पिकांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा
श्रीवर्धन तहसीलदारांच्या संबधित विभागाला सुचना
अमोल चांदोरकर - श्रीवर्धन
राज्यात गेल्या आठवड्यात परतीच्या जोरदार पावसामुळे शेती घरे-झोपडी गोठे व मृत जनावरे यांचे झलेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश शासनानाने राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दि.१६ आॕक्टोबर रोजीच्या व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे झालेल्या बैठकीत दिले होते.त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी रायगड यांच्या आदेशान्वये श्रीवर्धन तहसीलदार सचिन गोसावी यांनी प्रशासकीय भवनातील सभागृहामध्ये झालेल्या आढावा बैठकीमध्ये परतीच्या पावसामुळे तालुक्यात झालेल्या नुकसानीचे पंचनामे दोन दिवसात प्रत्यक्ष पाहणी करुन तातडीने पुर्ण करण्याचे आदेश यावेळी बैठकीला उपस्थित असलेले गटविकास अधिकारी,कृषी अधिकारी, तलाठी,ग्रामसेवक यांच्यासह सर्व संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत त्याचबरोबर दिवेआगर जवळील सातउघडीजवळील समुद्राच्या उधाणाच्या पाण्याने उध्वस्त झालेल्या शेतीचेसुध्दा पाहणी करुन पंचनामे करण्याचे आदेश कृषी सहाय्यक रामेश्वर मगर यांना दिले असुन निसर्ग वादळ पंचनाम्यानंतर पुन्हा संबधीत विभागातील कर्मचाऱ्यांची पुन्हा शेतकऱ्यांच्या बांधावर पंचनाम्यासाठी धावपळ सुरु झालीआहे.
जिल्ह्यात सुरु असलेल्या परतीच्या पावसामुळे बहुतेक ठिकाणी शेती पाण्याखाली गेल्याने भाते पिके कुजली. तर काही ठिकाणी कापून ठेवलेली भातपिकं खराब झाली आहेत. तर कापलेल्या भातपिकांच्या लोंब्याना मोड आल्याने मोठे नुकसान झाले आहे.परतीच्या पावसाने भात, वरी,नाचणी या खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास परतीच्या पावसाने पळविला आहे.आता झालेल्या पंचनाम्यानंतर शासन कशी मदत जाहीर करणार आणि ती शेतकऱ्यांना कधी मिळणार याकडे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे डोळे लागले आहेत.