Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

पालकमंत्र्यांच्या रोह्यात कोरोना रिपोर्टचा सावळागोंधळ, प्रशासनाचे दुर्लक्ष

 पालकमंत्र्यांच्या रोह्यात कोरोना रिपोर्टचा सावळागोंधळ,
प्रशासनाचे दुर्लक्ष

 महेंद्र म्हात्रे-नागोठणे



रोहा तालुक्यात संशयित कोरोना रुग्णांचे अहवाल येण्यास बराच कालावधी लागत असल्याने शिवसेना तालुका प्रमुख समीर शेडगे यांनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली आहे.याबाबत शेडगे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी धक्कादायक माहिती दिली असून रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या रोहा तालुक्यात कोरोना रिपोर्टचा सावळागोंधळ असल्याचे दिसून येत आहे.


रोह्यातील उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी अंकिता खैरकर यांच्याशी याबाबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी फोन उचलला नाही.तालुका आरोग्य अधिकारी यांचे दोन्ही भ्रमणध्वनी क्रमांक बंद असल्याचे यावेळी दिसून आले.शिवसेना तालुका प्रमुख समीर शेडगे यांनी रोहा उपजिल्हा रुग्णालयातील २ सप्टेंबर पासूनचे स्वब अहवाल चार दिवस होऊनही प्राप्त झाले नसल्याची बाब निदर्शनास आणून दिली आहे.यातील काही रुग्ण अत्यवस्थ आहेत.पण त्यांचे आरटी-पीसीआर टेस्टचे रिपोर्ट प्राप्त न झाल्याने त्यांना मोठ्या रुग्णालयात दाखल करण्यास अडचणी येत आहेत. रोहा उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय सोयीसुविधा याबाबत काही न बोलणेच बरे अशी परिस्थिती आहे.जिल्हा सिव्हील सर्जन माने यांना कोरोना तपासणी अहवाल वेळेत मिळण्यासाठी यंत्रणा उभारण्यात अपयश आले आहे असा आरोप देखील करण्यात येत आहे.रायगड जिल्ह्यात कोरोना टेस्ट साठी उभारण्यात आलेल्या प्रयोगशाळेची क्षमता प्रति दिन ३७५ असल्याचे सांगण्यात आले होते. जिल्ह्यात दररोज वाढणारी रुग्णसंख्या ७५० च्या आसपास आहे.अशावेळी या प्रयोगशाळेची क्षमता वाढविणे गरजेचे होते. पण या दृष्टीने प्रयत्न होताना दिसून येत नसल्याने जिल्ह्यात नाराजीचे वातावरण आहे.कोरोना त्रस्त रुग्ण व त्यांचे नातेवाईक मात्र एकूणच आरोग्य व्यवस्थेबाबत तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करत आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies