Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

कर्जतचे ज्येष्ठ प्रशिक्षक अमित गुरव यांचा, पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते सन्मान.

 कर्जतचे ज्येष्ठ प्रशिक्षक अमित गुरव यांचा, पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते सन्मान.

ज्ञानेश्वर बागडे-

महाराष्ट्र मिरर कर्जत


 दिनांक 15 ऑगस्ट 2020 रोजी अलिबाग येथील पोलीस परेड मैदान येथे स्वातंत्र्यदिनाच्या 73 व्या वर्धापन दिनी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यां व्यक्तींचा तसेच कोरोना योद्ध्यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या सन्मान सोहळ्यात कर्जत येथील, अमित गुरव (SWL) यांचा व त्यांच्या सहकाऱ्यांचा एकत्रितरीत्या, दि 3 जून 2020 रोजी निसर्ग चक्रीवादळ आपत्ती काळात केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल , महाराष्ट्र राज्याच्या उद्योग आणि खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार माहिती व जनसंपर्क, विधी व न्याय राज्यमंत्री तथा पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

दिनांक 3 जून 2020 रोजी निसर्ग चक्रीवादळ रायगड  जिल्ह्यात धडकणाऱ् ही पूर्वसूचना रायगड जिल्ह्याच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला मिळाली, त्यानुसार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक यांनी आवाहन केले की, “ज्या व्यक्तींनी जिल्हाधिकारी कार्यालया मार्फत वायरलेस म्हणजेच हॅम रेडिओ चे प्रशिक्षण घेतले आहे, त्यांनी प्रशासनाला सहकार्य करायला पुढे यावे”. रायगड जिल्हा आपत्ती कृती दल या व्हाट्सअप  ग्रुप वर आलेला मेसेज बघून, संपूर्ण जगभरात कोरोना सारखी धोकादायक परिस्थिती असतानासुद्धा अमित गुरव यांनी, या आव्हानात्मक कार्यात स्वयंसेवक म्हणून कार्य करण्याची इच्छा दर्शवली.  त्यानुसार रायगड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी  सागर पाठक व वायरलेस प्रशिक्षक नितीन ऐनापुरे(कोल्हापूर) यांच्या मार्गदर्शनानुसार, आलेल्या स्वयंसेवकांचे तीन टीम मध्ये विभाजन झाले. टीम दिलीप बापट, अमित गुरव, योगेश सदरे, मंदार गुप्ते हे आपत्ती निवारण कक्ष जिल्हाधिकारी कार्यालय अलिबाग येथे, तर टीम 2  अमोल देशपांडे (ज्येष्ठ गिर्यारोहक), सुनील उंडे,चंदू चव्हाण हे तहसील कार्यालय श्रीवर्धन येथे, आणि टीम 3,   नितीन ऐनापुरे,भाऊ चैगले हे विल्सन पॉईंट, महाबळेश्वर येथून सलग 98 तास अतिशय प्रतिकूल परिस्थितीत, रायगड जिल्ह्यातील आपत्तीग्रस्त तालुक्‍यांच्या संपर्कात होते. आणि अतिशय महत्त्वाच्या अशा संदेशांची देवाण-घेवाण करत होते. निसर्ग चक्रीवादळ रायगड जिल्ह्याला धडकल्यानंतर मोबाईल व इतर संपर्क यंत्रणा पूर्णपणे कोलमडून गेली व अशा वेळेस रायगड जिल्ह्यातील आपत्तीग्रस्त तालुक्यां बरोबर संपर्क प्रस्थापित करण्याचे महत्वाचे कार्य,  वायरलेस (HAM Radio)  यंत्रणेद्वारे केले गेले.   दिलीप बापट व  अमित गुरव वगळता अन्य सर्व सहकारी हे नवी मुंबई ठाणे व कोल्हापूर हुन सहकार्यास आले होते.. 

कर्जत मधील  अमित गुरव हे गिर्यारोहणाचे अधिकृत प्रशिक्षक आहेत, गेल्या 22 वर्षांत त्यांनी हजारो व्यक्तींना गिर्यारोहणाचे अनुभव व प्रशिक्षण सह्याद्री डोंगर रांगां मध्ये व हिमालयामध्ये दिले आहे. रक्षा सामाजिक विकास मंडळाचे ते सदस्य आहेत.  गेल्या कित्येक वर्षापासून वेगवेगळ्या शोध आणि बचाव मोहिमांमध्ये सहभागी झालेले आहेत. याच बरोबर कर्जत मधील मान्यवर संस्थांमार्फत  जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये व शिशू मंदिर मध्ये त्यांनी सुरक्षा व आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले आहेत.  2018 मध्ये अलिबाग ते गोवा या  ‘आपत्ती व्यवस्थापन जनजागृती सायकल मोहिमे’ (475किलोमीटर) मध्ये मार्गात येणाऱ्या माध्यमिक शाळांमधून  शिक्षक, विद्यार्थी यांना सुरक्षा व आपत्ती व्यवस्थापनाचे धडे दिलेले आहेत.  कर्जत तालुका हा डोंगराळ प्रदेश आहे. कर्जतच्या जवळपास सह्याद्री रांगांमध्ये बऱ्याच प्रमाणात गड-किल्ले आणि धार्मिक स्थळे आहेत. पावसाळी आणि इतर ऋतूमध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणात पर्यटक आणि ट्रेकर्स या ठिकाणी भेट देतात, परंतु योग्य नियोजन नसल्यामुळे किंवा योग्य मार्गदर्शक नसल्यामुळे ते संकटात सापडतात. या परिस्थितीत रक्षा सामाजिक विकास मंडळाचे कार्यकर्ते आणि इतर सहकारी या अडचणीत सापडलेल्या ट्रेकर्सना किंवा पर्यटकांना सुखरूप सुरक्षित स्थळी आणण्याचे काम निस्वार्थीपणे, गेली कित्येक वर्ष करत आहेत. याच बरोबर श्री अमित गुरव यांनी कर्जत पोलीस स्टेशन येथील पोलीस व कर्मचारीवर्ग यांच्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले होते, तसेच कर्जत तालुक्यातील 45 पोलीस पाटील यांना सुरक्षा व आपत्ती व्यवस्थापनाचे मार्गदर्शन केलेले आहे. मागील दोन वर्षापासून कोकण ज्ञानपीठ महाविद्यालयाचे आर्ट्स, कॉमर्स, सायन्स व इंजिनिअरिंग विभागाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवकांना त्यांच्या शिबिरांमध्ये प्रा. पाटील व प्रा. उपाध्ये यांच्या मार्गदर्शनानुसार जीवन कौशल्य, सुरक्षा व आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देत आलेले आहेत. तसेच या उत्साही स्वयंसेवकांच्या सहकार्याने आपत्ती निवारण व प्रथमोपचार याचे प्रात्यक्षिकही प्रजासत्ताक दिनी मोठ्या उत्स्फूर्ततेने सादर करत आले आहेत. पश्चिम विभागाचे फॉरेस्ट रेंज ऑफिसर वळवी साहेब यांच्या मार्गदर्शनाने वनकर्मचारी, वनमजूर यांना वन वणवा व आपत्ती व्यवस्थापन याचे प्रशिक्षण दिले. त्यांनी मानसिक दृष्ट्या अपंग, व कर्णबधिर असलेल्या विद्यार्थ्यांनाआपत्ती व्यवस्थापन व आपत्ती निवारणाचे प्रशिक्षण देत आलेले आहे आहेत. 

कर्जत तालुक्याचे भूतपूर्व तहसीलदार अविनाश कोष्टी ,तत्कालीन तहसीलदार  विक्रम देशमुख, नायब तहसीलदार संजय भालेराव, निवासी नायब तहसीलदार  राठोड  यांच्या मार्गदर्शनानुसार कर्जत तालुक्यामध्ये कोणतीही नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्ती आल्यास त्याचा मुकाबला करण्यास तालुका आपत्ती निवारण दल तयार करणे व माननीय जिल्हाधिकारी यांच्या मार्फत होणारे प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करणे यामध्ये  ते सक्रिय सहभाग घेत आहेत. 

स्वातंत्र्यदिनाच्या 73 व्या वर्धापन दिनाच्या या सन्मान सोहळ्यात जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती योगिता पारधी, जिल्हाधिकारी निधी चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, जिल्हा पोलिस अधीक्षक अनिल पारसकर, परिविक्षाधीन जिल्हाधिकारी मैनक घोष,  अप्पर जिल्हाधिकारी डॉ. भरत शितोळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. पद्मश्री बैनाडे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक, तहसीलदार सचिन शेजाळ, सतीश कदम, विशाल दौंडकर आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies