Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

"तत्वज्ञानी समाजसेवक" डॉ.भारतकुमार राऊत यांचा लेख

 "तत्वज्ञानी समाजसेवक"


डॉ.भारतकुमार राऊत

(लेखक हे राज्यसभेचे माजी सदस्य आणि महाराष्ट्र टाइम्सचे माजी संपादक आहेत.)

गीताई माऊली माझी

तिचा मी बाळ नेणता।

पडतां पडतां घेई

उचलोनी कडेवरी।।


अशी सुरुवात करून भगवद्गीतेला आपली आईच मानणाऱ्या व आपल्या जन्मदात्या अशिक्षीत आईला समजावे म्हणून गीतेचा समश्लोकी अनुवाद करणाऱ्या आचार्य विनोबा भावे यांची आज जयंती.  त्यांची निष्ठा व पांडित्य यांना नमन!महाराष्ट्रातील आध्यात्मिक संतपरंपरा १८व्या शतकात खंडित झाल्यानंतर समाजसेवेच्या माध्यमातून १९ व २०व्या शतकात जे संत महाराष्ट्राला लाभले त्यांत गाडगेबाबा, तुकडोजी यांच्या बरोबरीने विनोबांचे नाव जोडले जाते. 


कुलाबा (आताचा रायगड) जिल्ह्यात ११ सप्टेंबर १८९५ रोजी जन्माला आलेल्या विनोबांनी विदर्भ ही आपली कर्मभूमी मानली. तिथूनच त्यांनी आपल्या राजकीय चळवळी व सामाजिक मोहिमा राबवल्या. त्यामुळेच पवनार येथील त्यांचा आश्रम हे आध्यात्मिक, सामाजिक व राजकीय चळवळींचे केंद्र बनले.


विनोबांना लहान वयातच महात्मा गांधींचा सहवास लाभला. त्यामुळे सत्य, अहिंसा व सत्याग्रह त्यांच्या रक्तात भिनले. गीता व त्यातील तत्वज्ञान हे विनोबांचा विशेष आवडीचा व अभ्यासाचा विषय. गांधीजींच्या एका सत्याग्रहात त्यांना अटक झाली व धुळ्याच्या तुरुंगात ठेवण्यात आले, त्यावेळेस सहकैद्यांसाठी त्यांनी गीतेवर प्रवचने दिली. त्याच तुरुंगातील साने गुरूजींनी ती लिहून काढली. हेच लिखाण 'गीता प्रवचने' म्हणून नंतर प्रकाशीत झाले. ते मराठी संत वाड्मयाचा भाग बनले.


महात्मा गांधींनी 'वैयक्तिक सत्याग्रह' करायचे ठरवले, तेव्हा पहिला सत्याग्रही म्हणून त्यांनी विनोबांचीच निवड केली होती.


स्वातंत्र्यप्राप्तीनंतर विनोबांनी स्वत:ला 'भूदान' चळवळीत झोकून दिले.  ते उत्तर प्रदेश, बिहार, पंजाब, बंगाल अशा अनेक राज्यांत फिरले; रानोमाळ पायी चालले व त्यांनी शेकडो एकर जमिनी असलेल्या धनदांडग्या जमीनदारांकडून जमिनी 'भूदान' म्हणून मिळवल्या आणि त्या भूमीहीन शेतकऱ्यांना वाटल्या.


या चळवळीतूनच पुढे भूमी सुधारणा कायदा व कमाल जमीनधारणा कायदा उदयाला आले. लाखो एकर जमीन लागवडीखाली आली. त्यामुळेच हजारो भूमिहीन शेतमजुर जमीन मालक व त्यामुळे 'शेतकरी' बनले.


विनोबांच्या वाट्याला प्रशस्ती आली तशीच कडवट टीकाही त्यांनी पचवली. त्यांना कुणी 'ज्ञानोबा ते विनोबा' म्हणून गौरवले तर कुणी 'विनोबा ते वानरोबा' म्हटले. पण विनोबांचे कार्य चालूच राहिले.


इंदिरा गांधींनी आणीबाणी पुकारली तेव्हा विनोबांनी तिला 'अनुशासन पर्व' म्हणून तिचे स्वागत केले व मौनात असूनही टाळ्या वाजवून त्यांनी आनंद व्यक्त केला.


असे विनोबा. 


गीतेचे तत्वज्ञान या विषयात त्यांनी लोकमान्य टिळकांच्या कर्मयोगाच्या निरुपणावरही विरोध दर्शवला. टिळकांच्या कर्मयोगाच्या शिकवणुकीमुळे युद्ध झाले व कौरवांचा पाडाव झाला, या मूळ प्रमेयालाच विनोबांचा विरोध होता. त्यांच्या मते हे युद्ध कौरवांशी नव्हे तर स्वत:मधल्याच दुष्ट प्रवृत्तींविरुद्ध होते. त्यात सत्प्रवृत्तींचा विजय झाला.  कौरव, युद्ध ही सारी काल्पनिक रूपके आहेत.असे विनोबा!


वार्धक्यामुळे शरीर मनाच्या उभारीला साथ देत नाही, हे ध्यानात येताच त्यांनी प्रयोपवेशन (प्राणांतिक उपोषण) सुरू केले. अन्न व औषधोपचार थांबवल्यानंतर सात दिवसांनी १५ नोव्हेंबर १९८२ रोजी त्यांनी प्राणत्याग केला.तीन वर्षांनी त्यांना 'मरणोत्तर' भारतरत्न देऊन गौरवण्यात आले. विनोबाच्या रुपाने एक खराखुरा 'आचार्य' व 'संत' २०व्या शतकात आपल्यात राहून गेला.


ॐ आचार्याय नम:।


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies