नागोठण्यात प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन ; निर्णय होईपर्यंत आंदोलन मागे घेण्यास नकार
महेंद्र म्हात्रे-
महाराष्ट्र मिरर टीम नागोठणे
मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांच्या अखत्यारीतील स्थानिक लोकशासन आंदोलन संघर्ष समितीच्या वतीने आज सकाळी अकरा वाजता एसटी बसस्थानक ते पोलीसठाणे अशी प्रकल्पग्रस्तांची रॅली काढून पोलिसठाण्यासमोर हात जोडो आंदोलन सुरू करण्यात आले. संघटक राजेंद्र गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या आंदोलनात शशांक हिरे, गंगाराम मिणमिणे, प्रमोदिनी कुथे, चेतन जाधव, सुरेश कोकाटे, बळीराम बडे, अनंत फसाळे, प्रशांत शहासने, तेजस मिणमिणे, जगदीश वाघमारे, सुजित शेलार, प्रमोद कुथे, एकनाथ पाटील, मोहन पाटील, गुलाब शेलार, नीता बडे, उषा बडे, निलेश शेलार, जनार्दन घासे, गौतमी शेलार, रूपा भोईर आदींसह शेकडो प्रकल्पग्रस्त सहभागी झाले होते. या आंदोलनात कोणत्याही नेत्याने राजकारण आणण्याचा प्रयत्न केले, तर त्यांची कुंडली बाहेर काढू असा इशारा राजेंद्र गायकवाड यांनी आपल्या भाषणात दिला. रिलायन्सने आंदोलन दडपण्यासाठी आमच्यावर खोटे आरोप करून आमच्या प्रकल्पग्रस्तांवर गुन्हा दाखल केला आहे. मात्र, त्यांचेवर लावण्यात आलेले गुन्हे मागे घेत नाहीत तोपर्यंत आम्ही येथून हटणार नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. लॉकडाऊनच्या काळातील कामगारांचा पगार दोन दिवसांत दिला जाईल असा रिलायन्सच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने शब्द दिला होता. मात्र, दोन महिने उलटूनही रिलायन्स शब्दाला जागली नसल्याची खंत गायकवाड यांनी व्यक्त केली. जोडे मारो आंदोलनातील प्रकल्पग्रस्तांवरील गुन्हा जो पर्यंत मागे घेतला जात नाही तोपर्यंत आम्ही येथून हटणार नसल्याचा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला.