Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

मावळ्यांची शाळा या आधुनिक उपक्रमातून उलगडणार शिवछत्रपतींचा इतिहास

 मावळ्यांची शाळा या आधुनिक उपक्रमातून उलगडणार शिवछत्रपतींचा इतिहास 

कुलदीप मोहिते -सातारा

ब्रिटीशांच्या गुलामीतून संघर्ष करून बाहेर आलेला आणि गेली ७५ वर्षे स्वातंत्र्य उपभोगत असलेला आपला भारत देश अनेक क्षेत्रांत प्रगती करत आहे. शिक्षण क्षेत्र देखील त्याला अपवाद नसून या ही क्षेत्रात आमुलाग्र बदल आपण पाहिले आहेत. मात्र अजूनही शाळांमध्ये इतिहास हा केवळ एक विषयापर्यंत मर्यादित राहिला आहे. सनावळी, परप्रांतातील महायुद्धे, राज्यक्रांत्या शिकताना इतिहासातून जी प्रेरणा विद्यार्थ्यांना मिळायला हवी ती मिळताना दिसत नाही. 

 शिवछत्रपतींचा खरा इतिहास आधुनिक तसेच रंजक पद्धतीने शाळेतील विद्यार्थ्यांपर्यंत पोहचावा ह्यासाठी छत्रपती श्रीमंत उदयनराजे भोसले ह्यांच्या पुढाकारातून आणि मीती इन्फोटेन्मेंट ह्यांच्या तांत्रिक सहयोगातून मावळ्यांची शाळा ह्या अभिनव उपक्रमाची घोषणा सातारा येथील गांधी मैदान येथे आयोजित केलेल्या सोहोळयात करण्यात आली. छत्रपती श्रीमंत उदयनराजे भोसले आणि मीती इन्फोटेन्मेंटचे व्यंकटेश मांडके, अनिरुद्ध राजदेरकर आणि शंतनु कुलकर्णी ह्यावेळी उपस्थित होते. ह्या दिमाखदार सोहोळ्यास शिवाजी महाराजांच्या २९ शिलेदारांचे वंशजही उपस्थित होते. या सोहोळ्याचे सूत्रसंचालन प्रसिद्ध अभिनेता अभिजित खांडकेकर ह्यांनी केले.  

ह्या सोहळ्याच्या निमित्ताने व्यासपीठावर छत्रपती उदयनराजे भोसले ह्यांच्या समवेत स्वराज्ययोध्द्यांचे २८ वंशज आणि मागे पडद्यावरती, मितीइन्फोटेन्मेंट ने बनवलेल्या, लोकार्पित केलेल्या ६० स्वराज्ययोध्द्यांची चित्रे असा ऐतिहासिक प्रसंग उपस्थितांना पाहता आला.छत्रपती उदयनराजे भोसले ह्यांचे मावळ्यांची शाळा ह्या आधुनिक पद्धतीने मराठ्यांचा इतिहास शिकवण्याच्या उपक्रमाची घोषणा करणे, स्वराज्ययोध्द्यांच्या चित्रांचे लोकार्पण करणे, शिवरायांचा इतिहास मुलामुलिंपर्यंत पोहोचवणाऱ्या - राष्ट्रीय पातळीवर गाजलेल्या खेळाचे मावळा ह्या बोर्ड गेम चे कौतुक करणे आणि ते ही स्वराज्य योद्ध्यांच्या वंशजांच्या उपस्थितीत ह्या साऱ्यांनी सोहळ्याला अलौकिक असे महत्त्व आले.

 मावळ्यांची शाळा या उपक्रमामध्ये सातारा जिल्ह्यातील निरनिराळ्या शासकीय, निमशासकीय आणि स्वतंत्र शाळांमधून अधिकचे तास घेऊन आधुनिक आणि रंजक पद्धतीने शिवछत्रपतींनी उभारलेला स्वराज्यलढा हा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवला जाईल. रटाळ सनावळ्या पाठ करून घेण्याच्या रुक्ष प्रथेला खंड देत, प्रोजेक्टर्स आणि व्हिजुअल ग्राफिक्सच्या सहाय्याने आपल्या मातीमध्ये घडलेल्या आणि आपल्या मातीसाठी लढलेल्या स्वराज्ययोद्ध्यांच्या शौर्यगाथा शिकविल्या जातील. शालेय अभ्यासक्रम ज्या वीरयोद्ध्यांना विद्यार्थ्यांपासून वंचित ठेवतो त्या स्वराज्ययोद्ध्यांना त्यांच्यापर्यंत अधुनिक पद्धतीने पोहोचवताना त्यांच्या चारित्र्यातून काय शिकावे? एकूणच शिवचारित्र्यातून कोणते बोध घ्यावेत? ह्याचा अभ्यासपूर्वक विचार करून या उपक्रमाची निर्मिती करण्यात आली आहे.

 हा उपक्रम अस्सल इतिहास प्रेरणादायी पद्धतीने मुलांपर्यंत पोहोचवता पोहोचवता शहरातील अनेक हुशार तरूणांना रोजगार देखील देईल.  

 विशेष म्हणजे ही सर्व व्यवस्था संपूर्णपणे नि:शुल्क असून त्यासाठी लागणारे सर्व माध्यम, माहिती, व्हिजुअल ग्राफिक्स, अॅनिमेशन आणि इच्छुकांना उपक्रम राबविण्याचे प्रशिक्षण मीती इन्फोटेन्मेंट कसलेही शुल्क न आकारता देणार आहे. इच्छुकांचे वेतन, त्यांना शाळांत पोहोचण्यासाठी लागणारी मदत इत्यादी छत्रपती श्रीमंत उदयनराजे भोसले करणार आहेत.

 

छत्रपती श्रीमंत उदयनराजे भोसले म्हणाले की गेले अनेक दिवस आधुनिकतेच्या नावाखाली कमी कमी होत चाललेल्या मराठयांच्या इतिहासाकडे माझे लक्ष वेधले गेले. पाहायला जावे तर अशी एक गोष्ट नाही जी तुम्हाला शिवचारित्र्यातून प्रेरणादायी पद्धतीने पोहोचत नाही. मग आपलाच इतिहास आपल्या नव्या पिढीला शिकवण्यासाठी मी पाऊले नाही उचलायची तर मग कोणी? ह्याच विचाराने झपाटून मी ह्या क्षेत्रात काम करायचे ठरवले. मीती इन्फोटेन्मेंट ह्यांना मी त्यांच्या बोर्ड गेमच्या निर्मितीपासून ओळखतो. तेव्हा त्यांनी संकलित केलेल्या माहितीचा उपयोग आपल्या सातार्‍यातील मुलामुलींना झालाच पाहिजे ह्यासाठी मी प्रयत्न करत आहे .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies