अमेरिकेनंतर आता चीनलाही कर्जतच्या पराग बोरसे यांच्या मराठमोळ्या चित्रांची भुरळ...
आदित्य दळवी-कर्जत
या प्रदर्शनामध्ये 55 चीनमधील चित्रकार आणि तेवीस आंतरराष्ट्रीय चित्रकारांचा समावेश आहे.हे प्रदर्शन लियन यीकिंग पेस्टल गॅलरी ऑफ फोकआर्ट सेंटर, वांझाई सिटी , झुहाई, चायना इथे 20 डिसेंबर पर्यंत चालू राहिल. या प्रदर्शनामध्ये पराग बोरसे यांचे "शोल्डरिंग द लव" हे व्यक्तीचित्रण मांडण्यात आले आहे.
शेळीच्या पिल्लाला आपल्या मुला-बाळांप्रमाणे खांद्यावर खेळवणाऱ्या एका वृद्ध धनगराचे हे चित्र आहे. या माणसाच्या चेहऱ्यावरील स्मितहास्य आणि डोळ्यामधील वात्सल्यपूर्ण भाव हे या चित्राचे वैशिष्ट्य आहे. पराग बोरसे यांच्या याच चित्राला यापूर्वीही पेस्टल जरनल अमेरिका या मॅगझीनने व्यक्तिचित्रणासाठीचा पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. तसेच या वर्षीच्या लोकसत्ताच्या दिवाळी अंकाच्या मुखपृष्ठावर येण्याचा मानही या चित्राने मिळवला आहे.
जगाच्या बाजारपेठेवर कब्जा करणाऱ्या चीनला चित्रकार पराग बोरसे यांचे चित्र मात्र आयात करावे लागल्याने सर्वच स्तरातून पराग बोरसे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. या प्रदर्शनाची चीनमधील प्रसार माध्यमांवर झळकलेली बातमी येथे शेअर केली आहे.