Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

बांधकाम कामगार माध्यान्ह भोजन योजनाचा लाभ घ्यावा- पालकमंत्री जयंत पाटील


बांधकाम कामगार माध्यान्ह भोजन योजनाचा लाभ घ्यावा- पालकमंत्री जयंत पाटील

उमेश पाटील --सांगली 

कष्टकरी माणसाला अन्नाचे महत्व अधिक समजते. अन्न आपण शक्ती समजतो, प्रेरणादाई समजतो, अन्नाशिवाय तर जीवनच नाही. आमचे कामगार काबाड कष्ट करतात, त्यांच्या आरोग्यासाठी व कष्ट करण्याची उर्जा मिळवून देण्यासाठी शासनाच्या कामगार विभागाने मध्यान्ह भोजन ही संकल्पना अंमलात आणली आहे. शासनाने अतिशय बारकाईने विचार करुन ही योजना राबविली आहे. या योजनेमध्ये बांधकाम क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कामगारांसह या क्षेत्राशी निगडित इतर क्षेत्रातील कामगारांचा समावेश करण्यात आला आहे. ही योजना राज्यात लोकप्रिय ठरेल. या योजनेचा आदर्श घेवून इतर क्षेत्रातील घटकांसाठीही अशा प्रकारची योजना राबविता येईल का याबाबत भविष्यामध्ये विचार केला जाईल, असे प्रतिपादन जलसंपदा, लाभक्षेत्र विकास मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले. 

सांगली येथील पलाश टाऊनशिप, धामणी रोड येथे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांच्यामार्फत बांधकाम कामगार मध्यान्ह भोजन योजना शुभारंभ कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. यावेळी ग्रामविकास व कामगार मंत्री हसन मुश्रीफ, सांगली, मिरज व कुपवाड शहर महानगरपालिकेचे महापौर दिग्विजय सुर्यवंशी, पुणे विभागाचे अप्पर कामगार आयुक्त शैलेंद्र पोळ, सांगली व इचलकरंजीचे सहायक कामगार आयुक्त अनिल गुरव, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य संजय बजाज, क्रिडाईचे राज्य उपाध्यक्ष दिपक सुर्यवंशी, सांगली क्रिडाईचे रविंद्र खिलारे यांच्यासह बांधकाम कामगार व क्रिडाईचे पदाधिकारी उपस्थित होते. 

यावेळी पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, महाराष्ट्रातील कष्ट करणाऱ्या, ज्याचे हातावरचे पोट आहे अशा कामगारांच्या संकटाच्या काळात, त्यांचा दुर्दैवाने अपघात झाल्यास किंवा कोणताही दुर्धर रोग झाल्यास अशावेळी त्यांच्या पाठीशी राहण्यासाठी तसेच या क्षेत्रातील कामागारांच्या पाल्यांच्या शिक्षणासाठी शासनाच्या कामगार विभागामार्फत महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. गरीबांची मुले शिकली, मोठी झाली, उच्च विद्या विभूषित झाली तर त्यांचे जीवनमान उंचावेल. महामंडळाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांमुळे कष्टकरी कामगारांच्या मुलांना शिक्षणात मदत करणे व त्यांसाठी आर्थिक व्यवस्था करणे हा विशाल दृष्टीकोन या मंडळामार्फत ठेवण्यात आला आहे. कामागारांचे आरोग्य, त्यांच्या पाल्याचे शिक्षण ते ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणी घराच्या व्यवस्थेसाठी हे मंडळ त्यांच्या पाठीशी उभे आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील लाखो कामगारांना या विविध योजनांचा लाभ मिळणार आहे. आज त्यामध्ये अणखीन एका नवीन योजनेचा समावेश होत आहे, तो म्हणजे बांधकाम कामागार मध्यान्ह भोजन योजना याचा निश्चितच सर्व कामागारांना फायदा होणार आहे. 

यावेळी पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, शासनामार्फत अनेक योजना राबविण्यात येत आहेत. त्यामध्ये सर्वात लोकप्रिय योजना म्हणजे शिवभोजन योजना ही एक अत्यंत चांगली योजना असून या योजनेचा कोरानाच्या कालावधीमध्ये रुग्णांच्या नातेवाईकांना, गोरगरिबांना चांगला लाभ झाला. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील अतिशय कष्ट करणाऱ्या बांधकाम कामगारांसाठी सुरु करण्यात आलेली बांधकाम कामागार मध्यान्ह भोजन योजना ही अतिशय लोकप्रिय ठरेल. यासाठी कामगार विभागाचे व महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे अभिनंदन. या विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी अधिकाधिक बांधकाम कामगारांनी नोंदणी करावी असे आवाहनही त्यांनी बांधकाम कामगारांना केले. 

यावेळी कामगार व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, राज्यामध्ये महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत प्रत्येक जिल्ह्यामध्ये बांधकाम कामागार मध्यान्ह भोजन योजना राबविण्यात येत आहे. कोरोनाच्या काळामध्ये मोठ्याप्रमाणात परप्रांतीय कामगार राज्याबाहेर गेले, त्यामुळे फार मोठा परिणाम या बांधकाम व्यवसायावर झाला. त्यावेळी राज्यातील थांबलेल्या कामागारांच्या भोजनाचाही मोठा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे शासनाकडून मोठ्या शहरामध्ये ही योजना राबविण्यास सुरुवात केली. त्यानंतर सरकारकडून ही  योजना राज्यात सर्वत्र राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ बांधकाम क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कामगारासह बांधकाम क्षेत्रासाठी काम करणाऱ्या इतर सर्व त्यामध्ये काचा बसविऱ्यापासून ते फारशी बसविण्याऱ्यापर्यंत तसेच सुतार काम करणारे कामगार या सर्वांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे या सर्व घटकांना याचा लाभ होणार आहे. या मंडळामार्फत कामगाराच्या आरोग्यासाठी यामध्ये अपघात, दुर्धर आजार, महिला कामगारांच्या प्रसूतीसाठी विविध प्रकारचे लाभ देण्यात येतात. कामागारांच्या पाल्यासाठी प्राथमिक शिक्षणापासून ते उच्च शिक्षणापर्यंत सर्व क्षेत्रामध्ये शिक्षण घेणाऱ्या पाल्यासाठी आर्थिक मदत केली जाते. या सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी कामगारांनी आपली ऑनलाईन नोंदणी तात्काळ करुन घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले. 

यावेळी पालकमंत्री जयंत पाटील व कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांच्याहस्ते महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत विविध लाभ मिळाल्या कामगारांना धनादेशाचे वाटप करण्यात आले व कार्यक्रम ठिकाणी उपस्थित कामगारांना भोजन देवून  मध्यान्ह भोजन योजनेचा शुभारंभ करण्यात आला. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies