संतोष दळवी - कर्जत
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यभर महाविकास आघाडीच्या प्रचाराचं रान उठवलं असून अनेक ठिकाणच्या प्रचारात पंचसूत्री बरोबर शिवसेना शिंदे गटावर आसूड ओढत सभा गाजवल्या जात आहेत.प्रचार सुद्धा अंतिम टप्प्यात आहे. पहिल्या प्रचार सभेपासून ठाकरे यांच्या प्रचार सभेला प्रचंड प्रतिसाद जनतेचा मिळत असून जनतेच्या मुद्द्यावर ते बोलत आहेत,शेतकरी,वाढती महागाई, वाढती बेरोजगारी असे मुद्द्यांबरोबर,रायगड जिल्ह्यात येणारा उद्योग आणि राज्यात इतर ठिकाणी येणारे उद्योग आपल सरकार पाडून कसे गुजरात मध्ये नेले जात असून मुंबईतील मिठागरे आणि धारावी कशी अदानी यांच्या घशात लोटली जात आहे.हे मुख्य मुद्दे सुध्दा ठाकरे यांच्या प्रचाराचे ठळक राहिले असून महाविकास आघाडी सरकार पाडून कसे शिवसेना फोडून चिन्ह पण चोरले गेले शिवाय जी शिवसेनेत गद्दारी केली गेली यावर पण त्यांच्या प्रचार सभेत भर आहे.
स्थानिक मुद्द्यांवर हात घालणार का?
कर्जत मतदार संघात अखंड शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे असून ते ही शिंदेच्या बंडात अग्रभागी होते .थोरवे यांचा टेबलावरचा डान्स ही त्यावेळी गाजला होता.यावर उध्दव ठाकरे हे भाष्य करतात का हे पाहावे लागेल.शिवाय महेंद्र थोरवे यांचे मातोश्री बरोबर असलेले जिव्हाळ्याचे संबंध पाहता थोरवेंनी बंड केले यावरही उध्दव साहेबांनी भाष्य करावे अशी अपेक्षा सामान्य शिवसैनिक व्यक्त करत आहेत.याच मतदार संघात आरोग्य व्यवस्थेची वानवा असून बारमाही वाहणारी उल्हास नदी असताना या मतदार संघात काही भागात तीव्र पाणी टंचाईची समस्या भेडसावत आहे.त्याचबरोबर कर्जत तालुका ग्रीन झोन असल्याने महाविकास आघाडी सरकार आल्यावर लघुउद्योगांना चालना मिळणार का? असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित होत असून या समस्यांना पक्ष प्रमुख हात घालणार का शिवाय पाच एकर जागेत ही सभा होत असून जनता किती प्रतिसाद देते आणि सभेला उपस्थित राहणार याकडे साऱ्याच कर्जतकरांचे लक्ष लागून राहिले आहे.महाविकास आघाडीचे उमेदवार नितीन सावंत यांनी प्रचारात उशिरा का होईना प्रचंड उसळी मारली असून उध्दव ठाकरे यांच्या सभेमुळे निकाला समीप आलेले सावंत हे विजयाची रेषा पार करतील का? हे २३ तारखेला समजेल.