जुन्या चालीरीती विचारांना मूठमाती देण्यास अंनिस व सातारा पोलिसांना यश!!! - महाराष्ट्र मिरर

Breaking


Post Top Ad

Sunday, October 4, 2020

जुन्या चालीरीती विचारांना मूठमाती देण्यास अंनिस व सातारा पोलिसांना यश!!!

 जुन्या चालीरीतीना मूठमाती देण्यास अंनिस व सातारा पोलिसांना यश!!!


कुलदीप मोहिते -कराड
आपण आधुनिक जगात वावरत आहोत हे विज्ञानयुग आहे असे म्हटले जाते पण आजही महाराष्ट्रातील काही ग्रामीण भागांमध्ये जुन्या चालीरीती विचारांचा अनिष्ट रूढी परंपरांचा प्रभाव दिसत आहे पण महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती व सातारच्या पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते  यांच्या प्रबोधनाने सातारा जिल्ह्यामधील अंधारी गावामधील लोकांमध्ये  सामाजिक परिवर्तन घडवून आणण्यात यश आले आहे सातारा जिल्ह्यामध्ये कास तलावापासून तीन किलोमीटर अंतरावर अंधारी हे गाव आहे  या गावाचे वैशिष्ट्य म्हणजे या गावातील  10 हून अधिक जोडप्यांनी आंतरजातीय विवाह केलेले आहेत यातील बरीच जोडपी कामानिमित्त मुंबईमध्ये वास्तव्यात  होती पण कोरोना महामारी च्या पार्श्वभूमीवर भारतामध्ये लॉक डाऊन सुरू झाला आणि ही जोडपी गावात परत आली गावामध्ये त्यांच्यासोबत त्यांनी आंतरजातीय विवाह केल्यामुळे त्यांना वेगळेपणाची वागणूक दिली जात होती


गावाच्या सार्वजनिक आणि धार्मिक कार्यक्रमात त्यांना सहभागी होऊ न देणे तसेच जवळच्या नातेवाईकांचे विवाह, अंत्यविधी यासारख्या सुखदु:खाच्या प्रसंगात त्यांना सहभागी होऊ न देणे असे प्रकार घडू लागले होते. 

काही ठिकाणी वडिलांच्या मृत्यूनंतर मुलाला धार्मिक कार्यात सहभाग नाकारण्यासाठी दबाव आणण्याचे प्रकारदेखील समोर आले होते.

गावातील आंतरजातीय विवाह केलेले आणि त्यासाठी शासनाचा सन्मान मिळालेले चंद्रकांत शेलार यांनी सामाजिक बहिष्कार कायद्याविषयी वाचले होते. 

अशा स्वरूपाचा सामाजिक बहिष्कार घालणे हा सामाजिक स्वरूपाचा गुन्हा आहे असे त्यांनी गावकऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. 

तरीदेखील काही फरक पडत नव्हता. शेवटी त्यांनी याविषयी मेढा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तसेच महाराष्ट्र अंनिसच्या सातारा शाखेकडेदेखील तक्रार केली.

गुन्ह्याचे सामाजिक स्वरूप लक्षात घेता सातारच्या जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली मेढा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राठोड आणि महाराष्ट्र अंनिसतर्फे डॉ. हमीद दाभोलकर, प्रशांत पोतदार, शंकर कणसे, भगवान रणदिवे आणि प्रशांत जाधव यांनी याविषयी गावकऱ्यांसमवेत बैठक घेतली.

शासनाने केलेल्या सामाजिक बहिष्कारविरोधी कायद्यासंबंधी या बैठकीत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच तुमच्या गावात इतके आंतरजातीय विवाह झाले आहेत हे गावासाठी भूषणावह असल्याचे त्यांच्या ध्यानात आणून दिले. 

आपला देश हा संविधानाच्या कायद्याने चालतो. तो सोडून गावाचा वेगळा कोणताही कायदा अशा प्रकारे चालू शकत नाही याविषयी प्रबोधन करून गावचे सरपंच शेलार यांना महाराष्ट्र अंनिसतर्फे संविधानाची प्रत भेट देण्यात आली. 

आंतरजातीय विवाह केलेल्या सहा जोडप्यांनी यावेळी त्यांना आलेल्या सामाजिक भेदभावाच्या वागणुकीविषयीचे अनुभव सांगितले. गावातील ज्येष्ठ नागरिक आणि सरपंच यांनी पुढाकार घेवून यापुढे अशा घटना गावात होणार नाहीत असा निर्धार व्यक्त केला.

जिल्ह्यातील विशेष करून जावली आणि पाटण तालुक्यातील अनेक गावांमध्ये गावकी आणि भावकीच्या नावाखाली सामाजिक बहिष्कार टाकला जात आहे. 

अशा पीडित लोकांनी महाराष्ट्र अंनिस तसेच स्थानिक पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली

No comments:

Post a Comment