पाण्यासाठी वणवण सुरु असल्याने या ग्रामस्थांनी काढला जिल्हा परिषदेवर मोर्चा
अमूलकुमार जैन-अलिबाग
पनवेल तालुक्यातील ग्रामपंचायत गुळसुंदे हद्दीतील लाडीवली, आकुलवाडी या गावांसह डोंगरीची वाडी, स्टेशनवाडी, फलटवाडी, चिंचेचीवाडी या आदिवासीवाड्यांतील नागरीकांना मागील दहा ते बारा वर्षांपासून रायगड जिल्हा परिषदेच्या सुमारे 52 वर्ष जुन्या, नादुरुस्त व बंद पडलेल्या चावणे प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेद्वारे पाताळगंगा नदीतील प्रदूषित पाणी कोणत्याही जलशुद्धीकरण प्रक्रियेविना पुरवठा केला जातो तोही आठवड्यातून एक ते दोन वेळा फक्त अर्धा तास. याबाबत संबंधित गुळसुंदे ग्रामपंचायत सरपंच, जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा योजनेचे उप अभियंता, कार्यकारी अभियंता, पनवेल पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी व स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्यासह जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडे वारंवार तोंडी व लेखी तक्रारी ग्रामस्थांनी केल्या. त्यानंतर 15 मार्च 2021 रोजी पनवेल पंचायत समितीवर मोर्चा काढण्यात आला. तेव्हा 10 जुलै 2021 रोजी संबंधित अधिकारी वर्गाने लाडीवली गावास भेट देऊन नियमीत शुद्ध पाणी पुरवठा करण्याचे आश्वासन दिले. मात्र त्यानंतरही नियमित शुद्ध पाणी पुरवठा झाला नाही. पुन्हा 13 जुलै राजी मोर्चा कढण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिल्यानंतर पाणी पुरवठा योजनेची निविदा प्रक्रिया सुरु असल्याचे सांगितल्याने हाही मोर्चा स्थगित करण्यात आला. मात्र इतक्या पाठपुरव्यानंतरही पाणी पुरवठा न झाल्याने अखेर जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाच्या कार्यालयाला टाळे ठोकण्याचा ग्रामस्थांनी निर्णय घेत सोमवारी येथील जिल्हा परिषद कार्यालयावर गुळसुंदे ग्रामस्थांनी मोर्चा काढला.
राष्ट्रसेवा दलाचे रायगड जिल्हा संघटक संतोष ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली अलिबाग शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून मोर्चाची सुरुवात झाली. हातात हांडे, अशुद्ध पाण्याच्या बाटल्या, फलक घेऊन घोषणाबाजी करीत हा मोर्चा जिल्हा परिषदेवर निघाला. जिल्हा डाक कार्यालयाजवळ या मोर्चाला पोलिसांनी अडविल्यानंतर या मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. यावेळी मोर्चातील प्रमुखांची भाषणे झाली. या मोर्चामध्ये सेवा दलाचे राष्ट्रीय सचिव अल्लाउद्दीन शेख, जिल्हा कार्याध्यक्ष संतोष ढोरे, आदी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
दरम्यान, मोर्चाच्या शिष्टमंडळाने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेऊन चर्चा केली. मात्र ही चर्चा निष्फळ ठरल्याचे मोर्चाचे नेतृत्व करणारे संतोष ठाकूर यांनी सांगितले. यापुढील काळात पाणी पुरवठ्याचा प्रश्न सुटला नाही तर 17 नोव्हेंबरपासून रायगड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरु करण्यात येईल असेही संतोष ठाकूर यांनी सांगितले.
Good2
ReplyDelete