Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

वाशिष्ठी व शिवनदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने चिपळूण जलमय; बहादूर शेख नाका येथील पूल वाहतुकीसाठी ठेवण्यात आला बंद, दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा

 वाशिष्ठी व शिवनदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने चिपळूण जलमय; बहादूर शेख नाका येथील पूल वाहतुकीसाठी ठेवण्यात आला बंद, दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा               


ओंकार रेळेकर-चिपळूणगेल्या गेल्या काही दिवसांपासून  सातत्याने पडत असलेला पाऊस व शनिवारी रात्री जोरदार पावसामुळे चिपळुणात वाशिष्टी व शिवनदीने धोक्‍याची पातळी ओलांडल्याने बाजार पुलावरून पाणी वाहून गेले. तर बाजारपेठेत पाणी शिरले होते. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून बहादूरशेख नाका येथील वाशिष्ठी नदीवरील पूल शनिवारी रात्रीपासून वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता. यामुळे दोन्ही बाजूकडे वाहनांची मोठी रांग लागली होती. तर काहींनी आपली वाहने सुरक्षित स्थळी हलविली होती. एकंदरीत शनिवारी रात्रीपासून चिपळूण शहरासह खेर्डी परिसर जलमय झाले चित्र निर्माण झाले होते. यामुळे शनिवारी रात्र नागरिकांनी जागून काढली. पर्यायाने कोरोनामुळे जनजीवन विस्कळीत झाले असताना आता अतिवृष्टीमुळे आणखीनच जनजीवन विस्कळीत झाल्याचे पहावयास मिळाले.                                    यावर्षी जून महिन्यात पावसाला वेळेत सुरुवात झाली. हा पाऊस सातत्याने पडत होता. मात्र अपवाद वगळता चिपळुणात पूर परिस्थिती निर्माण झाली नव्हती. मात्र, गेल्यावर्षी चिपळुणात जुलै महिन्यामध्ये पावसाने हाहाकार उडवला होता. चिपळूण बाजारपेठेत पाणी भरल्याचे चित्र निर्माण झाले होते. तर बहादूरशेख नाका येथील पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्याची वेळ प्रशासनावर आली होती. मात्र, या वर्षी जुलै महिन्यात अपवाद वगळता असे चित्र पहावयास मिळाले नव्हते. परंतु ऑगस्ट महिन्यात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पाऊस पडत आहे. शनिवारी रात्री पावसाने जोर धरला. कोयना धरण क्षेत्रात देखील पाऊस जोरदारपणे पडत होता. यामुळे वाशिष्ठी नदीच्या पाण्याची पातळी हळू वाढू लागली. तसेच शिवनदीच्या पाण्याची पातळी देखील वाढत होती. पावसाचा जोर वाढत राहिल्याने शनिवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास बाजार पुलावरून पाणी वाहू लागले. यामुळे चिपळूण बाजारपेठेत कालांतराने पाणी शिरू लागले. टप्प्याटप्प्याने खाटीक गल्ली, बाजारपूल परिसर रंगोबा साबळेरोड, चिंचनाका, भोगाळे, मध्यवर्ती बस स्थानक परिसर, वडनाका,अनंत आईस फॅक्टरी परिसर वेस मारुती मंदिर परिसर, रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यावर पाणी आले आदी परिसरात पाणी शिरू लागले एकंदरीत चिपळूण बाजारपेठ व  परिसरात जलमय ही परिस्थिती निर्माण झाली होती. ही परिस्थिती लक्षात आल्यानंतर चिपळूण बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी तात्काळ आपल्या दुकानात धाव घेऊन दुकानातील माल सुरक्षित स्थळी हरवला. दरम्यान चिपळूण नगरपरिषदेनेही भोंगा वाजवून नागरिकांना दक्षतेचा इशारा दिला. अचानकपणे उद्भवलेल्या परिस्थितीमध्ये नागरिक व व्यापाऱ्यांची धावपळ उडाली. काहींनी तर आपली वाहने सुरक्षित स्थळी हलविली. ही परिस्थिती रविवारपर्यंत होती.                                                         शनिवारी रात्री पडत असलेल्या पावसामुळे शिवनदी व वाशिष्ठी नदीने धोक्याची पातळी ओलांडली. पर्यायाने प्रशासनाने बहादूरशेख नाका येथील वाशिष्ठी नदीवरील पूल वाहतुकीसाठी शनिवारी रात्री तात्काळ बंद केला. यामुळे या पुलावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली. मात्र, तोपर्यंत दोन्ही बाजूला वाहनांची मोठी रांग लागली होती. हे चित्र रविवारी सकाळपर्यंत पहावयास मिळाले होते. हा पूल वाहतुकीसाठी बंद ठेवला गेल्याने गणेशोत्सवानिमित्त गावी येणाऱ्या चाकरमान्यांचे मोठे हाल झाले. मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांमधून मार्गक्रमण करीत असताना चिपळुणात आल्यानंतर बहादूर शेखनाका येथील पूल वाहतुकीसाठी बंद ठेवला गेला असल्याचे पहावयास मिळाल्यानंतर चाकरमान्यांनी पर्यायी मार्गाचा अवलंब केला. मात्र, दोन्ही बाजूला अवजड वाहनांची मोठी रांग लागली होती.                     चिपळूण शहरातील चिंचनाका, भोगाळे परिसरात पाणी शिरल्याचे लक्षात आल्यानंतर येथील एसटी प्रशासनाने मध्यवर्ती बस स्थानकातील वाहने पॉवर हाउस व मुंबई-गोवा महामार्ग ठिकाणी सुरक्षित स्थळी हलवली तर काही वाहने शिवाजीनगर बस स्थानकात हलवण्यात आली. तसेच खाजगी वाहनधारकांनी देखील आपली वाहने मुंबई-गोवा महामार्गाच्या ठिकाणी उभी केली होती.                                                        शनिवारी रात्री पडलेल्या पावसामुळे चिपळूण बाजारपेठेत पाणी शिरल्याने रविवारी बाजारपेठ खुली करण्यात व्यापाऱ्यांना अडचणी निर्माण झाल्या होत्या. चिंचनाका परिसर रंगोबा साबळेरोड, बाजारपूल परिसर आदी परिसरात पाणी राहिल्याने या परिसरातील व्यापारांना आपली दुकाने उघडणे अवघड होऊन बसले होते. एकंदरीत आणि गणेशोत्सवाच्या तोंडावर चिपळूण बाजारपेठेतील व्यापाऱ्यांचे आर्थिक विस्कळीत झाले आहेत. कोरोना परिस्थितीमुळे काही दिवस दुकाने बंद ठेवण्याची वेळ आली होती. तर भाजी व्यापार्‍यांनी देखील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आठवडाभर भाजी व्यापार बंद ठेवला होता. मात्र शनिवारी रात्री पडलेल्या पावसामुळे रविवारी भाजी व्यापार सुरू करण्यास अडचणी निर्माण झाल्या होत्या. एकंदरीत चिपळूण बाजारपेठेतील व्यापाऱ्यांना अडथळ्यांची शर्यत पार करावी लागत आहे,असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.                                                  चिपळूण नगर परिषद व महसूल प्रशासनाने आपले आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवली. प्रांताधिकारी प्रवीण पवार, उपविभागीय पोलिस अधिकारी नवनाथ ढवळे, तहसीलदार जयराज सूर्यवंशी, मुख्याधिकारी डॉक्टर वैभव विधाते आदी अधिकारी या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.                                                    खेर्डी परिसरात देखील परिस्थिती वेगळी नव्हती.  खेर्डी येथील वेलकम पार्कमधील दुकान गाळ्यांचे या वर्षीच्या पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरवेळेला मोठा पाऊस पडला की या वेलकम पार्क परिसरात पाणी शिरते.पर्यायाने गाळ्यांमध्ये पाणी शिरून आतील मालांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. यामुळे गाळेधारकांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. ही परिस्थिती सुधारण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न केले. मात्र हे प्रयत्न तोकडे पडत असल्याचे चित्र शनिवारी व रविवारी पुन्हा एकदा पहावयास मिळाले आहे. तरी प्रशासनाने यावर कायमचा तोडगा काढावा अशी मागणी येथील गाळेधारकांसह रहिवाशांनी केली आहे. एकंदरीत चिपळूण शहर व खेर्डी बहुतांश परिसर जलमय झाल्याचे चित्र पहावयास मिळत होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies