Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

मराठवाड्याचा दीपस्तंभ,डॉ.भारतकुमार राऊत यांचा लेख

 मराठवाड्याचा दीपस्तंभ

डॉ.भारतकुमार राऊत

(लेखक हे राज्यसभेचे माजी सदस्य आणि महाराष्ट्र टाइम्सचे माजी संपादक आहेत)


स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय सहभाग घेतल्यानंतर देशाच्या समर्थ उभारणीसाठी ज्यांनी 'व्रत' म्हणून लेखणी हाती घेतली व पत्रकारिता केली, अशा पिढीतला शेवटचा योद्धा म्हणजे 'मराठवाडा'चे संपादक अनंतराव भालेराव. त्यांचा आज २९ वा स्मृतिदिन.

ज्या काळात 'व्यावसायीक पत्रकार' ही संज्ञा प्रचलित नव्हती, त्या काळात अनंतराव कार्यरत होते. तत्वांशी तसुभरही तडजोड न करता पत्रकारिता करण्याचा वसा त्यांनी घेतला होता.  त्याच्याशी ते प्रामाणिक राहिले. या त्यांच्या निर्भिड  बाण्यामुळेच मराठवाडा महाराष्ट्रात सामील झाल्यानंतर त्यांचे 'मराठवाडा' हे दैनिक जणु मराठवाड्याचे 'मुखपत्र' बनले.

स्वातंत्र्याची चळवळ व नंतर हैदराबाद मुक्तिसंग्राम लढ्यात महत्त्वाची भूमिका बजावल्यानंतर अनंतरावांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील सत्याग्रहातही सहभाग घेतला. याबद्दल सक्तमजुरी आणि तुरुंगावासाच्या शिक्षाही भोगल्या. स्वातंत्र्योत्तर काळात औरंगाबादहून प्रसिद्ध होत असलेल्या दैनिक मराठवाडातून त्यांनी सातत्याने समाजहिताची, विकासाची भूमिका घेत लेखन केले. विकासासाठी जनतेने केलेल्या आंदोलनांत आणि पत्रकार आणि साहित्यिकांची एक पिढी घडवण्यात भालेराव यांनी भूमिका बजावली.

अनंतराव भालेराव यांचा जन्म औरंगाबाद जिल्ह्याच्या वैजापूर तालुक्यातील खंडाळा येथे झाला. त्यांचे वडील काशीनाथराव वारकरी होते. त्यामुळे बालपणापासूनच अनंतरावांच्या व्यक्तिमत्त्वावर वारकरी संप्रदायाचा आणि ज्ञानेश्वर- तुकारामांच्या साहित्याचा संस्कार झाला. अनंतरावांचे सातवीपर्यंतचे प्राथमिक शिक्षण वैजापूर आणि गंगापूर येथे आणि हायस्कूलचे शिक्षण औरंगाबाद येथे तत्कालीन निझाम सरकारच्या शाळेत उर्दू माध्यमातून झाले.



अनंतराव मॅट्रिकनंतर इंटरच्या पहिल्या वर्गात असताना १९३८ मध्ये हैदराबाद स्टेट काँग्रेसने जबाबदार राज्यपद्धतीच्या मागणीसाठी सत्याग्रह सुरु केला. अनंतरावांनी पहिले सत्याग्रही म्हणून आपले नाव नोंदवले. नोव्हेंबर १९३८ मध्ये त्यांनी वैजापूर येथे आयुष्यात पहिल्यांदा सत्याग्रहात भाग घेतला. त्याबद्दल त्यांना तीन महिन्यांची सक्तमजुरीची शिक्षा झाली. 

त्यानंतर १९४२ मध्ये चले जाव आंदोलन सुरु झाल्यानंतर १९४४ मध्ये शिक्षकी पेशा सोडून हैद्राबाद स्टेट काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून अनंतरावांनी पूर्णवेळ कामास प्रारंभ केला. १९४७ पर्यंत त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हैदराबाद संस्थानातही स्वातंत्र्यचळवळीला वेग आला. निझामाच्या राजवटीची पाठराखण करीत असलेल्या रझाकार संघटनेने ही चळवळ दडपून टाकण्यासाठी हिंसक मार्ग अवलंबला तेंव्हा त्याला उत्तर देण्यासाठी सशस्त्र लढा उभारण्यात आला. अनंतराव या लढ्यात मराठवाड्यातील एक अग्रणी होते. 

पाटनूरचा जंगल सत्याग्रह आणि त्यानंतरच्या घटनांमध्ये अनंतराव सक्रीय होते. लढ्यासंदर्भातील एका प्रकरणात मुंबई प्रांतात त्यांना १९४८ मध्ये ठाणे तुरुंगात दीड महिना स्थानबद्ध करण्यात आले. सप्टेंबर १९४८ च्या पोलिस कारवाईनंतर हैद्राबाद संस्थान भारतीय संघराज्यात विलीन झाले.

त्यानंतरही १९५३ ते १९५६ याकाळात संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत आणि पुढे १९७७ मध्ये आणबीणीच्या काळात अनंतरावांनी पत्रकार म्हणून आणि सक्रिय कार्यकर्ता या नात्याने महत्त्वाची भूमिका बजावली.

आ.कृ. वाघमारे यांनी १९३८ मध्ये मराठवाडा हे साप्ताहिक सुरू केले. भाषावार प्रांतफेररचनेत मराठवाड्याचा भूभाग महाराष्ट्र राज्यात समाविष्ट झाला. त्यानंतर साप्ताहिकाचे कार्यालय १९५६ मध्ये औरंगाबाद येथे स्थलांतरित करण्यात आले. वाघमारे यांनी १ एप्रिल १९५३ ला मराठवाडाचे संपादकपद अनंतराव भालेराव यांच्याकडे सोपवले. १ ऑक्टोबर १९६८ पासून मराठवाडा औरंगाबादहून दैनिक स्वरूपात प्रसिद्ध होऊ लागले. 

पूर्णा, जायकवाडी ही धरणे व्हावीत यासाठी जनमत तयार करण्यात या वर्तमानपत्राने भूमिका बजावली. या दैनिकाने पुरोगामी आणि विकासात्मक पत्रकारिता करतानाच लोकहिताच्या प्रश्नांना सातत्याने मंच उपलब्ध करून दिला. 

१९७४ मध्ये मराठवाड्याच्या विकासासाठी झालेल्या आंदोलनाला मराठवाडाच्या माध्यमातून अनंतरावांनी सक्रिय पाठिंबा दिला. भारतात १९७५ पासून घोषित झालेल्या आणीबाणीच्या काळात सत्याग्रह केल्याबद्दल त्यांना अटकही करण्यात आली.


अनंतरावांनी साहित्य चळवळीतही सहभाग घेतला. साहित्य परिषदेत त्यांनी पदे भूषविली. मराठवाडा दैनिकाच्या माध्यमातून नव्या जाणिवांचे प्रवाह साहित्यात आणणाऱ्या साहित्यिकांच्या एका पिढीला त्यांनी प्रोत्साहन दिले. औरंगाबाद येथे मराठवाडा साहित्य परिषदेची स्वतःची इमारत तयार होण्यासही त्यांनी प्रयत्न केले.

अनंतरावांची पळस गेला कोकणा (प्रवासवर्णन), आलो याचि कारणासी (लेखनसंग्रह) पेटलेले दिवस (स्वातंत्र्यसंग्रामाच्या आठवणी) ही पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. अनंतरावांना फाय फाऊंडेशनचा पुरस्कार, अत्रे प्रतिष्ठानचा पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी गौरविले गेले होते.

२६ ॲाक्टोबर १९९१ रोजी अनंतरावांचे निधन झाले. मराठी पत्रकारांचा नैतिक दीपस्तंभ उन्मळून पडला. अनंतराव गेले व पुढील काळात 'मराठवाडा' सुद्धा काळाच्या ओघात निष्प्रभ होत गेला.


एक अध्याय संपला.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies