा घेतला. याबाबत प्रशासनातील सर्व अधिकाऱ्यांनी अत्‍यंत सतर्कता बाळगावी.मुख्यालय सोडू नये. मुख्यत्वे स्थानिक प्रशासनातील प्रांताधिकारी, तहसिलदार, मुख्याधिकारी कृषी अधिकारी, पोलीस अधिकारी यांनी विशेष सजगता बाळगावी. डंपर, जेसीबी, पोकलेन, सर्चलाईट, रबर बोटी इतर महत्त्वाच्या साहित्य वितरण व्यवस्थेचे चोख नियोजन करावे. नागरिकांमध्ये संभाव्य अतिवृष्टी किंवा अन्य नैसर्गिक आपत्तीबाबत जास्तीत जास्त जागृती करावी. जनतेला योग्य माहिती द्यावी. प्रशासनाने समुद्रकिनाऱ्यावरील भागातील लोकांच्या सुरक्षिततेसाठी भरतीच्या वेळांची नोंद घेऊन त्याप्रमाणे आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. दरडप्रवण क्षेत्रातील लोकांचे तातडीने स्थलांतर करावे. स्थलांतरित नागरिकांनी पुन्हा परतून त्या क्षेत्रात जाऊ नये, यासाठी स्थानिक प्रशासनाने पोलिसांच्या मदतीने सतर्कता बाळगावी. प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या सूचना व माहिती विविध प्रसारमाध्यमांमार्फत जास्तीत जास्त जनतेपर्यंत पोहोचविण्यात याव्यात, आपत्तीच्या वेळी सर्वांनी आपापसात आवश्यक तो समन्वय राखून ठरवून दिलेल्या शिस्तबद्ध पद्धतीने नियोजनपूर्वक काम करावे, अशा सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.    

      ते पुढे म्हणाले की, रायगड जिल्हा हा पर्यटकांच्या पसंतीचा जिल्हा आहे. सध्या जिल्ह्यात पर्यटक वाढू लागले आहेत. अर्थव्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी पर्यटन व्यवसायही महत्त्वाचा आहे, मात्र पर्यटकांनीही प्रशासन करोना तसेच नैसर्गिक आपत्तीविषयक देत असलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे. मास्क लावणे, सोशल डिस्टंसिंगचे पालन करणे हे स्वतःसाठी आणि समाजासाठी आवश्यक आहे. त्याचे पालन करावे.

    या बैठकीदरम्यान जिल्हाधिकारी डॉ. कल्याणकर यांनी महाड पूरपरिस्थितीत उत्तम काम केलेल्या महेश सानप, प्रशांत साळुंखे, गुरुनाथ साटेलकर यांच्या रेस्क्यू टीमचे व इतर सर्वांचेच अभिनंदन करून त्यांनी केलेल्या उल्लेखनीय बचावकार्याबाबत आभार मानले.

    तसेच करोनाच्या दुसऱ्या लाटेत रायगड पोलीस विभागाने विविध ठिकाणी सुरू केलेल्या तपासणी नाक्याद्वारे केलेल्या उत्तम कामाबद्दल पोलीस विभागाचेही अभिनंदन केले.     

       शेवटी सर्वांनी टीम म्हणून एकमेकांना खंबीर साथ देत प्रत्येक आव्हानाचा यशस्वी सामना करण्याबाबतचा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी व्यक्त केला.

    यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी संपर्क यंत्रणा विस्कळीत झाल्यास पर्यायी व्यवस्था असणे आवश्यक असल्याचे सांगून दरडप्रवण क्षेत्रातील नागरिकांचे स्थलांतर करावे, त्या ठिकाणी लोकांनी परत जाऊ नये यासाठी प्रशासनाने काळजी घ्यावी, सातारा जिल्ह्यातील पर्जन्यमानाची माहिती घेत राहावी, साधनसामुग्री सुसज्ज ठेवावी, अफवा पसरू नयेत यासाठी काळजी घ्यावी, महाड एमआयडीसी मधील कंपन्यांनाही सतर्क ठेवून तेथेही बचावकार्य तथा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवावी,अशा सूचना मांडल्या.

     पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांनी नैसर्गिक आपत्तीच्या वेळी संपर्क यंत्रणा अबाधित राहणे याबाबतचे महत्व अधोरेखित करून वायरलेस यंत्रणा कार्यान्वित करणे, रिपीटर बसविणे, महाड येथे 24 तास नियंत्रण कक्ष कार्यान्वित करणे, रबर बोटी व इतर बचावकार्य याबाबतचे प्रशिक्षण देणे आदी विषयांबाबत महत्त्वाच्या सूचना मांडल्या.

    पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त श्री.गणेश देशमुख यांनी कोणत्याही नैसर्गिक आपत्तीमध्ये जिल्हा प्रशासनाच्या मदतीसाठी पनवेल महानगरपालिकेची यंत्रणा मनुष्यबळ तसेच इतर संसाधने यासह संपूर्णतः सुसज्ज व तत्पर असल्याचे सांगितले.

      अप्पर जिल्हाधिकारी अमोल यादव यांनी प्रामुख्याने संपर्क व्यवस्था, स्थानिक प्रशासनाचा आपापसातील समन्वय, संभाव्य दरडप्रवण क्षेत्रात घ्यावयाची खबरदारी, भरतीच्या वेळांची नोंद व त्यानुषंगाने घ्यावयाची काळजी, दरडप्रवण भागातील नागरिकांसाठी सुरक्षित ठिकाणी निवारा केंद्र, त्यांचे स्थलांतर, त्यांच्यासाठी अन्नधान्याची पुरेशी व्यवस्था याबाबतच्या सूचना मांडल्या.

    या बैठकीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील स्थानिक रेस्क्यू टीमच्या वतीने महेश सानप, प्रशांत साळुंखे, गुरूनाथ साटेलकर यांनीही त्यांचे पूर्वानुभव कथन केले तसेच भविष्यात आपत्तीच्या वेळी कोणकोणते नियोजन कशा प्रकारे करायला हवे, याबाबत काही महत्त्वाच्या सूचनाही मांडल्या.

      यावेळी सर्व प्रांताधिकाऱ्यांनी त्यांच्या क्षेत्रात संभाव्य अतिवृष्टी तसेच दरडप्रवण क्षेत्रात दूर्घटना घडल्यास त्या दृष्टीने करावयाच्या उपाययोजनांबाबतच्या तयारीबाबतची सविस्तर माहिती जिल्हाधिकारी महोदयांना सांगितली.

       बैठकीच्या शेवटी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे यांनी सर्वांचे आभार मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies