मराठा आरक्षणासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरुन आंदोलन करु. - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Friday, September 11, 2020

मराठा आरक्षणासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरुन आंदोलन करु.मराठा आरक्षणासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरुन आंदोलन करु.

आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले


सकल मराठा समाजाच्या निर्णयासोबत राहणार


मिलिंद लोहार -साताराकोपर्डीची घटना घडली आणि सकल मराठा समाज पेटून उठला. मराठा समाजाच्या मागण्या आणि आरक्षणासाठी मुक मोर्चे निघाले. सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाली ही बाब दुर्देवी असून समाजासाठी अन्यायकारक आहे. मराठा आरक्षणासाठी सकल समाज जे पाऊल उचलेल ते सर्वांना मान्य असेल. समाज जो निर्णय घेईल त्या निर्णयाशी एक समाजबांधव म्हणून मी बांधील आहे. राज्य सरकारने स्थगिती उठवण्यासाठी लवकर हालचाल करावी अशी सर्वांचीच अपेक्षा आहे. समाजाच्या निर्णयानुसार आरक्षणासाठी प्रसंगी पुन्हा रस्त्यावर उतरुन आंदोलन करु, असा इशारा आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिला आहे.

प्रसारामध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मराठा आरक्षणाला मिळालेल्या स्थगितीबाबत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उच्च न्यायालयात विधेयक टिकवले. उच्च न्यायालयात जो निर्णय होतो तो निर्णय सर्वोच्च न्यायालयात सहसा बदलत नाही. मात्र मराठा आक्षणाबाबत असे का घडले, हा खरा प्रश्‍न आहे. राज्य सरकारने आपली बाजू नीट मांडली नाही असेच म्हणावे लागेल. हे सरकार नवीन आहे. मराठा समाजाने आरक्षणासाठी लढा उभारला, मोर्चे काढले. एवढं सगळं करुन जर आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात स्थगिती मिळत असेल तर खूपच दुर्दैवी बाब आहे. त्यामुळे सरकारने स्थगिती उठवण्यासाठी लवकरात लवकर प्रयत्न करावा, अशी मागणी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी केली. मराठा आरक्षण हे इतर समाजाचे आरक्षण कमी करुन द्यावे, अशी मागणी नाही आणि तसे घडतही नाही. त्यामुळे समाजासमाजात तेढ निर्माण होण्याचा प्रश्‍न नाही, असे आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी एका प्रश्‍नाला उत्तर देताना सांगितले.

         दरम्यान, सरकारने गांभीर्याने लक्ष घालून आरक्षणावरील स्थगिती उठवली पाहिजे, ही सकल मराठा समाजाची अपेक्षा आहे. मराठा समाज फार मोठा आहे. या समाजातील असंख्य लोक आर्थिक मागास आहेत. समाजाच्या अनेक अडचणी आहेत. त्यासाठी आरक्षण आवश्यक आहे. त्यामुळे सकल मराठा समाजाचा जो निर्णय होईल तो मान्य करुन प्रसंगी रस्त्यावर उतरावे लागले तरी उतरु आणि आंदोलन करु, असेही आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले.

No comments:

Post a Comment