कडाव मधील कचऱ्याचे व्यवस्थापन गरजेचे ,गुरांच्या जीवावर बेतले जाण्याची शक्यता ?
नरेश कोळंबे -कर्जत
कडाव ग्रामपंचायत अनेक महत्वाच्या उपक्रमांना प्राधान्य देणारी ग्रामपंचायत म्हणून नावाजली जात आहे. पण कडा व भागातील समस्या सोडवत असतानाच नवीन निर्माण होणाऱ्या समस्या ह्या कडा व ग्रामपंचायतीची डोकेदुखी ठरत आहे. गावालगत असलेल्या जुन्या खेळाच्या मैदानावर टाकण्यात आलेल्या कचऱ्या मुळे गावाला आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागणार आहे.
कडा व ग्रामपंचायत ही कर्जत तालुक्यातील एक महत्वाची ग्रामपंचायत मानली जाते. विविध चांगल्या गोष्टींनी कायम चर्चेत असणारी ही ग्रामपंचायत आता वेगळ्याच समस्येच्या विळख्यात सापडली आहे. गावातील वाढती लोकसंख्या आणि अपुऱ्या पडणाऱ्या सोयी सुविधा यामुळे सर्वसामान्य जनतेला तसेच ग्रामपंचायत ला भुर्दंड सोसावा लागत आहे. गावात जैविक, घनकचरा व प्लास्टिक कचरा जमा करणारी सेवा उपलब्ध आहे परंतु तो टाकायला डंपिंग ग्राउंड नसल्याने सदर सर्व कचरा कडाव जवळ असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पाठीमागे असलेल्या ग्राऊंडवर टाकला जातो आहे . त्यामुळे एकेकाळी क्रिकेट च्या खेळाने गजबजणारे ग्राउंड आज घाणीच्या विळख्यात सापडल्याचे चित्र निर्माण झाले आहे. ह्याच घाणीतील कोणतेही प्लास्टिक आणि जैविक कचरा व्यवस्थापन करण्याचे प्रक्रिया किंवा जागा नसल्याने तो प्लास्टिक कचरा तसाच मैदानावर पडून आहे. हाच प्लास्टिक मैदानावर येणारी गुरे ढोरे तसेच कुत्रे खात असल्याने त्याची बाधा त्यांना होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच बाजूला असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णांना आणि तिथे राहणाऱ्या डॉक्टर वर्गाला आणि गजानन विद्यालय कडाव येथे येणाऱ्या विद्यार्थ्याना भविष्यात अनेक साथीच्या रोगांना सामोरे जावे लागणार आहे हे निश्चित झाले आहे.
सदर कचरा कुठे टाकला जातो आहे त्याची माहिती आम्हाला नाही , पण ह्या गोष्टीची माहिती घेऊन लवकरात लवकर कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी तोडगा काढण्यात येईल.
अशोक पवार ( सरपंच, ग्रुप.ग्राम.पंचायत कडाव )
आम्ही जमा केलेला कचरा त्या मैदानावर प्रत्यक्ष जाऊन दर आठवड्याला जाळत आहोत. गुरेचरण जागेची मोजदाद झाल्यानंतर डंपिंग ग्राउंड साठी जागा बनविण्यात येणार आहे. त्यामुळे येत्या काही काळात हा कचरा व्यवस्थापन चा प्रश्न मार्गी लागेल.
हर्षद भोपतराव. (सदस्य, माजी उपसरपंच,ग्रू ग्राम. कडाव)