कर्जत तालुक्यात गेले दोन दिवस जोरदार वारे आणि विजांचा कडकडाट सुरू आहे,काही भागात पाऊस पडत असून जोरदार वारे सुद्धा वाहत आहेत,आज संध्याकाळी खांडस येथे वीज पडून शेतावर काम करायला गेले दोघे भाऊ यांच्यावर वीज कोसळली असून दोघेही जखमी झाले असून त्यांना तातडीने खांडस येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत तर दुसऱ्या घटनेत याच गावातील मंदिराच्या कळसावर वीज पडून कळसाचा काही भाग शेजारी घरावर उडाल्याने त्यांच्या घराची कौले उडाली आहेत.
रायगडात यल्लो अलर्ट!
रायगड जिल्ह्यात 5 ते 8 ऑक्टोबर 2021 या दिवसात काही ठिकाणी गडगडाटासहीत जोरदार पावसाची शक्यता असल्याची भारतीय हवामान खात्याने पूर्वसूचना प्रसारित केली आहे. यल्लो अलर्ट दिलेला आहे.तरी रायगड जिल्ह्यातील सर्व नागरिकांना व यंत्रणांना सतर्कततेचा इशारा देण्यात येत आहे. याकाळात ढगांच्या गडगडाटासह वादळी वारे वाहण्याची शक्यता राहील.
नागरिकांनी शेतात काम करताना झाडाखाली थांबू नये.
विजा चमकत असताना विद्युत खांब, झाडे, पाणी, लोखंडी वस्तू, साहित्य या पासून सुरक्षित अंतर ठेवावे.
कच्या घरातील नागरिकांनी घराचे छप्पर व हलक्याफुलक्या वस्तूंची काळजी घ्यावी. त्या उडून नुकसान होऊ शकते.
अधिक माहिती व मदतीसाठी जवळच्या तहसील कार्यालय व पोलीस ठाण्यात संपर्क साधावा.
कोणत्याही घटनांची माहिती जिल्हाधिकारी कार्यालय नियंत्रण कक्षास 02141 222097 व जिल्हा पोलीस नियंत्रण कक्षास 02141 228473 या क्रमांकावर द्यावी.