संतोष दळवी --- कर्जत
रायगड जिल्ह्यात महाविकास आघाडीत विधानसभा निवडणुकीत एकसंघपणाचा अभाव होता आणि फाजिल आत्मविश्वास नडला.पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी जाहीर केले होते की शिवसेनेच्या कोट्यातून शेकापला जागा सोडण्यात आल्या होत्या पण त्या किती हे मतदारांना समजायला मार्ग नव्हता.आघाडीतील उमेदवार जाहीर होण्याआधी शेकापने घिसाडघाईने पनवेल,अलिबाग, पेण आणि उरण इथले उमेदवार घोषित केले.इथेच आघाडीत बिघाडी झाली अन् उमेदवार निवडून आणण्या ऐवजी एकामेकाला पाडण्यासाठी हे निवडणूक लढवत आहेत का? असा संभ्रम मतदारांसमोर झाला. उबाठा गटाकडून शेकापला फक्त अलिबागची जागा सोडण्यात आली होती तरी शेकाप नेतृत्वाने घाई करत उमेदवार घोषित केले.अलिबाग मध्ये शेकाप आणि काँग्रेस यांच परंपरागत राजकीय वैर अगदी विल्या भोपळ्याचं कसं सख्य होणार शिवाय महायुतीत झालेली बंडाळीचा फायदा शेकापला उचलता आला नाही.शिवाय उबाठा गटाने इथे उमेदवार न दिल्याने इथेही फायदा शेकापला उचलता आला नाही.हीच अवस्था पनवेल उरण आणि पेण येथे झाली.
पनवेल मध्ये शेकापने बाळाराम पाटील यांना उमेदवारी दिली तसेच उबाठा गटाकडून लीना गरड यांना यांनाही उमेदवारी देण्यात आली.इथेही आघाडीत बिघाडी झाली.आणि याचा फायदा आयता प्रशांत ठाकूर यांना झाला.आघाडीतील मतांची विभागणी झाली.उरणमध्ये मनोहर भोईर यांना उबाठा गटाकडून उमेदवारी मिळाली तसेच आघाडीतील शेकापने जे एम म्हात्रे यांचे सुपुत्र प्रीतम म्हात्रे यांना आधीच उमेदवारी घोषित केली होती.भाजप उमेदवार महेश बालदी यांच्या विरोधात महायुतीतील शिवसेना शिंदे गटाने स्थानिक भूमिपुत्र उमेदवार द्या म्हणून दंड थोपटले होते शिवाय आगरी संघटनेने सुध्दा महेश बालदी यांना विरोध दर्शविला होता याचा फायदा ना शेकापला उचलता आला ना उबाठाला उठवता आला. शेकाप जरी महाविकास आघाडीत होता तरीही त्यांनी आघाडीतील नेत्यांशी समन्वय न साधता उबाठा गटाच्या उमेदवारास एकास एक उमेदवार देऊन स्वतः निवडणूक हरले आणि दुसऱ्याला पण घेऊन पडले.वास्तविक पाहता शेकापने एकच अलिबाग मधील उमेदवार निवडून आणण्यासाठी भर द्यायला हवा होता आणि जिल्हा परिषद निवडणूकीवर् भर देऊन आघाडी कडून अधिकच्या जागा घेऊन समाधान मानावे लागत होत पण शेकाप नेत्यांचा स्वाभिमान जागा झाला आणि रायगड हा शेकापचा बालेकिल्ला असूनही पराभव पत्करावा लागला. शेकाप आणि उबाठा गट आघाडीतील पक्ष एकमेकांना पाडल्याशिवाय राहत नाही हा संदेश पूर्ण रायगड जिल्ह्यात गेल्याने कर्जत मतदार संघात शेकापने उमेदवार न दिल्याने इथे शेकापने आघाडीचे काम न करता अपक्ष उमेदवार सुधाकर घारे यांना पाठिंबा देण्याविषयी शेकाप नेतृत्वाने फर्मान सोडलं.आणि आघाडीचे उमेदवार नितीन सावंत यांना पराभवाला सामोरे जावं लागलं.या मतदार संघात महायुतीत झालेली बंडाळी याचा फायदा उचलता आला नाही.