वैद्यकीय क्षेत्रातील जिगरबाज योद्धा हरपला - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Tuesday, August 25, 2020

वैद्यकीय क्षेत्रातील जिगरबाज योद्धा हरपला

 वैद्यकीय क्षेत्रातील जिगरबाज योद्धा हरपला

               - एसडीएम सुभाष शिंदे


कोरोना योद्धा डॉ. सुनील टेकाम यांना भावपूर्ण श्रद्धांजली


राजेंद्र मर्दाने

महाराष्ट्र मिरर टीम चंद्रपूर   जागतिक महामारी ठरलेल्या कोरोनापासून तालुक्यात कोरोनाबाधित  रुग्णांच्या जीवाचे रक्षण करण्यासाठी सर्वच आघाड्यांवर स्वत:ला झोकून देत प्रयत्नांची शिकस्त करणारे डॉ. सुनील टेकाम हे शहीद झाल्याने उपजिल्हा रुग्णालयातील जिगरबाज योद्धा हरपला, अशा भावपूर्ण शब्दात उपविभागीय अधिकारी सुभाष शिंदे यांनी  त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.  कोरोना योद्धा डॉ. सुनील टेकाम यांच्या कार्याला सलाम  करण्यासाठी उपजिल्हा रुग्णालयाच्या सभागृहात समस्त वैद्यकीय अधिकारी व कर्मचा-यांतर्फे  आयोजित श्रद्धांजली कार्यक्रमात ते बोलत होते.  

  वैद्यकीय अधीक्षक डॉ. गोवर्धन दुधे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात तालुका  वैद्यकीय अधिकारी डॉ. बी.एन. मुंजनकर, डॉ. उत्तम पाटील, पत्रकार राजेंद्र मर्दाने, डॉ. अंकुश राठोड, डॉ. राकेश बांगडकर, डॉ.अरविंद शेंडे,  डॉ. रीता पेटकर  इ. प्रामुख्याने उपस्थित होते.

      पुढे  बोलताना सुभाष शिंदे म्हणाले की, डॉ. टेकाम हे सामाजिक बांधीलकी जपणारे एक प्रामाणिक व कर्तव्यदक्ष अधिकारी होते. त्यांचे अचानक निघून जाणे वेदनादायी आहे. कोरोनाविरोधात लढा देणाऱ्या सर्वांनी शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या सूचनांचे कटाक्षाने पालन करणे, त्याला आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनविणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त करीत  कोणीही कोरोनाला हलक्यात घेऊ नये, असा इशाराही त्यांनी दिला. डॉ.टेकाम यांच्या परिवाराला कोणताही त्रास होणार नाही, मरणोत्तर सर्व लाभ वेळेत मिळतील, यांची पुरेपूर काळजी घेण्यात येईल, यांची ग्वाही त्यांनी दिली.  

     डॉ.दुधे म्हणाले की, डॉ. सुनील टेकाम वरोरा उपजिल्हा रुग्णालयात केंद्र सरकारच्या आयुष्य कार्यक्रमांतर्गत कार्यरत होते. कोरोना संक्रमण काळात त्यांनी आपली सेवा दिली. कोरोनाची लागण झाल्याने त्यांचे  दुर्दैवी निधन झाले. ते आयुर्वेदिक विभागाशी निगडित असल्याने वरोरा उपजिल्हा रुग्णालयात  नव्याने विकसित होणाऱ्या आयुर्वेदिक बगीच्याला  कोरोना योद्धा डॉ.सुनील टेकाम बगीचा असे नामकरण करणार असल्याचे डॉ. दुधे यांनी सांगितले. 

    डॉ. राठोड म्हणाले की, कोरोना काळात रुग्णालयात येणाऱ्या रूग्णांनी आजारासंबधाची खरी माहिती लपवू नये, यांचे गंभीर परिणाम इतरांना भोगावे लागतात. कोरोना काळात डाक्टरांना पुरविण्यात येणाऱ्या सोयी - सुविधा तुटपुंज्या आहेत. वैद्यकीय क्षेत्रात कर्तव्य बजावताना नैराश्य येऊ नये यासाठी शासनाला ठोस पावले उचलण्याची आवश्यकता आहे. डॉ. टेकाम यांच्या परिवाराला सर्वतोपरी मदत होईल अशी कृती शासनाने करावी, अशी मागणीही त्यांनी केली. 

    यावेळी पत्रकार राजेंद्र मर्दाने व परिचारिका रुबीना खान यांनी मनोगतात डॉ. टेकाम यांच्या  गुणवैशिष्ट्याचे नेटके विवेचन करीत संवेदना व्यक्त केल्या.

    सुरुवातीला दोन मिनिटे मौन पाळून डॉ.टेकाम यांना श्रद्धांजली अर्पित करण्यात आली.

   कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोविंद कुंभारे यांनी केले. 

     श्रद्धांजली कार्यक्रमात सर्वश्री शिवानंद पाटील, ओंकार मडावी, दीपक अंबादे, सुनिता काकडे, चंदा बोबडे, अंकीता कोंडे, अँलीन सिमॉल, विजय वैद्य, जुलमे, विनोद निशानकर, दिलीप क्षीरसागर, लक्ष्मीकांत टाले, सामाजिक कार्यकर्ते प्रा. विशाल जुमडे सह उपजिल्हा रुग्णालयातील विविध विभागातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment