Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

अन् त्या मूकबधीर करोना पॉझिटिव्ह तरूणाला मिळाले जीवदान

 अन् त्या मूकबधीर करोना पॉझिटिव्ह तरूणाला मिळाले जीवदान

 कृष्णा'मध्ये पॉजिटिव्ह रूग्णावर अॅन्जिओप्लास्टी शस्त्रक्रिया यशस्वी ; पश्चिम महाराष्ट्रातील पहिलीच घटना


कुलदीप मोहिते कराड



सुमारे ४० वर्ष वयाच्या एका तरूणाच्या छातीत अचानक तीव्र वेदना सुरू झाल्या . पण नेमका काय त्रास होतोय , हे मात्र तो कुणाला स्पष्ट सांगू शकत नव्हता ; कारण तो जन्मापासूनच मुकबधीर होता . सातारा इथं एका रूग्णालयात तपासणी केल्यानंतर , त्याचे दुखणे किरकोळ नव्हते . तर त्याला हृदयविकाराचा तीव्र धक्का येऊन गेल्याचे निष्पन्न झाले . त्यामुळे त्याला पुढील उपचारासाठी कृष्णा रूग्णालयात आणल्यानंतर शस्त्रक्रिया करण्यापूर्वी त्याची कोविड -19 ची चाचणी करण्यात आली ; तर ती पॉझिटिव्ह आली पण त्याचा जीव वाचविणे महत्वाचे असल्याने कृष्णा हॉस्पिटलमधील हृदयरोग तज्ज्ञ डॉ . सोमनाथ साबळे यांनी अखेर हे शिवधनुष्य पेलत या पॉझिटिव्ह असणाऱ्या मूकबधीर तरूणावर यशस्वी अॅन्जिओप्लास्टी शस्त्रक्रिया करून , या तरूणाला जीवदान दिले . कोविड -19 पॉझिटिव्ह रूग्णावर अशाप्रकारची अॅन्जिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्याची ही पश्चिम महाराष्ट्रातील पहिलीच घटना असून , सध्या या तरूणावर कोरोना वॉर्डमध्ये पुढील उपचार सुरू आहेत . याबाबत सविस्तर माहिती अशी की सातारा येथील एका 40 वर्षाच्या मूकबधीर तरूणाला छातीत दुखू लागल्याने , त्याला घरातील मंडळींनी दुसऱ्या दिवशी जवळच्याच एका दवाखान्यात दाखवले . संबंधित डॉक्टरांना शंका आल्याने त्यांनी हृदयविकार तज्ज्ञांना दाखविण्याचा सल्ला दिला . त्यानुसार सातारा येथील एका रूग्णालयात डॉक्टरांना दाखवून सर्व तपासण्या केल्यावर त्या तरूणाला हृदयविकाराचा तीव्र धक्का येऊन गेल्याचे स्पष्ट झाले या तरूणाची अॅन्जिओग्राफी केल्यानंतर हृदयाच्या दोन रक्तवाहिन्यांमध्ये 100 टक्के आणि 80 टक्के असे अतिगंभीर ब्लॉकेज आढळून आले . या रूग्णाचा जीव वाचविण्यासाठी अॅन्जिओप्लास्टी हा एकच मार्ग उपलब्ध होता पण या तरूणाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने खासगी हॉस्पिटलमध्ये ही शस्त्रक्रिया त्याला परवडणारी नव्हती . त्यामुळे त्याने मग या शस्त्रक्रियेसाठी कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याचा निर्णय घेतला . कृष्णा हॉस्पिटलमध्ये ही शस्त्रक्रिया करण्याअगोदर या तरूणाची कोविड -19 ची चाचणी केल्यानंतर ती पॉझिटिव्ह आल्याने एक वेगळीच समस्या उभी राहिली . एका बाजूला गंभीर हार्ट अटॅक , क्रिटिकल ब्लॉकेज आणि दुसऱ्या बाजूला तितकाच गंभीर असा कोरोनाचा धोका ! पण अशा स्थितीतही या रूग्णाचे प्राण वाचविण्यासाठी अॅन्जिओप्लास्टी शस्त्रक्रिया गरजेची होती . त्यामुळे कृष्णा हॉस्पिटलमधील हृदयरोग तज्ज्ञ डॉ सोमनाथ साबळे यांनी हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ . ए . वाय . क्षीरसागर , हृदयरोग विभागाचे प्रमुख डॉ . अभिजीत शेळके व मेडिसीन विभागाचे डॉ . व्ही . सी . पाटील यांच्याशी चर्चा केली . कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन डॉ सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनानंतर अखेर या तरूणावर तातडीने अॅन्जिओप्लास्टी करण्याचा निर्णय घेण्यात आला . हा रूग्ण कोविड पॉझिटिव्ह असल्याने हृदयरोग तज्ज्ञ डॉ साबळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी संभाव्य धोके ओळखून , योग्य ती खबरदारी घेत आणि आपले कौशल्य पणास लावत पुढच्या अर्ध्या तासात दोन्ही ब्लॉक्स स्टेण्ट बसवून उघडण्यात आले आणि ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली . त्यामुळे या रूग्णाची मूकबधीर पत्नी , त्याची मुले आणि सगळ्याच नातेवाईकांचा जीव भांड्यात पडला . कोरोनाबाधित रूग्णावर अॅन्जिओप्लास्टी करण्याची पश्चिम महाराष्ट्रातील ही पहिलीच घटना असून , मुख्य म्हणजे कृष्णा हॉस्पिटलमध्ये महात्मा फुले जीवनदायी योजनेतून ही शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत झाल्याने रूग्णाला आर्थिक दिलासा लाभला आहे . या रूग्णाची प्रकृती स्थिर असून , त्याच्यावर सध्या कोरोना विशेष वॉर्डमध्ये पुढील उपचार सुरू आहेत .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies