Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

स्वातंत्र्य मिळाले; स्वराज्य कुठे गेले?डॉ.भारतकुमार राऊत यांचा लेख

असंतोषाचे जनक!

भारतीय असंतोषाचे जनक, तत्ववेत्ते, खगोलतज्ज्ञ, गणितज्ज्ञ, पत्रकार, गीतेचे भाष्यकार लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची आज १०० वी पुण्यतिथी.

'स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे व तो मी मिळवणारच', या त्यांच्या क्रांतिकारी घोषणेचे २०१६ हे शताब्दी वर्ष होतं! त्यानिमित्त दै. केसरीने खास अंक प्रसिद्ध केला. त्यात व 'नवशक्ति'त  प्रकाशित झालेला माझा लेख इथे सादर करत आहे.

लोकमान्यांच्या स्मृतींना आदरांजली !

.....
स्वातंत्र्य मिळाले; स्वराज्य कुठे गेले?


जगाच्या इतिहासाकडे पाहिले, तर असे दिसते की, प्रत्येक घोषणा व घोषवाक्य आपल्याबरोबर नवा इतिहास घेऊन येते व मळलेल्या वाटेवरून चालणाऱ्या इतिहासाला नव्या वळणावर घेऊन जाते. झाँसीची राणी लक्ष्मीबाई चित्कारल्या `मेरी झाँसी नहीं दूँगी' आणि 1857चे पहिले भारतीय स्वातंत्र्य संग्राम पेटले. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी ब्रिटनचे सर विस्टन चर्चिल यांनी आवाहन केले, Give me blood, I will give you freedom. या वाक्यामुळेच ब्रिटिश जनता नाझी हुकुमशहांविरुद्ध पेटून उठली. महात्मा गांधींनी मुंबईच्या गवालिया टँकवरून नारा दिला, `चले जाव - करेंगे या मरेंगे' आणि देशभर ब्रिटिश साम्राज्यशाहीविरुद्धही अखेरची निकराची लढाई सुरू झाली. नेताजी सुभाष चंद्र बोसांनी सिंगापूरमध्ये आपल्या आझाद हिंद सेनेला आदेश दिला, `चलो दिल्ली'. काही दिवसांतच आझाद हिंद सेना आसाम, मणिपूरमध्ये घुसली. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात असेच कमालीचे प्रेरणादायक ठरलेले विधान `स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच'. 

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी अहमदनगरमध्ये भर पावसात झालेल्या सभेत उच्चारलेल्या या वाक्याने देशवासीयांच्या मनात स्वातंत्र्याचा अंगार फुलला. तो पुढे 31 वर्षे पेटतच राहिला. 

लोकमान्यांच्या स्वराज्याच्या महामंत्राची शताब्दी यंदा साजरी होत आहे. त्यानिमित्त त्यांचे हे वाक्य व त्यामागील विचार यांच्या आजूबाजूला व अवती-भवती जो ऐतिहासिक व भावनिक संदर्भपुंज आहे, त्याचा धांडोळा घ्यायला हवा.
टिळक राजकीय नेता तर होतेच, पण ते एक विद्वान विचारवंत व तत्त्वज्ञ होते. प्रत्येक शब्द उच्चरण्यापूर्वी व लिहिण्यापूर्वी ते त्याचा अर्थ व अन्वयार्थ नीट तपासून घेत. त्यामुळेच त्यांचे प्रत्येक वाक्य व त्यातील प्रत्येक शब्द तोलून-मापूनच वापरला गेल्याचे ध्यानात येते. पुण्यातील प्लेगच्या साथीनंतर जे अत्याचार झाले, त्यावर भाष्य करताना टिळकांनी लिहिले `या सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?' वरवर पाहता हे वाक्य उद्वेगाच्या भरात आलेले वाटले, तरी त्यामागे निश्चित विचार होता. देशभावना चेतवण्याचे कार्य टिळकांना करायचे होते व त्यासाठीच हा अग्रलेख हे एक हत्यार होते.

याच परिमाणाने `स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे व तो मी मिळवणारच' या वाक्याचे पृथ:करण व्हायला हवे. दुर्दैवाने आज या वाक्याचा अन्वयार्थ न शोधताच त्याचा सवंगपणे वापर राजकीय स्वार्थ व कुरघोडी यासाठी केला जातो. शंभर वर्षांनंतर टिळकांवर असा अन्याय व त्यांच्या विद्वत्तेचा अधिक्षेप करण्याचा अधिकार आपल्यापैकी कुणालाच नाही.
लोकमान्यांनी हे विधान 1916मध्ये केले. त्यावेळी ते मंडालेची शिक्षा भोगून परतले होते. त्यांचे नेतृत्त्व साऱ्या देशाने मान्य केले होते व `लाल-बाल-पाल' या त्रयीत त्यांची गणना होऊ लागली होती. लोकमान्यांनी बंगालपासून पंजाबपर्यंतचा देश पिंजून काढला होता व भारतात `होमरुल' यावा यासाठीच ते प्रयत्नशील होते. महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरु यांच्यासारख्या मध्यममार्गी व नेमस्त नेतृत्त्वाचा प्रभाव निर्माण व्हायचा होता. अशा वेळी त्यांनी `स्वराज्या'ची घोषणा केली होती, हे महत्त्वाचे.

`स्वातंत्र्य' ही संज्ञा तेव्हा जन्माला आली होती, कारण 1885मध्येच राष्ट्रीय सभेची स्थापना झाली होती. या सभेचेच रुपांतर पुढे राष्ट्रीय काँग्रेसमध्ये झाले. तरीही लोकमान्यांनी `स्वराज्य' ही संज्ञा वापरली; `स्वातंत्र्य' नाही. हे टिळक फार विचारपूर्वक बोलले. त्यांच्या नजरेसमोर छत्रपती शिवाजी महाराजांची `हिंदवी स्वराज्या'ची संकल्पना होती. स्वराज्य व स्वातंत्र्य यातला सूक्ष्म फरक त्यांना ठाऊक होता. म्हणूनच त्यांनी जाणीवपूर्वक `स्वराज्य' हा शब्दप्रयोग केला. स्वातंत्र्य ही एक कायदेशीर, घटनात्मक कल्पना आहे, तर स्वराज्य ला मानसिक ठेवण महत्त्वाची ठरते. जो स्वतंत्र असेल, तो स्वराज्य उपभोगतच असेल, असे नाही. पण स्वराज्यातील व्यक्ती ही स्वतंत्र असणारच, यावर टिळकांची श्रद्धा असावी. स्वराज्य म्हणजे Independence वा Freedom नव्हे, हे त्यांना ठाऊक होते. त्यामुळेच याच वाक्याचा त्यांनी इंग्रजीत उपयोग केला, तेव्हा त्यांनी `Swaraj is my Birth right and I shall have it' असे इंग्रजांना ठणकावले होते. हे वाक्य इंग्रजीतही म्हणण्याचे कारण भारतीयांची भावना केवळ नेटिव्ह भारतीयांपर्यंतच मर्यादित न राहता ती दूर ब्रिटनमध्ये बसलेल्या राजाच्या कानावर जावी, हीच त्यांची इच्छा होती व तसेच घडलेसुद्धा. टिळकांचा दूरदर्शीपणा असा नजरेस पडला.
टिळकांचा प्रत्येक शब्द विचारपूर्वक निर्माण झालेला असे, असे मघाशी म्हटले. या वाक्यातील प्रत्येक शब्दाचेही तसेच आहे. त्यात त्यांनी स्वराज्याला `जन्मसिद्ध हक्क' म्हटले. ते कदाचित `कायदेशीर अधिकार' असे म्हणू शकले असते. पण कायदेशीर अधिकार हा कायद्याने प्राप्त झालेला असतो. हा कायदा कुणी तरी आणावा लागतो व कायदा बदलला की, हा हक्कही जाऊ शकतो. लोकमान्यांना हे मान्य नव्हते. स्वराज्य हा आपला `जन्मसिद्ध हक्क' आहे, असेच त्यांनी मानले व तसेच ते वागत राहीले. `मी जन्मानेच मुक्त आहे. तो अधिकार मला कुणी दिलेला नसून तो माझा माझ्या जन्माबरोबरच प्राप्त झालेला हक्क आहे, ही त्यांची या मागची भावना आहे. ती मनाला स्तीमित व मुग्ध करते.

टिळक भारतीय असंतोषाचे जनक होते; सर्वमान्य नेता होते. त्यामुळे `स्वराज्य हा आमचा (म्हणजे भारतीयांचा) जन्मसिद्ध हक्क आहे', असेही ते म्हणू शकले असते. पण ते `माझा हक्क' असे म्हणाले. यातील `मी'ला विशेष महत्त्व आहे. `स्वराज्य' ही संकल्पनाच `स्व'विषयी असल्याने त्याचे बहुवचन करणे त्यांना मान्य नव्हते. इथे ते व्यक्तिवादी बनतात. स्वराज्य जर प्रत्येकाचा स्वत:चा हक्क असेल, तर तो सर्व भारतीयांचा हक्क बनणारच, हे त्यांनी गृहित धरले होते. या मागचा विचार मोठा आहे, हे नक्की.

याच वाक्यात ते पुढे म्हणतात की, `..आणि तो मी मिळवीनच'. इथेही `मी' आलाच. यात प्रत्येकाला सामावून घेण्याची भावना आहे. खरे तर टिळकांच्या हयातीत स्वराज्य जवळपासही आलेले नव्हते. त्यामुळे राष्ट्रीय काँग्रेसपासून सर्वांना ब्रिटिश सरकारकडे केवळ मागण्याच करता येत होत्या. त्या मान्य करायच्या की नाही, केल्याच तर कितपत मान्य करायच्या, हे सारे लंडनश्वरांच्याच कृपेवर अवलंबून होते. त्यामुळे `स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे व तो मला द्या', असेही ते म्हणू शकले असते. पण टिळकांची मागण्यांची भिकेची झोळी पसरण्याची मनोवृत्तीच नव्हती. जो माझा हक्क आहे, तो देणारे ब्रिटिश राज्यकर्ते कोण? हा त्यांचा सवाल होता. माझा जन्मसिद्ध हक्क मी कुणाकडे दयेची याचना करून मागणार नाही; तो माझा मी मिळवीनच, हा त्यांचा कमालीचा ओजस्वी आत्मविश्वास होता.

`स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे व तो मी मिळवीनच' या लोकमान्यांच्या वाक्याचा कमालीचा प्रभाव भारतीय जनमानसावर पडला व देशात ठिकठिकाणी राष्ट्रीय चळवळीला सुरुवात झाली. याच काळात त्यांनी स्वराज्याची चतु:सुत्रीही विशद केली. स्वराज्य, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण व सत्याग्रह या चार सूत्रांवर स्वातंत्र्याची चळवळ देशभर पोहोचवण्याची त्यांची उमेद होती. देशभर स्वकीयांच्या राष्ट्रीय शाळा सुरु झाल्या. परकीय मालाच्या  होळी होऊ  लागल्या. बॉम्बे स्वदेशी स्टोअर्ससारखी दुकाने उघडली गेली. लोकांनी गावागावात सत्याग्रह व हरताळ चालू केले. ब्रिटिश राज्यकर्ते अस्वस्थ होऊ लागले. दुर्दैवाने त्यांना पुढे आणखी चारच वर्षांचे आयुष्य लाभले व 1920नंतर स्वातंत्र्याची चळवळ गांधी, नेहरू यांच्या हातात गेली. 1930मध्ये लाहोर काँग्रेसमध्ये प्रथमच संपूर्ण स्वातंत्र्याची माग्णी काँग्रेसने केली. त्यानंतर खरोखरच ब्रिटिशांच्या जोखडातून भारत मुक्त होण्यास आणखी 17 वर्षे लागली व एक महायुद्ध सुरू होऊन संपावे लागले. टिळकांना जर अधिक आयुष्य लाभते, तर कदाचित दुसऱ्या महायुद्धाचा भडका उडायच्या आतच भारतात स्वराज्य अवतरले असते. 

अर्थात अशा जर-तरच्या प्रश्नांना पूर्ण उत्तरे नसतात व अर्थही उरलेला नसतो.

स्वातंत्र्य मिळून ७१व्या वर्षात देश प्रवेश करत असताना प्रश्न हा पडतो की, देशाला स्वातंत्र्य मिळाले खरे, पण स्वराज्य खरेच आले का? त्याचे दुर्दैवाने उत्तर नाही, असे आहे. असे म्हणणे धारिष्ट्याचे असले, तरी ते सत्य आहे. स्वातंत्र्य मिळाल्यामुळे स्वकीयांचे, त्यांच्या पक्षांचे, त्यांच्या लोकप्रतिनिधींचे राज्य आले हे खरेच. 

पूर्वी ज्या गाड्यांतून गोरे साहेब व त्यांचे देशी हुजरे मिरवत होते, तशाच गाड्यांतून आला देशी पुढारी व त्यांचे चमचे फिरतात. दर पाच वर्षांनी देशात निवडणुकांचा उत्सव किंवा उरुस रंगतो. मस्तवाल बैलांच्या वा कोंबड्याच्या झुंजी लागाव्यात, तशा झुंजी रंगतात. त्या पाहण्यास मोठी गर्दी जमते. एक कोंबडा, बैल जिंकतो. दुसरा जखमी होऊन पराभूत ठरतो. लोक बेभान होऊन पैसे उधळतात. प्रेक्षक घरोघरी पांगतात. झुंजी लावणारे प्रेक्षकांनी फेकलेले पैसे गोळा करुन दुसरीकडे झुंज लावण्यासाठी एकत्रच जातात.
भारतीय स्वातंत्र्याचे तसेच झाले आहे का? याचा विचार करायला हवा. हे स्वातंत्र्य कुणाचे? जनतेचे, स्वयंघोषित पुढाऱ्यांचे की त्यांना नाचवणाऱ्या पडद्यामागच्या दलालांचे? हेच जर स्वातंत्र्य असेल, तर दर पाच वर्षांनी रांगा लावून मतदान करण्यापलिकडे जनतेला त्यात काय स्थान? `जनतेचे, जनतेने, जनतेसाठी चालवलेले राष्ट्र' अशी जर संकल्पना असेल, तर यात जनतेचा सहभाग कुठे आहे? स्वातंत्र्य ही घटनात्मक व कायदेशीर संकल्पना असल्याने कदाचित हा स्वतंत्र भारताचा कारभार असेलही, पण त्यात `स्वराज्य' कुठे आहे?
`स्वराज्य' जर असते, तर प्रत्येक भारतीयाला हे `माझे' राज्य आहे, असे वाटायला हवे होते. तसे वाटते आहे का? कुणी म्हणते काँग्रेसचे राज्य, तर कुणासाठी ते भाजपचे राज्य. कुणाला ते मोदींचे राज्य वाटते तर कुणाला ते पूर्वी सोनियांचे राज्य होते, याची जाणीव बोचत राहते. कुठे लोकशाहीच्या गादीवर बसलेला एक `राजा' तर दुसरीकडे दुसराच `महाराजा'. पूर्वी भारतात राजांची, महाराजांची, सुलतानांची व पातशहांची राज्ये होती. ती वंशपरंपरेने एकाच घराण्यात राहायची. राजाचा मुलगा पुढचा राजा बनायचा व त्याचा मुलगा आधी युवराज व पुढे राजा असायचा. हे राजे आपापल्या राज्यांची व्याप्ती वाढवण्यासाठी आपसात लढायचे. त्यात दोन्ही बाजूंच्या सैनिकांचे जीव जायचे. रयतेची लूट व्हायची. बाया-बापड्यावर अत्याचार व्हायचे. नवनवे कर लादले जायचे. आज परिस्थिती खरेच वेगळी आहे?

आजही लोकशाहीतील राजांची राजघराणी सर्वच राज्यांत व पक्षांत आहेत. राजा वृद्ध झाला, तर कारभार कार्यकर्त्यांकडे नव्हे, तर मुलांकडेच जातो आहे. त्यांच्याच डोक्यावर राजरोसपणे राजमुकुटासारखी टोपी वा तलवार दिली जात आहे. कार्यकर्ते त्यांच्याच नावाचा जयजयकार करत आहेत. अमुक-तमुक कुटुंबातील मुलाला किंवा मुलीला निवडणुकीच्या रिंगणात नेता म्हणून उतरवले नाही, तर पक्षाची वाट लागेल, असे पक्षांतील धुरिणच मनापासून मानू लागले आहेत, याला काय म्हणावे? पूर्वी एक राजा मेला की, दुसऱ्याच मिनिटाला युवराजाच्या नावाची द्वाही फिरवली जाई व जनता छोटे सरकारांच्या नावाचा जयघोष करू लागत. आजही स्थिती तीच आहे. काश्मीरात शेख अब्दुल्लांनंतर फारुख अब्दुल्ला व त्यांच्या नंतर ओमर अब्दुल्ला सत्तेवर आले. मुफ्ती महम्मद सईद यांच्यानंतर त्यांची कन्या मेहबुबा मुफ्ती आल्या. उत्तर प्रदेशात मुलायम सिंहांनंतर अखिलेश आले. बिहारात लालूंनंतर त्यांच्या पत्नी राबडी देवी, नंतर दोन चिरंजीव आले. कन्या मिसादेवी थेट राज्यसभेच्या खासदार बनल्या. पंजाबात प्रकाश सिंह बादल मुख्यमंत्री तर त्यांचे चिरंजीव सुखविंदर बादल उपमुख्यमंत्री बनले. स्नुषा हरमिंदर कौर बादल केंद्रात राज्यमंत्री झाल्या. तामीळनाडूतील द्रमुकची वंशावळ सर्वांना ठाऊकच आहे. दिल्लीत नेहरुंनंतर इंदिरा गांधी, नंतर संजय व राजीव गांधी, आता राहुल व त्यांच्या पाठोपाठ प्रियांका पुढे येतच आहेत. यशवंत सिन्हांनी संसद सोडली व त्यांचे चिरंजीव मंत्री झाले.

सर्वत्र हे असेच चालू राहिले, तर जनतेला `स्व'त:चे वाटेल, असे राज्य यायचे कसे? की यातल्या `स्व'चा अर्थ वंशपरंपरेने चालत आलेला नेता, असेच राजकारण व सत्ताकारणात वावरणाऱ्यांना व त्यांच्या हुजऱ्या-मुजऱ्यांना वाटते?

जर लोकमान्यांना अभिप्रेत असलेले व त्यांचा `जन्मसिद्ध हक्क' असलेले स्वराज्य मिळवायचेच असेल, तर आता ब्रिटिश नव्हे, तर स्वकीयांच्या गुलामगिरीच्या जोखडातून भारताला व भारतीयांना मुक्त करावे लागेल. टिळकांचा पुनर्जन्मावर विश्वास होता की नाही, ते ठाऊक नाही. पण इतके मात्र खरे की, लोकशाही व स्वराज्याच्या संकल्पनेवर दृढ श्रद्धा असलेल्यांनाच आता लोकमान्यांनी म्हटल्याप्रमाणे `पुनश्च हरि ॐ'चा गजर करत नव्याने सुरुवात करावी लागेल. ती शक्ती आपल्या मनगटात व उर्मी आपल्या ऊरात निर्माण होवो, हीच प्रार्थना!

डॉ.भारतकुमार राऊत

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies