Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

भातावरील कीड , रोग निर्मूलनासाठी कृषी तज्ज्ञांचा सल्ला

 भातावरील कीड , रोग निर्मूलनासाठी कृषी तज्ज्ञांचा सल्ला.

ज्ञानेश्वर बागडे-
महाराष्ट्र मिरर टीम कर्जत


कोकणात हिरवीगार भात शेती बहरत असून जोरदार पाऊस, अधून मधून उघडीप व हवेत गारवा असलेले सध्याचे हवामान, कीड व रोगाच्या वाढीस अत्यंत पोषक असल्याने खोडकीडा, सुरळीतील अळी, पाने गुंडाळणारी अळी व करपा रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होऊन शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असल्याने ते टाळण्यासाठी कृषी सल्ल्याचे कटाक्षाने पालन करावे, असे आवाहन प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र कर्जतचे सहयोगी संशोधन संचालक डॉ शिवराम भगत, कीटकशास्त्रज्ञ डॉ विनायक जालगावकर व विस्तार शिक्षण शास्त्रज्ञ डॉ रवींद्र मर्दाने यांनी केले आहे.



       खोडकिड्याचा प्रादुर्भाव भात पीक वाढीच्या सर्व अवस्थांमध्ये आढळून येतो.अळी सुरवातीला काही वेळ कोवळ्या पानांवर आपली उपजीविका करते.नंतर ती खाली येऊन खोडास छिद्र पाडून आत प्रवेश करते व आतील भाग पोखरून खाते.किडीचा प्रादुर्भाव जर पिकाच्या फुटवे येण्याच्या अवस्थेत किंवा पीक पोटरीवर येण्यापूर्वी झाला तर रोगाचा मधला पोंगा लालसर पिवळा पडून वरून खाली सुकत येतो, यालाच ' गाभा मर ' असे म्हणतात .सुकलेला किंवा मेलेला पोंगा हाताने ओढला असता सहजासहजी निघून येतो.पोटरीतील पिकावर देखील खोडकिडीचा उपद्रव आढळून येतो आणि त्यामुळे दाणे न भरलेल्या पांढऱ्या लोंब्या बाहेर पडतात.यालाच ' पळींज किंवा पांढरी पिसे ' असे म्हणतात.परिणामतः भाताच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट येते.


     पाने गुंडाळणाऱ्या अळ्या पानाच्या दोन्ही कडा एकत्र चिटकवून गुंडाळी करते व त्यात राहून आतील पृष्ठभागातील हरितद्रव्य खाते.त्यामुळे गुंडाळीच्या बाह्य पृष्ठभागावर पांढरट चट्टा पडतो.नुकसान जास्त असेल तर पीक निस्तेज पडते.

      सुरळीतील अळी कोवळे पान कापून त्याचे लहान तुकडे करते व त्याची सुरळी करून त्यात राहते.रात्रीच्या वेळी अळी सुरळीसह भाताच्या आव्यावर चढते व पानातील हरितद्रव्य खरवडून खाते.त्यामुळे पानावर पांढरे पट्टे दिसून येतात.पीक निस्तेज दिसते.वाढ खुंटते.सुरळया पानाच्या एका कडेस लटकत किंवा पाण्यावर तरंगत असलेल्या दिसतात.

      वरील तिन्ही किडींच्या व्यवस्थापनासाठी कारटॉप हायड्रोक्लोराईड ४% दाणेदार १८.७५ किलो किंवा क्लोरॅन्ट्रानिलीप्रोल ४% दाणेदार १० किलो किंवा फिप्रोनील ०.३ % दाणेदार २०.८ किलो किंवा ऍसिफेट ७५% ६२५ ग्रॅम किंवा क्विनॉलफॉस २५ % प्रवाही १२५० मि.ली. किंवा कारटॉप हायड्रोक्लोराईड ५०% प्रवाही ६००  ग्रॅम किंवा फ्युबेंडामाइड २० % WG १२५ ग्रॅम किंवा डेल्टामेथ्रीन १.८ % ६५० मि.ली. किंवा लम्बडा साहेलोथ्रीन ५% ५०० मि .ली.ची फवारणी करावी.

      कडाकरपा हा विषाणूजन्य रोग असून  तो झ्यान्थोमोनोस ओरायझी या जिवाणूंमुळे उद्भवतो.यात सुरवातीस पानांच्या कडा करपतात.कालांतराने करपलेला भाग पानांच्या मध्य शिरेपर्यंत वाढतो.रोगाची सुरुवात पानांच्या कडेपासून होत असल्याने या रोगास 'कडाकरपा' म्हणतात.पानांच्या अंतर्भागात रोगकारक जिवाणूंची संख्या वाढून हे जिवाणू पानांच्या पृष्ठभागावर पसरतात .यामुळे असंख्य जिवाणू असलेले मातकट रंगाचे अनेक थेंब पानांच्या पृष्ठभागावर साठलेले दिसतात.कालांतराने हे थेंब सुकून 

पानांवर टणक खवले आढळून येतात.अनुकूल वातावरणात जिवाणूंची संख्या वाढल्याने चुडातील रोपांची पाने करपून रोपे मरतात.याला रोगाची मर अवस्थाही म्हणतात .रोगाचा प्रादुर्भाव पीक फुलोऱ्यात असताना अथवा दाणे भरण्याच्या अवस्थेत झाल्यास लोंबीतील बहुतांश दाणे भरत नाहीत.पाने करपल्यामुळे प्रकाश संश्लेषण क्रियेत अडथळा निर्माण होऊन लोंबीतील अपरिपक्व दाण्यांचे प्रमाण वाढते.यामुळे उत्पादनात २० ते ६०% घट येण्याची शक्यता असते.याच्या नियंत्रणासाठी कॉपर ऑक्सिक्लोराईड २५ ग्रॅम + स्ट्रेप्टोसायक्लीन सल्फेट ५ ग्रॅम वापरावे.

      दाणेदार कीटकनाशक वापरताना शेतातील जास्त/वाहते पाणी बाहेर काढून बांध बांधून घ्यावे .किंचित पाणी किंवा ओलावा असतानाच ते वापरावे.फवारणी करायची असल्यास उघडीप बघून करावी.उघडीप ३-४ तास राहील,याची काळजी घ्यावी,असे कळविण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies