पाली नगरपंचायतीवर शेकाप व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे वर्चस्व
विनोद भोईर-पाली
पाली नगरपंचायत निवडणूक निकाल बुधवारी (ता.19) जाहीर झाला आहे. पाली तहसील कार्यालयात मतमोजणी प्रक्रिया संपन्न झाली. या प्रतिष्ठेच्या निवडणुकीत 17 पैकी 10 जागांवर शेकाप व राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निवडून आले आहेत. त्यामुळे आता आघाडीच्या हाती नगरपंचायतीची सूत्रे आली आहेत.
यामध्ये शेकाप उमेदवार प्रणाली सूरज शेळके या सर्वाधिक तब्बल 236 मतांनी आघाडीवर राहिल्या तर राष्ट्रवादीचे उमेदवार सुधीर मारुती भालेराव हे एक मताने निवडून आले आहेत.
अष्टविनायकाचे तीर्थक्षेत्र असलेल्या पालीतील ही पहिलीच नगरपंचायत निवडणूक असल्याने ही निवडणूक सर्वच पक्षांसाठी प्रतिष्ठेची होती. या निवडणुकीत शिवसेना व भाजप वेगवेगळे लढत होते. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व शेकाप यांनी आघाडी करून निवडणूक लढविली. विशेष म्हणजे सर्वच पक्षांनी निवडणुकीत कमी अधिक प्रमाणात खाते उघडली आहेत. शिवाय एक अपक्ष उमेदवार देखील निवडून आला आहे. त्यामुळे एकूण सर्वत्र आनंदी व समाधानी वातावरण होते.
एकूण 17 जागांसाठी तब्बल 60 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. निवडणूक निकाल ऐकण्यासाठी सर्वच पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मतदान केंद्रावर जमले होते. कोणत्या उमेदवाराला किती मते पडतील, कोण किती मताने जिंकेल किंवा पराजित होईल याचीच आकडेवारी व चर्चा निकाल लागेपर्यंत सुरू होती. सर्वसामान्य नागरिक देखील निकालाच्या प्रतीक्षेत होते. अखेर निकाल जाहीर होताच कुठे आंनद व जल्लोष तर कुठे नाराजी दिसून आली.
17 प्रभागातील पक्षीय बलाबल
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - 06
शेकाप - 04
शिवसेना - 04
भाजप - 02
अपक्ष -01