अलिबाग एसटी आगारात अतिरेक्यांच्या अटकेचा थरार
अमूलकुमार जैन-अलिबाग
सकाळी 11 वाजण्याची वेळ रायगड पोलिस नियंत्रण कक्षाला अलिबाग एसटी आगारात तीन अतिरेकी घुसल्याची माहिती मिळते. तात्काळ पोलिस नियंत्रण कक्षाकडून अति शिघ्र कृती दलाला कळवून सदर परिस्थिती हाताळण्याच्या सुचना दिल्या जातात. त्याबरोबर सज्ज होत अति शिघ्र कृती दल आपल्या जवानांसह एसटी आगारात पोहचून कारवाईला सुरुवात करते.काही वेळातच आगारात घातपात घडवण्याच्या मनसूब्याने दबा धरुन बसलेल्या तीन अतिरेक्यांना दहशत विरोधी पथक जेरबंद करुन परिस्थितीवर नियंत्रण मिळवते. हा सर्व थरार आपल्या डोळयांदेखत पहात असलेल्या अलिबागकरांच्या हा प्रकार म्हणजे मॉकड्रील असल्याचे लक्षात येताच त्यांचा जीव भांडयात पडला. आणि पोलिस यंत्रणा देखील सज्ज असल्याचे लक्षात आल्याने सुरक्षेची खात्री देखील झाली.
अतिरेक्यांकडून दहशतवादी हल्ले घडवून भारतामध्ये महत्वाची ठिकाणे लक्ष्य करण्याची शक्यता लक्षात घेता अतिरेकी हल्ल्याचा प्रतिबंध उपाय योनेच्या अनुषंगाने गर्दीच्या ठिकाणी व धर्मस्थळांच्या ठिकाणी अति शिघ्र कृती दलातर्फे मॉक ड्रिल घेण्याचे आदेश पोलिस अधिक्षक अशोक दुधे यांनी दिले होते. त्यानुसार आज सकाळी 11 वाजता अलिबाग एसटी आगारात हे दहशतवादी घुसल्याचे नाटय घडविण्यात आले. यामध्ये राखीव पोलीस निरीक्षक भास्कर शेंडे, राखीव पोलिस उपनिरीक्षक जुनेद शेख, कवायत निर्देशक 4, अति शिघ्र कृती दल पोलिस अमंलदार 19, वाहन चालक 4, वाहने 4, पोलीस नाईक राणे, पोलिस शिपाई भोईर यांचा समावेश होता.