Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

रवींद्रकुमार पवार या प्रार्थमिक शिक्षकाने बदलली जुनी शिक्षण पद्धत


रवींद्रकुमार पवार या प्राथमिक शिक्षकाने बदलली जुनी शिक्षण पद्धत


बदलत्या युगाबरोबर मुलांना दिले  ज्ञानदानाचे नवीन धडे!!


मिलिंद लोहार -सातारा



खटाव तालुक्यातील ऐतिहासिक व हुतात्म्यांची पावनभूमी असलेले वडूज हे गाव. रवींद्रकुमार पवार हे याच गावचे रहिवासी. त्यांचे प्राथमिक शिक्षण आंबवडे तालुका खटाव आणि माध्यमिक शिक्षण कात्रेश्वर हायस्कूल कातरखटाव तालुका खटाव येथे झाले. प्राथमिक शिक्षण घेत असताना  रामचंद्र पवार व माध्यमिक शिक्षणामध्ये श्री रेळेकर सर व मोरे सर यांचा प्रभाव असल्याचे ते आवर्जून सांगतात. त्यांचे वडील शिक्षक असल्याने घरात चांगले शैक्षणिक वातावरण होते परंतु त्यांची आई अशिक्षीत असली तरी तिने लहानपणापासूनच. आयुष्याचे सार सांगितले होते.' कोणतेही काम हलक्या दर्जाचे नसते त्या कामावर श्रद्धा ठेवली की ते कामही मोठे होते व काम करणाराही मोठा होतो.' याच विचाराने प्रेरित होऊन त्यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये अमुलाग्र बदल घडवण्यासाठी डीएड ही पदवी घेऊन आपल्या शिक्षकी पेशाला सन 2000 मध्ये मासाळवाडी तालुका माण येथे सुरुवात केली. अति ग्रामीण भागात वसलेल्या या शाळेत त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजी विषयाची गोडी निर्माण केली. आज याच शाळेचे काही विद्यार्थी प्रशासनात कार्यरत असून लोकांची प्रामाणिकपणे सेवा करीत आहेत. सन 2002 मध्ये त्यांची इंग्रजी भाषेविषयीची आवड पाहून तत्कालीन गटशिक्षणाधिकारी नरळे  यांनी त्यांना आंग्ल भाषा औरंगाबाद येथे 28 दिवसांच्या प्रशिक्षणासाठी पाठविले. त्याठिकाणी त्यांनी राज्यात द्वितीय क्रमांक पटकावून सातारा जिल्ह्याचे नाव राज्यस्तरावर पोहोचवले.


               माण मधून खटाव तालुक्यातील शिरसवडी तालुका खटाव येथे बदली झाल्यानंतर त्यांनी प्रथमता ग्रामस्थांना एकत्रित केले व त्यांच्यामध्ये शिक्षणाविषयी सुदृढ दृष्टिकोन निर्माण केला. त्यातूनच त्यांनी मोठा आर्थिक उठाव करून शाळेचे अंतर्गत व बाह्य रूप बदलून टाकले. जिल्हा परिषदेचा एक आदर्श उपक्रम म्हणजे 'बाल आनंद मेळावा'. केंद्र समूह शिरसवडी चा हा  बाल आनंद मेळाव्या चा उपक्रम त्यांनी इंग्रजी भाषेतून यशस्वी करून दाखवला होता व त्याची दखल त्यावेळचे मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा परिषदेने घेतली होती. तालुकास्तरीय शिक्षण महोत्सवांमध्ये  विद्यार्थ्यांनी इंग्रजी दोन शब्दापासून 1000 अर्थपूर्ण वाक्य बनवणे याचे सादरीकरण केले होते त्यास तालुक्यांमध्ये द्वितीय क्रमांक प्राप्त झाला होता. पदवीधर शिक्षक म्हणून जि प शाळा दरुज येथे कार्यरत असताना त्यांनी मुख्याध्यापकांच्या सहकार्याने लाखो रुपयांचा निधी शाळेसाठी गोळा केला. शाळा आय. एस. ओ. मानांकित केली. शाळेच्या सर्व भौतिक सुविधा सीसीटीव्ही कॅमेऱ्या सह ग्रामस्थांच्या मदतीने पूर्ण केल्या. त्यांनी इंग्रजी अध्यापनाच्या जोरावर अनेक इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना जिल्हा परिषदेच्या शाळेकडे आकृष्ट केले.

       


     

त्यांच्या या शैक्षणिक कार्याची दखल घेऊन पंचायत समिती खटाव यांनी सन 2015 साली तालुका आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्यात आले. त्यांनी एम. ए. एम. एड. डी एस एम, नेट ,सेट अशी उच्च पदवी जरी प्राप्त केली असली तरी जुनियर व सीनियर कॉलेज साठी प्राध्यापक होण्याची संधी असतानाही त्यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थी प्राध्यापक घडवण्यासाठी व इंग्रजी भाषेचे त्यांच्यात प्रभुत्व निर्माण करण्यासाठी त्या सर्व संधी त्यांनी नम्रपणे नाकारल्या. सध्या ते जि प शाळा पळसगांव येथे कार्यरत असून त्यांनी मुख्याध्यापक दिनकर तुपे यांच्या सहकार्याने शाळेची पटसंख्या चाळीसहून 62 पर्यंत वाढविण्यात यश मिळवले आहे व नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम राबवून त्यांनी बंद पडण्याच्या स्थितीत असलेले उच्च प्राथमिकचे वर्ग वाचवले आहेत.

                संकटाला संधी मानून त्यांनी या काळात प्रथमता स्वतःचे ज्ञान वाढविण्याचा प्रयत्न केला.  त्यासाठी त्यांनी अलीसन चे  ऑनलाइन  डिप्लोमा इन इंग्लिश ग्रामर  व इंट्रोडक्शन टू कॉन्व्हर्सेशनल इंग्लिश  हे दोन कोर्स  पूर्ण केले  व  ब्रिटिश कौन्सिल चा  आई. ई.एल. टी. एस. हा स्पोकन इंग्रजीचा ऑनलाइन कोर्स ही पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. लॉकडाउनच्या या संकट काळात त्यांनी विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ दिले नाही. धडपड, चिकाटी व कामावर श्रद्धा असेल तर आपोआपच चांगले मार्ग सापडतात. तसा  त्यांचाही परिचय 'शिक्षक मंच' या सातारा जिल्ह्यातील अग्रमानांकित तंत्रस्नेही शिक्षकांच्या गटाशी झाला. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन त्यांनी ऑनलाईन टेस्ट निर्मिती करून शाळेतील विद्यार्थ्यांबरोबरच राज्यातील विद्यार्थ्यांना ही त्याचा फायदा करून दिला. आत्तापर्यंत इंग्रजीच्या या टेस्ट हजारो विद्यार्थ्यांनी सोडवल्या आहेत. त्याचबरोबर काळाबरोबर चालण्यासाठी व विद्यार्थ्यांना विविध माध्यमातून ज्ञान देण्यासाठी त्यांनी  मनोरंजक पद्धतीने बनवलेले इंग्रजीचे अनेक कार्टून व्हिडिओना सध्या विद्यार्थ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. आर. पी' ज इंग्लिश या यूट्यूब चैनल च्या माध्यमातून ते राज्यातील विद्यार्थ्यांची इंग्रजी भाषा समृद्ध करण्याचा प्रयत्न करीत आहेत. अभ्यासक्रमावर आधारित ही शैक्षणिक व्हिडिओची ते निर्मिती करत असून त्याला विद्यार्थ्याकडून उत्स्फूर्त प्रतिसादही मिळत आहे. ऑनलाइन शिक्षणापासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांचे ही शिक्षण त्यांनी बंद ठेवले नाही त्यासाठी ते आठवड्यातून दोन दिवस त्यांच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन पीडीएफ च्या स्वरूपात किंवा इतर ऑफलाइन च्या मार्गांचा अवलंब करतात. तंत्रज्ञानाच्या या बाबी शिकण्यासाठी साठी त्यांनी 60 दिवसांचे एक्सपर्ट स्कील प्रशिक्षण, पीपीटी कार्यशाळा व रोटरी क्लब वाई यांची कार्यशाळा यासारख्या कार्यशाळेतून ज्ञान वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न केला. विशेष करून के. एस. एज्युकेअर चे निर्माते सागर राऊत यांचे माझ्या तंत्रज्ञान विषयक गोष्टी शिकण्यात मोठे योगदान आहे. 


        आत्तापर्यंत त्यांनी स्पोकन इंग्लिश प्रशिक्षणातून अनेक शिक्षकांच्या कार्यशाळा घेतल्या असून त्यांच्यात स्पोकन इंग्लिश ची कौशल्ये विकसित केली आहेत. राज्य जिल्हा व तालुका स्तरावर तज्ञ मार्गदर्शकाचे काम करून त्यांनी शिक्षकांमध्ये इंग्रजी भाषेविषयी आत्मविश्वास निर्माण केला आहे. त्यांनी अनेक वेळा ब्रिटीश कौन्सिल , एस. सी. ई. आर. टी. व डाएट आयोजित विविध प्रशिक्षणामध्ये तज्ञ मार्गदर्शकाची भूमिका प्रभावीपणे पार पाडलेली आहे. महाराष्ट्र सरकार, टाटा ट्रस्ट व ब्रिटिश कौन्सिल यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या 'टीचर्स ऍक्टिव्हिटी ग्रुप' या कोर्सचे ते ब्लॉक लेवल इंग्लिश ॲम्बॅसेडर असून त्यांनी या अंतर्गत खटाव तालुक्‍यातील सुमारे 60 शिक्षकांचा 'मूक' हा इंग्रजी भाषेचा ऑनलाईन कोर्स यशस्वीरित्या पूर्ण करून घेतला आहे. त्यामुळे आज खटाव तालुक्यातील हे शिक्षक अध्ययन अध्यापनात आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे उपयोग करत आहेत.

           उल्लेखनीय बाब म्हणजे सन २०१४-१५ साली देशातील विविध राज्यातून सचिव, उपसचिव, संचालक, उपसंचालक अशा दर्जाच्या लोकांची टीम कुमठे बिटातील ज्ञानरचनावाद समजून घेण्यासाठी आली होती. त्यावेळी जिल्हा परिषद सातारा शिक्षण विभागाने त्यांच्यावर या कार्यक्रमाचे इंग्रजी सूत्रसंचालक म्हणून संधी देण्यात आली होती. तत्कालीन उपसंचालक व शिक्षणाधिकारी गुरव मॅडम यांनी त्यांच्या या प्रभावी कार्याबद्दल यथोचित गौरव केला होता. सध्या ते डिस्ट्रिक्ट रिसोर्स ग्रुप च्या इंग्रजी भाषेचे सदस्य आहेत.

            बालाजी जाधव,सचिन लोखंडे,प्रदीप कुंभार सचिन देसाई, संजय गोरे, धनंजय कुलकर्णी, सागर राऊत ,अविनाश करपे सर यांच्या मुळे तंत्रज्ञानाची आवड निर्माण झाल्याचे ते सांगतात. अनिल लावंड, मनोहर शिर्के, सोमनाथ पाटोळे या तंत्रस्नेही शिक्षक मित्रांचेही  मार्गदर्शन मिळत असल्याचे ते नमूद करतात. त्यांच्या सुविद्य पत्‍नीचाही  ऑनलाइन कन्टेन्ट निर्मितीमध्ये मोठा सहभाग असल्याचे ते सांगतात.

        गटशिक्षणाधिकारी प्रतिभा भराडे,शिक्षण विस्तार अधिकारी लक्ष्मण पिसे केंद्रप्रमुख  तुकाराम यादव ,मुख्याध्यापक दिनकर तुपे यांच्या प्रेरणेचा ते उल्लेख करतात.

          भविष्यात आर. पी' ज इंग्लिश यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शिक्षक व विद्यार्थ्यांचे इंग्रजी कम्युनिकेशन स्किल सुधारण्यासाठी 'स्पोकन इंग्रजी' चा उपक्रम राबवण्याचा त्यांचा मानस आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies