पाली नगरपंचायत निवडणुकीत मतदान केंद्रांवर सकाळी तुरळक गर्दी;मात्र दिवसअखेर झालं 85.87टक्के मतदान
विनोद भोईर-पाली सुधागड
पाली नगर पंचायतीच्या 4 जागांसाठी मंगळवारी (ता.18) निवडणूक संपन्न झाली. अवघ्या चार जागांवर निवडणूक होत असल्याने दिवसभर मतदार मतदानासाठी येत होते. त्यामुळे मतदान केंद्रांवर तुरळक गर्दी पहायला मिळाली. तरीही दुपारी 3 पर्यंत एकूण 65 टक्के मतदान झाले होते आणि दिवस अखेर 85.87 टक्के मतदान झालं.
चार जागांसाठी 14 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. चारही मतदान केंद्रांवर पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. काही मतदार आपल्या लहानग्यांना सोबत घेऊन मतदानासाठी आले होते. मतदात्यांचा उत्साह चांगला होता.
मंगळवारी (ता.17) 2, 5, 8 व 14 या चार प्रभागांचा व 21 डिसेंबरला झालेल्या 13 प्रभागांच्या निवडणुकीचा निकाल बुधवारी (ता.19) लागणार आहे. अष्टविनायकाचे तीर्थक्षेत्र असलेल्या पालीतील ही पहिलीच नगरपंचायत निवडणूक असल्याने ही नगरपंचायत सर्वच पक्षांसाठी प्रतिष्ठेची आहे.
या निवडणुकीत शिवसेना व भाजप वेगवेगळे लढत होते. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व शेकाप यांनी आघाडी करून निवडणूक लढविली.
पालीतील शुद्धपाणी योजना, बाह्यवळण मार्ग, ग्रामीण रुग्णालय, नवीन बस स्थानक, तीर्थक्षेत्र विकास आराखडा अशा महत्वपूर्ण योजना व कामे कित्येक वर्षांपासून जैसे थे आहेत. आम्हाला सत्ता दिल्यास हे सर्व प्रश्न आम्हीच मार्गी लावू व खरा विकास आम्हीच करू अशी आश्वासने सर्वच पक्षांचे नेते, मंत्री, आमदार व खासदारांनी दिली आहेत. अनेक आश्वासने आणि वायदे दिले आहेत. वास्तव्यात सत्ता आल्यावर कोणते प्रश्न मार्गी लागतील हे तेव्हाच कळेल.