रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी कोरी चहा उत्तम - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Monday, September 14, 2020

रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी कोरी चहा उत्तम

 रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी कोरी चहा उत्तम

दुधाचा चहा आरोग्यासाठी घातक नाही; डॉक्टरांचा दावा


गणेश मते-भिवपुरीकोरोना महामारीच्या काळात अनेकांनी आयुर्वेदिक औषधे वापरून रोगप्रतिकारक्षमता वाढविण्यावर भर दिला आहे. यामध्ये घशात कफ साचू न देण्यासाठी जास्तीतजास्त गरम पाणी पिणे पसंद करत असल्याचे दिसते. तसेच चहामध्येही मसाल्याच्या पदार्थांची भर वाढली आहे. मात्र, अनेकांनी चक्क दुधाचा चहा पिणे बंद केल्याने संभ्रम निर्माण झाला आहे. 


मागील जवळपास सहा महिन्यांपासून आरोग्य यंत्रणेसोबत अत्यावश्यक सेवेत केवळ दुग्ध उत्पादन सुरू असल्याचे दिसून आले आहे. दूध हे सर्वोत्तम पेय असल्याचे मानले जाते. त्याचे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. मात्र कोरोना महामारीच्या काळात अनेकांनी थंडपाणी पिण्याच्या सवयी बदलत गरमपाणी पिण्यावर भर दिला आहे. त्यातही अनेकांनी पूर्वापार पद्धतीने करण्यात येणाऱ्या 'कोरी' चहावर भर दिला आहे. यामध्ये साखर आणि चहापावडरच्या दिमतीला आले किंवा गवतीचहाच नव्हे तर दालचिनी, मिरी, सुंठ, जायफळ, वेलची, तुळस, प्राजक्त या रोगप्रतिकारक क्षमता वाढवणाऱ्या मसाल्याच्या पदार्थांचा भडिमार सुरू झाला आहे. मात्र, या उष्ण पदार्थांचा अतिवापर वाढल्याने मुळव्याधी आणि पोटाचे आजार जोर धरू लागल्याचे कर्जत येथील आयुर्वेदिक डॉक्टर काळे यांनी सांगितले. तर, अनेकांनी शरीरातील पित्त वाढू नये म्हणून चक्क दुधाचा चहा घेणेच बंद केले आहे. मात्र, दुधाचा चहा आरोग्यसाठी घातक नसल्याचेही डॉ. काळे सांगतात.


साखरेऐवजी गुळाचा चहा गुणकारी

चहामध्ये साखरेऐवजी गुळाचा वापर केल्यास शरीराला लाभदायक असते. गुळातील काही घटक चहातील टॅनिनसारख्या घातक घटकांवर परिणाम करतात. दुधाच्या चहाने काहीही होत नाही, फक्त किती प्रमाणात घेता यावर पित्त वाढते, असे डॉक्टरांनी सांगितले. 


चहा बनताना प्रमाण ठरवा

चहा पावडरचा अतिवापर किंवा पुनर्वापर केल्याने शरीरातील पित्त वाढते. त्यामुळे चहा बनवताना त्यात चहा पावडर जास्त घालू नये, जास्त उकळू नये, अन्यथा ते त्रासदायक ठरू शकते. त्यासाठी 1 कप पाण्याला 1 चमचा चहा पावडर हे प्रमाण मानले जाते. मात्र तो जास्तवेळ उकळल्याने त्रासदायक ठरू शकतो.


दूध विक्रीवर परिणाम

दूध हे सर्वोत्तम पेय आहे. मात्र कोरोना महामारीच्या काळात अनेकांनी दुधाचा चहाच बंद करत चक्क उकडे बंद केल्याचे समोर आले आहे. यामुळे दुधाचा चहा घ्यावा की घेऊ नये असा संभ्रम निर्माण झाला आहे. दरम्यान, कर्जत तालुक्यातून मुंबईच्या उपनगरात होणाऱ्या दूध पुरवठ्यावर काहीसा परिणाम झाला आहे. 


चहा कसा बनवावा?

गवती चहा, तुळस, पारिजात, कोरफड आणि आलं यापासून बनवलेला चहा आरोग्यासाठी चांगला मानला जातो. तसेच, चार कप चहासाठी दालचिनी 2 नग, मध्यम आकाराची सुंठ, लेंडी पिंपळी 4-5 दाणे टाकून चहा बनवावा हा चहा देखील चांगला असल्याचे आयुर्वेदिक डॉक्टर सांगतात. मात्र शौचाला त्रास, पित्त, पोटाचे विकार, अल्सर, नाकातुन रक्त येणे, प्लेटलेट्स कमी झाल्यास, खोकला-हिरडीतून रक्त येणे, तोंड आल्यास चहा टाळावा, असा सल्ला डॉक्टर देतात.


गुळवेल काढा उत्तम

सध्याच्या परिस्थितीत रोगप्रतिकारक क्षमता वाढीसाठी गुळवेल काढा उत्तम ठरू शकतो. त्यासाठी दोन कप पाण्यात गुळवेलचा अंगठ्याएवढा तुकडा टाकून उकळावे. हे दोन पाणी एक कप होईपर्यत उकळावे. तसेच, ते सकाळी आणि संध्याकाळी अर्धा-अर्धा कप घ्यावे.

No comments:

Post a Comment