निवडणूक खर्चाशी सबंधित कागदपत्रे, दस्तावेज तपासणीकरिता सादर करावीत
संतोष दळवी - कर्जत
विधानसभा निवडणूक 2024 मध्ये 189-कर्जत विधानसभा मतदारसंघात एकूण 09 अधिकृत उमेदवार असून अंतिम झालेल्या उमेदवारांनी खर्च नोंदवही, निवडणूक खर्चासाठी उघडलेली स्वतंत्र बँक खाते पासबुक, निवडणूक खर्चाची प्रमाणके व उपप्रमाणके, रोख रक्कम तपशील इत्यादी व निवडणूक खर्चाशी सबंधित इतर अनुषंगिक कागदपत्रे/दस्तावेज खालीदिलेल्या तारखांना मा.निवडणूक खर्च निरीक्षक यांच्यासमोर तपासणीकरिता सादर करावीत, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी प्रकाश संकपाळ यांनी केले आहे.
या खर्चाच्या नोंदवहीमध्ये नोंदविलेल्या लेख्यांची तपासणी, निवडणूक खर्चावर देखरेख सूचनांचा सारसंग्रह 2024 मधील भाग-क (एक) मध्ये दिलेल्या निर्देशानुसार प्रचार कालावधीत किमान तीन वेळा होणे आवश्यक आहे. त्यानुसार मा.भारत निवडणूक आयोग यांच्याकडून नियुक्त करण्यात आलेले निवडणूक खर्च निरीक्षक, 189-कर्जत विधानसभा श्री.रमेश कुमार हे उमेदवारांच्या खर्च नोंदवह्यांची तपासणी पुढील नमूद वेळापत्रकानुसार करणार आहेत.
मा.निवडणूक खर्च निरीक्षक, 189-कर्जत विधानसभा यांच्यामार्फत उमेदवारांच्या खर्च नोंदवह्यांची तपासणी वेळापत्रक पुढीलप्रमाणे :- प्रथम, दि.10 नोव्हेंबर 2024 वेळ दुपारी 3.00 ते सायंकाळी 6.30, द्वितीय, दि.14 नोव्हेंबर 2024 वेळ दुपारी 3.00 ते सायंकाळी 6.30, तृतीय, दि.18 नोव्हेंबर 2024 वेळ दुपारी 3.00 ते सायंकाळी 6.30, स्थळ:- प्रशासकीय भवन, पोलीस ग्राऊंडच्या शेजारी कर्जत ता.कर्जत.
सदर तपासणीवेळी उमेदवाराने आपले खर्च रजिस्टर नोंदवही विहित पद्धतीने सादर न केल्यास त्यांच्यावर लोकप्रतिनिधित्व अधिनियम, 1951 च्या कलम 77 व भारतीय दंडसंहितेच्या कलम 171-1 अन्वये पुढील कार्यवाही प्रस्तावित केली जाईल याची नोंद घ्यावी.