चक्रीवादळग्रस्तांना 3आक्टोबर पुर्वी नुकसान भरपाई द्या अन्यथा कारवाईला सामोरे जा, अधिकारीवर्गाला इशारा - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Monday, September 7, 2020

चक्रीवादळग्रस्तांना 3आक्टोबर पुर्वी नुकसान भरपाई द्या अन्यथा कारवाईला सामोरे जा, अधिकारीवर्गाला इशारा

 चक्रीवादळग्रस्तांना 3आक्टोबर पुर्वी नुकसान भरपाई द्या
अन्यथा कारवाईला सामोरे जा, अधिकारीवर्गाला इशारा

म्हसळा तालुक्याची आढावा बैठक संपन्न


 अरुण जंगम-म्हसळा


येत्या 3 ऑक्टोबरपर्यंत चक्रवादळग्रस्तांच्या सर्वच तक्रारींचे निवारण करुन राहिलेल्या मदतीचे वाटप पूर्ण करावे. या कालावधीनंतर शासकीय मदतीपासून वंचित असल्याचा नागरिकांच्या तक्रारी माझ्याकडे आल्या तर संबंधित अधिकार्‍यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा रायगडचे खा. सुनील तटकरे यांनी दिला आहे.निसर्ग चक्रीवादळग्रस्तांना शासनाने देऊ केलेली मदत 4 महिने उलटूनही म्हसळा तालुक्यातील अनेक गावांतील लाभार्थ्यांना अद्याप मिळालेली नाही. त्यामुळे तालुक्यात तक्रारीचा सूर वाढू लागला आहे. याची दखल घेत, खा. सुनील तटकरे यांनी आज (7 सप्टेंबर) म्हसळा येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये आढावा बैठक घेतली. यावेळी ते बोलत होते.


म्हसळा तालुक्यासाठी एकूण 54 कोटी रुपयांची आर्थिक मदत महाराष्ट्र शासनाने मंजूर केली आहे. यापैकी 34 कोटी 3 लाख रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. उर्वरित मदतीची रक्कम 3 ऑक्टोबरच्या आधीच नुकसानग्रस्तांना वितरित करा, अशी सूचना खा. तटकरे यांनी अधिकारी वर्गाला केली. मात्र  3 ऑक्टोबरनंतर शासकीय मदत मिळण्याबाबत वंचित नागरिकांच्या तक्रारी आल्या तर श्रीवर्धन मतदारसंघातील पाच तालुक्यांच्या 3 ऑक्टोबरच्या आढावा सभेत संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असा सूचना वजा इशारा खा. सुनील तटकरे यांनी दिला.


या सभेत म्हसळा शहर आणि तालुक्यातील प्रलंबित अतिमहत्वाची विकासकामे, टेलिफोन कनेक्टीव्हिटी, वीज, पाणी, रस्ते विकास, शाळा दुरुस्ती, शासकीय नुकसान भरपाई आणि कोरोना प्रादुर्भावावर यशस्वीपणे मात करण्यासाठी महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली. तसेच याबाबत लवकरच योग्य कार्यवाही करण्यात येणार असल्याचे खा. तटकरे यांनी सांगितले.


चक्रीवादळानंतर तालुक्यातील मोबाईल फोन कनेक्टीव्हिटी अनेक ठिकाणी बंद पडली आहे. तर अनेक गावांत अद्यापही नेटवर्क नसल्याने फोन च लागत नाहीत. त्यावर महिनाभरात ठोस उपाययोजना करावी, अशी सूचना बीएसएनएल व जिओच्या अधिकारीवर्गाला करण्यात आली. त्यासाठी केंद्र व राज्य सरकारमार्फत लागेल ती मदत व आवश्यक संपर्क मी करेन, असा शब्द खा. तटकरे यांनी दिला. ‘सारी दुनिया मुठ्ठी में’ म्हणणार्‍या जिओने संपूर्ण म्हसळा तालुक्यात नेट कनेक्टीव्हिटी करावी, असेही त्यांनी सूचित केले.


कोरोनाचे नियम पाळले जात नसल्याबाबत नाराजी

कोरोनावर मात करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने तोंडावर मास्क लावणे व सुरक्षित अंतर ठेवणे अनिवार्य असताना येथे तसे काही होताना दिसत नाही. केवळ 10 टक्के लोकच कोरोना प्रादुर्भाव रोखण्याबाबत नियम पाळतात. त्यामुळे कोरोनाचे समूळ उच्चाटन शक्य होणार नाही. यावर तालुक्यातील संबंधित शासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधी काहीच कार्यवाही करताना दिसत नसल्याने खा. तटकरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.


मास्क न लावल्यास कारवाई करण्याचे आदेश

येत्या तीन दिवसांत म्हसळा तालुक्यात लोकांना मास्क लावणे अनिवर्य करा; अन्यथा कारवाईचा बडगा दाखवा, असे ठोस आदेश खा. सुनील तटकरे यांनी तहसीलदार, नगरपंचायत मुख्याधिकारी, गटविकास अधिकारी यांना दिले. तसेच या कामी पोलिसांची मदत घ्यावी लागली तर तीही घ्या, अशा सूचना त्यांनी केल्या. तालुक्यातील शासकीय अधिकारी, कर्मचारीवर्गाची कोरोना टेस्ट कार्यान्वित असून, शहरातील छोटे, मोठे दुकानदार, व्यावसायिक, मोठ्या लोकवस्तीमधील  प्रत्येक नागरिकाने अँटीजेन टेस्ट करुन घेणे आवश्यक आहे. त्यासाठी 1 हजार किटची लागलीच उपलब्धता करुन देत असल्याचे खा. तटकरे यांनी सांगितले.


या आढावा बैठकीला खा. सुनील तटकरे यांच्यासह जिल्हा परिषदेचे सभापती बबन मनवे, पंचायत समिती सभापती उज्वला सावंत, म्हसळा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा जयश्री कापरे, पंचायत समिती सदस्य संदीप चाचले, उपनगराध्यक्ष सुहेब हलदे, प्रांताधिकारी अमित शेडगे, तहसीलदार शरद गोसावी, मुख्याधिकारी मनोज उकिर्डे, पोलीस निरीक्षक धनंजय पोरे, गटविकास अधिकारी वाय.एम.प्रभे, पाणी पुरवठा अभियंता गांगुर्डे, बीएसएनएलचे जे.एम. शर्मा, जिओ विभागीय प्रमुख सवजीत शिवगल, तालुकाध्यक्ष समीर बनकर, माजी सभापती नाझीम हसवारे, माजी सभापती छाया म्हात्रे, महिला अध्यक्षा रेश्मा काणसे, संजय कर्णिक, आदी पदाधिकारी व विविध खात्याचे अधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment